मावसबहीण जखमी; हल्ल्यामागचे कारण समजले नाही
तळेगांव दाभाडेजवळील सुदुंबरे गावात मावसबहिणींवर मारेक ऱ्याने चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत सात वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडली असून तिची चौदा वर्षांची मावसबहीण गंभीर जखमी झाली आहे. हल्लयामागचे कारण समजू शकले नाही. ग्रामीण पोलिसांकडून पसार झालेल्या मारेक ऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.
पायल संतोष जगताप (वय ७,रा. हिंगणगाव, लोणीकाळभोर, ता. हवेली ) असे मारेक ऱ्याने केलेल्या चाकूहल्ल्यात मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. तर तिची मावसबहीण ॠतुजा काळुराम कुसुमकर (वय १४, रा. सुदुंबरे, ता. मावळ ) ही जखमी झाली असून तिच्यावर तळेगांव दाभाडे येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काळुराम कुसुमकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारेक ऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगांव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुमकर कुटुंबीय ज्ञानेश्वर वाघ यांच्या वीटभट्टीवर गेल्या चार ते पाच वर्षांपासून काम करत आहे. वीटभट्टी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या बैठय़ा घरांमध्ये ते राहायला आहे. तेथे सतरा ते अठरा कुटुंब राहायला आहेत. शनिवारी सुदुंबरे येथील रोकडोबा महाराजांचा वार्षिक उत्सव होता. यात्रेसाठी पायल आणि तिची आई सुदुंबरे येथे आल्या होत्या. सकाळी पायल आणि ॠतुजा हिची आई स्वयंपाक करत होत्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी पायल आणि ॠतुजा या तेथून काही अंतरावर ओढय़ाजवळ गेल्या होत्या. त्या वेळी मारेक ऱ्याने दोघींवर चाकूने हल्ला चढविला. हल्ल्यात दोघी गंभीर जखमी झाल्या. ॠतुजा जखमी अवस्थेत शेतात पडल्याचे वीटभट्टी कामगारांनी पाहिले. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पायलचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक इंगवले, हवालदार नंदकुमार चव्हाण, सचिन काचोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. देहूरोड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, वसंत बाबर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पसार झालेल्या मारेक ऱ्याचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, काळुराम कुसुमकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या चार ते पाच वर्षांपासून आम्ही गावात राहायला आहोत. आमचे कोणाशी भांडण नव्हते. वार्षिक उत्सव असल्यामुळे वीटभट्टीचे काम बंद ठेवण्यात आले होते. पायल ही हिंगणगाव येथील शाळेत शिक्षण घेत होती. नुकतीच ती तिसरीत गेली होती. ॠतुजा ही सुदुंबरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. नुकतीच ती आठवी उत्तीर्ण झाली आहे.