बेकायदेशीर कामांची माहिती द्या, वाहतुकीच्या कोंडीबाबत माहिती कळवा. असे आवाहन करणाऱ्या पोलिसांनीच काही बेकायदेशीर काम केले आणि ते थांबविण्याचे धाडस एखाद्या व्यक्तीने दाखवले तर?.. तर अशा व्यक्तीचे कौतुक होईल अशी आपली कल्पना असेल तर विसरा. कारण दोनच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी अशा व्यक्तीवर डूख धरला आणि काहीतरी कारण काढून त्याच्यावर कारवाई केली.
गोखलेनगर परिसरात राहणारे कार्यकर्ते विश्वास चव्हाण यांनी हा अनुभव घेतला. त्यांनी याची माहिती ‘पुणे वृत्तान्त’ला दिली आणि याबाबत पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.
गेल्याच शनिवारची घटना. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास चतु:शंृगी मंदिरासमोर इंद्रप्रस्थ कार्यालयाच्या बाजूला रस्ता खणला होता. त्याचे काम सुरू होते. एका बाजूचा अर्धा रस्ता खणलेला असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. या कामाबाबत ना फलक होता, ना लाल झेंडा. तेथे वाहतूक पोलीस नव्हते. चव्हाण त्या रस्त्याने मोटारसायकलवरून जात होते. रस्ता आडवा खणायचा असेल तर अशी कामे रात्रीच्या वेळी करायची असतात. त्यामुळे चव्हाण यांनी तेथील सुपरवायझर काम कोणाचे आहे हे विचारले. हे काम पोलिसांचे असल्याचे त्याच्याकडून समजले. मात्र, कामाबाबतच्या परवानगीचे पत्र दाखवण्यास त्याने नकार दिला. त्यावर चव्हाण यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, ते बैठकीत असल्याने उपयोग झाला नाही. मग त्यांनी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. ‘दिवसा रस्ता आडवा खणत असल्याने वाहतूक कोंडी झाली असून, तेथे पोलीस नसल्याची’ माहिती दिली. कक्षाकडून पोलीस पाठवण्याचे आश्वासन मिळाले. पाऊण तासाने चतु:शंृगी विभागाचे वाहतूक पोलीस सहायक निरीक्षक बद्रे व पोलीस कर्मचारी तेथे आले. त्यांनी हे काम पोलिसांच्या सीसीटीव्हीचे असल्याचे सांगितले आणि काम सुरूच राहील असे सुनावले. मात्र, चव्हाण यांनी त्याची लेखी परवानगी आहे का, असे विचारताच पोलिसांनी काम थांबवायला सांगितले.
मात्र, असे काम केल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा आग्रह चव्हाण यांनी धरला. तेवढय़ात जनवाडी पोलीस चौकीतचे फौजदार नम तेथे आले. त्यांनी, पोलिसांचे काम असल्याने ते सुरूच राहील, असे म्हणत त्या सुपरवायझरला काम सुरू ठेवण्यास सांगितले. मात्र, चव्हाण यांनी याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर ते काम थांबवण्यात आले. त्या वेळी एका पोलिसाने चव्हाण यांच्या मोटारसायकलचा क्रमांक घेतला, असे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी (रविवारी) सायंकाळी मॉडर्न वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी चव्हाण यांची मोटारसायकल अडवली. ते मोबाइलवर बोलत असल्याचे कारण देऊन दंड भरण्यास सांगितले. त्या वेळी चव्हाण यांनी मोबाइल काढून पोलिसांकडे दिला आणि मोबाइलवर गेल्या २०-२५ मिनिटांत फोन आला होता का, हे तपासायला सांगितले. मात्र, पोलीस कर्मचाऱ्याने तरीसुद्धा साहेबांशी बोला असे सांगितले. मग वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक जगताप यांनीही मोबाइल न पाहता चव्हाण यांचा वाहन परवाना ठेवून घेतला. पोलिसांसाठीचे बेकायदेशीर काम थांबवल्यामुळेच पोलिसांनी ही कारवाई केले, असा आरोप चव्हाण यांनी केला.

नियमांची पूर्णपणे पायमल्ली
पोलिसांसाठी केबल टाकण्याचे काम टाकण्याच्या या कामात नियमांची पूर्णपणे पायमल्ली केली गेल्याचे दिसून आले.
– हे काम १० जावेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. तरीही ते तब्बल वर्षभर उशिराने सुरू होते.
– अटींमध्ये रस्ता आडवा खणायचे असेल (क्रॉसकट) तर ते काम रात्रीच्या वेळी करावे, असा नियम आहे. मात्र, हे काम दिवसाढवळ्या सुरू होते.
– असे काम करताना रहदारीसंबंधी आवश्यक ती दक्षता घेणे, खड्डे असल्यास तात्पुरते संरक्षक कठडे लावणे, खोदाई करणाऱ्या कंपनीचे नाव, दूरध्वनी क्रमांक, काम पूर्ण करण्याची मुदत असणारा फलक लावणे आवश्यक आहे. पण हे सर्व नियमही पाळले गेले नव्हते.