रावसाहेब दानवे यांच्या किश्श्यांमुळे कार्यकर्त्यांची हसून पुरेवाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही बुडाले हास्यसागरात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. मंत्र्यांच्या मोटारींचे लाल दिवे काढण्यात आले. आता आणखी एक कटू निर्णय होणार आहे. त्यानंतर, मंत्रिपदापेक्षा पक्षाचे संघटनात्मक काम करणे बरे, असे वाटू लागेल आणि आम्हाला पक्षाच्या कामासाठी घ्या, अशी मागणी सुरू होईल, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले.

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी दानवे यांच्या पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी सांगितलेल्या अनेक किश्श्यांनी हास्याचे स्फोट झाले. दोन-तीन वेळा स्वत: दानवे यांनाच हसू आवरले नाही म्हणून त्यांना भाषण थांबवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू रोखणे शक्य झाले नाही. सुरुवातीला दानवे यांनी पक्षाच्या यशाचा आलेख आकडेवारीसह नमूद केला. पक्षाचा खडतर प्रवास मांडला. भाजपला कधी लाल दिवा मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, सुरुवातीला पक्षाच्या दोन आमदारांना लाल दिवे मिळाले, त्याचा पक्षवर्तुळात खूप आनंद झाला, जेवणावळी झाल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता सगळ्यांचेच लाल दिवे गेले. मंत्री आला तरी नाक्यांवर गाडी अडवली जाते. मंत्र्याला ओळख सांगावी लागते, तरी त्याला ओळखत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण १२ देश फिरलो. मात्र, फक्त ‘हाऊ मच’ हा शब्द सर्वाधिक उपयोगी पडला. ‘उपभोक्तामंत्री’, ‘प्रोटोकॉल मंत्री’ असे अनेक गमतीदार किस्से त्यांनी सांगितले. पंतप्रधान आमचा होणार, असा प्रचार केल्यानंतर भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. तेव्हा आमची खूपच टिंगलटवाळी व्हायची. आता चित्र बदलले आहे. पक्षात येणाऱ्यांची रांग लागली आहे. त्यांच्या गळ्यात हार घालून आमचे हात दुखू लागले. हे प्रवेश न थांबवल्यास आम्हाला पक्षात जागा राहायची नाही. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. राहुल गांधींनी कोणाला नमस्कार घातल्याचे आपल्याला कधी दिसले नाही. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दहा आमदारांचा गट संपर्कात

विद्यमान दहा आमदारांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचे विधान रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात केले. मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही जाऊ शकत नाही, असे सांगत ते आपल्याकडे आले होते. अजून बरेच जण पक्षात येणार आहेत. त्यांचा त्यांच्या सध्याच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. भाजपच्या विजयी वाटचालीविषयी त्यांना खात्री वाटते आहे म्हणून त्यांना इकडे यायचे आहे, असे दानवे म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडा. त्यांनी इतकी वर्षे काहीच केले नाही. अजूनही ते पराभवातून बाहेर पडलेले नाही. २०२४ पर्यंत आपल्याला सत्ता मिळेल, असे त्यांनाही वाटत नाही. दिल्लीतही एकाही नगरसेवकाला तिकीट दिले नाही, ते तंत्र यशस्वी ठरले. सत्ता आपली असली, तरी आपल्याच कार्यकर्त्यांच्या ते पचनी पडत नाही, असेही ते म्हणाले.