रुपी बँकेला कार्पोरेशन बँक दत्तक घेणार असल्याचे सांगितले जात असताना व त्याबाबत रिझव्र्ह बँकेने दिलेली मुदतवाढीची मुदतही संपण्यास केवळ १८ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाही कोणताही निर्णय झाला नसल्याबद्दल बँकेचे खातेदार व ठेवीदारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ठेवीदारांकडून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सहकार आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी याबाबत प्रसिद्धीपत्र दिले असून, रुपीच्या प्रश्नावर अद्याप तोडगा न निघाल्याबद्दल शासन व प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रुपी बँकेला कार्पोरेशन बँक दत्तक घेणार असल्याचे सहकार मंत्र्यांपासून पालकमंत्री, सहकार आयुक्त, बँकेचे प्रशासक छातीठोकपणे सांगत होते. त्यामुळे आम्ही ठेवीदार व खातेदार काय घडते हे पाहण्यासाठी महिनाभर शांत बसलो होतो व आंदोलनही स्थगित केले होते. मात्र, काहीही निर्णय होऊ शकलेला नाही. या गोष्टीला प्रशासन व सरकारमधील मंत्र्यांची अनास्था कारणीभूत आहे, असा आरोप समितीने केला आहे.
राज्यभरातील सात लाख खातेदारांवर भीतीची टांगती तलवार आहे. आगामी १८ दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास २२ मे पासून रुपी बँकेला कायमचे कुलूप लागेल. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही, हे सरकारला सांगण्यासाठी काही काळ स्थगित केलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यात मंगळवारी सहकार आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात रिझव्र्ह बँकेच्या वरळी येथील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्याच्या पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.