‘गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर’ या विज्ञान लेखिका कविता भालेराव यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. डॉ. अभ्यंकर कुटुंबीयांच्या विधी महाविद्यालय रस्ता येथील वास्तूत पुस्तक प्रकाशनाचा हा अनौपचारिक कार्यक्रम झाला. डॉ. अभ्यंकर यांचे चरित्र राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. याच वेळी डॉ. अभ्यंकर यांचे वडील प्रा. शं. के. अभ्यंकर यांनी चार गणितज्ञांवर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांचे मराठी भाषेवर निस्सीम प्रेम होते. गणिताची गोडी मुलांना लागावी यासाठी त्यांनी मोठे काम केले. भास्कराचार्य प्रतिष्ठानची स्थापना त्यांनी केली होती. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास पवई आयआयटीतील गणिताचे प्राध्यापक व डॉ. अभ्यंकर यांचे विद्यार्थी डॉ. सुधीर घोरपडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या वेळी डॉ. श्रीधर अभ्यंकर, कविता भालेराव, राजहंस प्रकाशनाचे आनंद हर्डीकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. नरेंद्र करमरकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ, वामन कोल्हटकर यांनी गणितज्ञ श्रीराम अभ्यंकर यांच्या आठवणी सांगितल्या. योगिंद्र अभ्यंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.