राज्यात पहिल्यांदाच गर्दीच्या नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी (२९ जून) शहरात आगमन होणार आहे. नाना-भवानी पेठेत पालख्या मुक्कामी पोचल्यानंतर तेथे भाविकांच्या गर्दीचे मोजमाप करण्यासाठी विशेष यंत्रणा (रिअल टाईम क्राऊड मेजरमेंट) बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे एखाद्या विशिष्ट भागात होणाऱ्या गर्दीची माहिती आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांची संख्या याची माहिती संकलित होते. पोलीस बंदोबस्तासाठी ही यंत्रणा राज्यात पहिल्यांदाच वापरली जाणार आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ही यंत्रणा बसविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्ल्यु रेडिअन्स या कंपनीचे मकरंद हरदास व हृषीकेश हसबनीस यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे व परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ही यंत्रणा विकसित करणारे हरदास व हसबनीस ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, की सध्या प्रत्येक जण मोबाईलचा वापर करतो. त्यामुळे सेन्सरवर आधारित ही यंत्रणा आहे. एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास तेथे असलेल्या मोबाईलधाराकांची नोंद सेन्सरच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्यामुळे त्या विशिष्ट ठिकाणी नेमके किती नागरिक आहेत, याची माहिती लगेच मिळते. पाश्चात्त्य देशांमध्ये या यंत्रणेचा वापर केला जातो. आपल्याकडे काही मॉलमध्ये या यंत्रणेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु पोलीस बंदोबस्तासाठी या यंत्रणेचा वापर करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे.

‘‘स्मार्ट सिटीच्या बैठकीत सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त साकोरे यांच्याशी परिचय झाला. त्या वेळी पालखी बंदोबस्तासाठी ही यंत्रणा बसविल्यास त्याचा फायदा होईल, असे साकोरे यांनी सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून नाना व भवानी पेठेतपाच ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे,’’ असे हरदास व हसबनीस यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त साकोरे व डहाणे म्हणाले की, नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर, भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठेतील रामोशी गेट चौकासह पाच ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. एखाद्या ठिकाणी गर्दी वाढल्यास नियोजनासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक त्वरित रवाना केली जाईल. त्यामुळे चेंगराचेंगरी सारख्या घटना टाळण्यास मदत होईल. पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही समजण्यास मदत होईल.

नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल

संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे, तर श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार

आहे. दोन्ही पालख्या १ जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन अरुणा चौक ते पारशी अग्यारी (नाना पेठ),  पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ हे दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच या दोन्ही रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

बुधवारी शहरातील बंद राहणारे रस्ते

रेंजहिल चौक ते संचेती चौक, खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फग्र्युसन रस्ता), शनिवारवाडा ते स. गो. बर्वे चौक (शिवाजी रस्ता), वीर चापेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग, तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), बेलबाग चौक ते निवडुंग्या विठोबा मंदिर (नाना पेठ).