पिंपरी-चिंचवडमध्ये सांस्कृतिक चळवळ रुजविण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक पं. पद्माकर शंकर कुलकर्णी यांचे आज पहाटे चिंचवड येथील निरामय रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
त्यांच्यामागे मुलगा पुष्कर कुलकर्णी, कन्या कविता जांभेकर तसेच जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. पंडितजींच्या पार्थिवावर आज सकाळी साडेदहा वाजता चिंचवड येथील लिंकरोड स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात येणार आहेत.
दिवंगत ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य अशी त्यांची ओळख होती. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, पं. वसंतराव राजोपाध्ये, गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले आदींकडेही त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. पुण्याच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी अनेक वर्षे गायन केले. काही काळ त्यांना या महोत्सवाचे सूत्रसंचालन करण्याचा मानही मिळाला आहे. देशातील बहुतेक सर्व मानाच्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी कला सादर केली होती.
आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांनी चिंचवडमध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसाराचे काम केले. त्या माध्यमातून त्यांनी अनेक शिष्य व चांगले कलाकार देखील घडविले. फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी चिंचवडमध्ये वार्षिक संगीत महोत्सव सुरू केला. त्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळाली.
पिंपरी-चिंचवड महोत्सव असो किंवा स्वरसागर संगीत महोत्सव शहरातील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. पिंपरी-चिंचवडमध्ये सांस्कृतिक चळवळ रुजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत आकादमीचे मानद संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2015 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ गायक पं. पद्माकर कुलकर्णी यांचे निधन
पिंपरी-चिंचवडमध्ये सांस्कृतिक चळवळ रुजविण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक पं. पद्माकर शंकर कुलकर्णी यांचे आज पहाटे चिंचवड येथील निरामय रुग्णालयात निधन झाले.

First published on: 06-01-2015 at 09:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veataran singer pandit padmakar kulkarni passes away