पिंपरी-चिंचवडमधील स्थिती; दिवाळीत दोन हजार नवीन वाहनांची भर

मंदीचा काळ असल्याची ओरड सातत्याने होत असली, तरी शहरांतर्गत प्रवासाची गरज म्हणून खासगी वाहनांच्या खरेदीला पिंपरी-चिंचवड शहरातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. यंदा दिवाळीच्या तीनच दिवसांमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुमारे दोन हजार नव्या वाहनांची नोंद झाली. वाहन नोंदणी शुल्कापोटी तीन दिवसांत तब्बल ४ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे शहरात लोकसंख्येहून अधिक वाहनांची संख्या असताना पिंपरी-चिंचवडमध्येही आता लोकसंख्येच्या आसपास वाहनांची संख्या झाली आहे.

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रामध्ये दिवाळीच्या दिवसांत वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरांतर्गत प्रवासाची गरज आणि स्वत:च्या वाहनाची हौस आदी कारणांमुळे मोठी वाहन खरेदी झाल्याचे दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २२ लाख इतकी आहे. शहराची लोकसंख्या ज्याप्रमाणे झपाटय़ाने वाढत आहे. तितक्याचे झपाटय़ाने वाहनांचीही संख्या वाढत आहे. पिंपरी आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या साडेसतरा लाख वाहने आहेत. वाहनांची वाढती संख्या शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब बनत चालली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनतळासाठी जागा उपलब्ध नसताना रोजच नव्या वाहनांची भर पडत आहे. पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये दर महिन्याला सरासरी १२ हजार वाहनांची नोंदणी होते. दिवसाला चार हजार वाहनांची भर पिंपरी-चिंचवड आणि परिसरात पडत आहे. वाहन खरेदीचा जोर असाच कायम राहिला, तर येत्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे.

दुचाकी सर्वाधिक

पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये २७ ते २९ ऑक्टोबर या तीन दिवसांत १ हजार ८४८ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक म्हणजे तब्बल एक हजार पन्नास आहे. याशिवाय ५८५ मोटारी आणि १२२ रिक्षांचाही समावेश आहे.