ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर (वय ७८) यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते रस्त्यावर उतरले होते. ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. मागील १७ वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता सुरू होता

अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’

त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेंडुलकर यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने सामाजिक विसंगतीवर रेषांच्या सहाय्याने प्रभावी भाष्य करणारा कलावंत आपण गमावला आहे. तेंडुलकरांची व्यंगचित्रे सामाजिक प्रश्नांवर नेमकी बोट ठेवायची. सहज साध्या प्रसंगावरही ते मार्मिकतेने हास्यचित्र रेखाटायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा त्यांच्या चित्रातही उमटायचा. एक हास्य व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ख्याती होतीच परंतु त्यांचे ललित लेखनही लोकप्रिय होते. त्यासोबतच सामाजिक बांधिलकीपोटीही विविध सामाजिक प्रश्नाबाबत ते सक्रीय  होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी कलावंत आणि सामाजिक जाणिवा जोपासणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.