एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणाने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्तवाडी परिसरामध्ये दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. हा तरुण मूळचा परळी वैजनाथ येथील रहिवासी आहे.
विशाल भागवत मुंडे (वय २२, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विशाल चार महिन्यांपूर्वीच पुण्यात आला होता. विशाल व त्याचे तीन मित्र दत्तवाडीमधील गुरुकृपा या इमारतीत एका खोलीत भाडय़ाने राहात होते. स्पर्धा परीक्षेसाठी या चौघांनी बुधवार पेठेमध्ये एक अभ्यासिकाही लावली होती.
बुधवारी सकाळी विशाल इतर मित्रांसह अभ्यासिकेला जाण्यासाठी खोलीबाहेर पडला. जेवण करण्याच्या निमित्ताने विशाल सकाळी साडेअकराच्या सुमारास खोलीवर परतला. त्याचा एक मित्र दुपारी बाराच्या सुमारास खोलीवर आल्यानंतर विशालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्याने लगेचच इतर मित्रांना बोलावून घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अभ्यासातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तुला हवे तितके शिक..!
विशाल मुंडे याच्या घरची स्थिती हलाखीची आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडील रिक्षा चालवितात, तर आई शेतमजुरी व इतर मजुरीचे कामे करते. विशालला एक लहान भाऊही आहे. विशाल अभ्यासात हुशार असल्याने त्याला स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात पाठविले होते. ‘तुला हवे तितके शिक, पण चांगला राहा,’ असे सांगून आईने त्याला पुण्यात पाठविले होते.