भारतातील सर्वाधिक खपाचे, विक्रमाचे आणि चर्चेचा विषय असलेले सध्याचे लेखक म्हणजे कादंबरीकार चेतन भगत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीची सध्या भारतभर जोरदार चर्चा आहे. तिच्या बाजूने आणि विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये, ब्लॉगवर बरेच काही लिहिले जात आहे. त्यासोबत तिच्या विक्रीचा आलेखही दिवसेंदिवस वाढतोच आहे. ही कादंबरी आणि चेतन भगत यांच्याविषयीचे हे लेख. डावीकडील लेख थेट कादंबरीच्या कथानकाविषयी बोलणारा, तिची चिकित्सा करणारा आहे, तर उजवीकडील लेख चेतन भगत यांच्या जादूई करिश्म्याविषयी. हा लेख हिंदीतील वाचकप्रिय ब्लॉग ‘जानकीपुल डॉट कॉम’वरून लेखकाच्या पूर्वानुमतीने अनुवादित करून घेतला आहे.  या दोन्ही लेखातून चेतन भगत यांच्याविषयी जाणून घ्यायला आणि त्यांच्या यशाचे गमक समजायला मदत व्हावी.

भारतातील तरुण पिढीला, विशेषत: बिगरइंग्रजी माध्यमांत शिकलेल्या तरुण वर्गाला इंग्लिश भाषेतील पुस्तकवाचनाची गोडी लावणाऱ्या लेखकांमध्ये चेतन भगत याचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून, वर्तमानाच्या व्यासपीठावर राहून तरुणांशी संबंधित प्रेम, करिअर, महाविद्यालयीन जीवन, नातेसंबंधांतील गुंतागुंत यांची गुंफण घालून सुटसुटीत इंग्रजीत लिहिलेल्या चेतन भगतच्या कादंबऱ्यांनी तरुण वर्गाला वेड लावले. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही या कादंबऱ्यांनी स्वत:चा वेगळा वाचकवर्ग निर्माण केला. चेतन भगतची कादंबरी म्हणजे बेस्टसेलर असे समीकरणही तयार झाले.
ही झाली जुनी गोष्ट. आज चेतन भगत आणि त्याचे लिखाण याबद्दल आकर्षण कमी आणि तिटकाराच अधिक वाटू लागला आहे. लेखनात सातत्य असावे; पण प्रत्येक कादंबरीत तोचतोचपणा असेल, तर ती कादंबरी आणि तो लेखक दोघेही वाचकप्रियतेतून हद्दपार होतात. तरुण वर्गाला भुरळ पाडणारे विषय घेऊन कथेची मांडणी केली, ठिकाणे बदलली आणि पात्रांची नावे बदलली, की झाली नवीन कादंबरी, हा चेतन भगतचा फंडा आता उघडा पडला आहे. एके काळी कादंबऱ्यांच्या यशाचे सूत्र म्हणून ज्याकडे पाहिले जात होते, तो तरुणाईशी संबंधित विषय आता पठडीबाज कथासूत्रांमुळे नकोसा वाटू लागला आहे. फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साइटवर चेतन भगतशी संबंधित प्रतिक्रिया वाचल्या, की ही गोष्ट लक्षात येते.
हे सगळे आता सांगण्याचे कारण म्हणजे चेतन भगतची नवीन कादंबरी ‘हाफ गर्लफ्रेंड’. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाने प्रेरित होऊन २०११ मध्ये आलेली ‘रिव्हॉल्यूशन २०२०’ आणि त्यापाठोपाठ तरुणाईला काय हवे, हे सांगण्याचा प्रयत्न करणारे ‘व्हॉट यंग इंडिया वॉण्ट्स’ या पुस्तकानंतर दोन वर्षांनी आलेली ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कादंबरी. ‘कोणे एके काळी माधव नावाचा एक बिहारी मुलगा होता. तो रिया नावाच्या मुलीवर प्रेम करत होता. माधव चांगले इंग्लिश बोलू शकत नव्हता. रिया इंग्लिश माध्यमातून शिकलेली. माधवला तिच्याशी प्रेमाचे नाते जुळवायचे होते. रियाला ते नको होते. रियाला निव्वळ मैत्री हवी होती. माधवला मैत्री नको होती. मग रियाने मधला मार्ग काढला आणि ती माधवची ‘हाफ गर्लफ्रेंड’ बनली..’ ‘हाफ गर्लफ्रेंड’च्या मागील पृष्ठभागावर लिहिलेल्या सारांशाचा हा स्वैरानुवाद. हा सारांश वाचूनच अनेकांनी ‘हाफ गर्लफ्रेंड’ खाली ठेवले नसेल, तरच नवल; पण ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही माधव झा आणि रिया सोमानी या दोघांची कहाणी आहे, एवढे तरी या सारांशातून स्पष्ट होते.
बिहारमधील कुठल्या तरी एका राजघराण्यात, पण बदलत्या काळात राजापासून रंक बनलेल्या कुटुंबात जन्मलेला माधव झा आणि दिल्लीतील एका अतिश्रीमंत उद्योजकाची मुलगी असलेली रिया सोमाणी, हे या कादंबरीचे नायक-नायिका. दिल्लीतील स्टीफन कॉलेजमध्ये ते एकत्र येतात. बास्केटबॉल या खेळाबद्दलच्या आवडीने ते एकमेकांचे मित्र बनतात. माधवचे रियावर प्रेम असते; पण ती त्याला राजी होत नाही. तिच्या दृष्टीने त्यांच्यात मैत्रीचे नातेच योग्य आहे. प्रेमाने पछाडलेला माधव रियाला आपलेसे करण्यासाठी तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतो; पण यामुळे जवळ येण्याऐवजी त्यांची मैत्रीच तुटते. मग वर्षभरात रियाचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न होते. इकडे निराश माधव बिहारमधील आपल्या गावी जाऊन आईच्या शाळेच्या कामांत स्वत:ला गुंतवून घेतो. मध्ये काही वर्षे सरतात. आपल्या जीर्ण शाळेत महत्त्वाच्या सोयीसुविधा बनवण्यासाठी ‘बिल गेट्स फाऊंडेशन’कडून आर्थिक मदत मिळवण्याची संधी माधवला चालून येते. याच संदर्भात फाऊंडेशनच्या लोकांशी भेटीगाठी सुरू असताना त्याची गाठ योगायोगाने रियाशी पडते. एव्हाना रियाचा घटस्फोट झालेला असतो आणि माहेरी न जाता ती नवीन नोकरी शोधून पाटण्याला स्थायिक होण्याचा प्रयत्न करत असते. दोघांमधील जुनी कटुता संपते आणि ते पुन्हा चांगले मित्र-मैत्रीण बनतात. माधवच्या मनातील प्रेमभावनाही पुन्हा जागृत होते; पण रियाचा नकार कायम असतो. फाऊंडेशनचा निधी मिळवण्यासाठी करावयाच्या इंग्लिश भाषणासाठी रिया माधवला मदत करते. त्याच्या जोरावर माधव मदत मिळवण्यात यशस्वीही होतो; पण त्याच दिवशी रिया ‘मला कर्करोग असून मी तीन महिन्यांत मरणार आहे’ असे पत्र ठेवून माधवला सोडून जाते. रियाबाबतची ही गोष्ट कळल्याने वेडापिसा झालेला माधव तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो; पण तिचा काही ठावठिकाणा लागत नाही. या घटनेच्या तीन वर्षांनंतर माधवच्या हाती आलेल्या रियाच्या रोजनिशीतून त्याला ती जिवंत असल्याचे कळते. मग तो तिचा नव्याने शोध घेण्यास सुरुवात करतो. अनेक दिवसांच्या अथक शोधानंतर शेवटी त्याला रिया भेटते आणि दोघे खऱ्या अर्थाने एकत्र येतात.
‘हाफ गर्लफ्रेंड’चे हे कथासूत्र वाचले, की चेतनने आपला पठडीबाज फॉम्र्युला येथेही वापरल्याचे दिसून येते. कॉलेजात झालेली मैत्री-प्रेम, मग विरह, मग भेट, मग विरह नि सरतेशेवटी ‘नांदा सौख्य भरे’ची ओळ, ही बॉलीवूडमधील ‘कुछ कुछ होता है’पासूनच्या अनेक चित्रपटांतील घासलेली पटकथा घेऊन चेतनने कादंबरी रचली आहे. नाही म्हणायला त्यात शहरी-ग्रामीण, श्रीमंत-गरीब अशा भेदाची आणि दिल्ली-बिहार-न्यूयॉर्क अशा देशी-परदेशी वातावरणाची मसालेदार फोडणी देण्यात आली आहे; पण तरीही कादंबरी सपक आणि बेचव वाटते. मुळात लेखकच प्रामाणिक नाही. बिहारमधून आलेल्या मुलाला इंग्लिशमधील ‘ओ की ठो’ कळत नाही; पण त्याच्या तोंडून बिहारी संवाद किंवा तशी शैली पुस्तकात क्वचितच आढळते. माधव आणि रिया यांच्यात मैत्रीचा बास्केटबॉल हा समान धागा असतो; पण हा समान धागा सुरुवातीलाच तुटतो. एकसूत्र नसल्याने कहाणी व्यवस्थित गुंफली गेलेली नाही. मधूनच काही तरी वेगळे घडते आणि कहाणी पुढे सरकते, अशा तुकडय़ातुकडय़ांत ‘हाफ गर्लफ्रेंड’ शेवट गाठते.
दुसरी खटणारी गोष्ट आहे- ती म्हणजे माधव झाचे प्रेम. हे प्रेम मनापासूनचे प्रेम आहे की शारीरिक आकर्षण, असा प्रश्न उपस्थित करणारे महत्त्वाचे प्रसंग कादंबरीत येतात. कॉलेजात असताना (केवळ मैत्रीण असलेल्या) रियाचे बळजबरीने चुंबन घेण्याचा माधवचा प्रयत्न एक वेळ तारुण्यसुलभ आकर्षणाच्या निमित्ताने पचूनही जातो; पण काही वर्षांच्या विरहानंतर या दोघांची भेट होते, तेव्हाही माधव रियाशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे त्या त्या प्रसंगातून जाणवते. इतक्या वर्षांनंतर जुने प्रेम आपल्या आयुष्यात कोणत्या तरी निमित्ताने परत आल्यानंतर त्या नात्यात येणारा समजूतदारपणा आणि त्यातील संवेदनशीलता दिसत नाही. त्यामुळे माधव झा हा कादंबरीचा नायक खूपच कमकुवत ठरतो. तीच गोष्ट त्याच्या इंग्लिश बोलण्याची. ‘हायफाय’ इंग्लिश वातावरण असलेल्या कॉलेजातून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतरही त्याला जेमतेम इंग्लिश बोलता येत नाही, हे पटत नाही. रियाला माधवसोबतच्या नात्याला ‘हाफ गर्लफ्रेंड’ असे नाव का द्यावेसे वाटते, हे स्पष्ट करण्याच्या फंदात लेखक पडलेला नाही.
या कादंबरीला आत्मा नाही, ती स्वैर आणि उथळ आहे, हे सगळे मान्य करून या चुकीबद्दल चेतनला माफही करता आले असते. पण एखाद्याकडून पहिल्यांदा चूक झाली, तर ती माफ करता येते. दुसऱ्यांदा झाली, तर त्यावर स्पष्टीकरण मागता येते; पण एकच चूक वारंवार होत असेल तर, त्याला काय म्हणावे?