त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच करिश्मा होता, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची झलक होती. त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षांपासून सुरू झालेल्या कारकीर्दीत त्यांनी शंभर चित्रपट केले, पण त्यातील तीनच लोकांच्या लक्षात राहिले याची त्यांना मुळीच खंत नव्हती. मोजक्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळूनही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्याचे नाव ओमर शरीफ.. त्यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांची भूमिका असलेला डेव्हिड लीनचा १९६२ मधील ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा खरे तर एक महापटच होता, त्यात त्यांची आदिवासी नेत्याची भूमिका होती. शरीफ हे इजिप्शियन होते, पण त्यांच्या खानदानी सौंदर्याच्या छटा मोहवून टाकणाऱ्या होत्या. ते अमेरिकन चित्रपटातील पहिले अरब अभिनेते होते. लीन यांनीच बोरिस पास्तरनाक यांच्या कादंबरीवरून केलेल्या ‘डॉ. झिवागो’मध्ये त्यांनी ‘युरी’ या डॉक्टरची भूमिका केली होती, त्यानंतर त्यांना किमान तीन हजार मुलींनी लग्नासाठी मागणी घातली होती. शरीफ यांचा जन्म अ‍ॅलेक्झांड्रियात मिशेल दिमित्री म्हणून १० एप्रिल १९३२ मध्ये झाला. त्यांचे आईवडील ग्रीक व लेबनित्झ होते. त्यांचे शिक्षण लंडनच्या ‘रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट’ या संस्थेत झाले होते. ‘द ब्लेझिंग स्काय’ या चित्रपटात त्यांना १९५४ मध्ये पहिल्यांदा भूमिका मिळाली. त्याच सुमारास त्यांचे सहअभिनेत्री फतेन हमामा हिच्याशी सूत जुळले. त्यांच्या नावातील ओमर हा शब्द जनरल ओमर ब्रॅडलीवरून घेतलेला, तर शरीफ हे नाव पाश्चात्त्यांना उच्चारण्यास सोपे असे होते. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले व ऑस्कर नामांकनही मिळाले होते. १९६७ च्या सुमारास एका चित्रपटात ज्यू सहकलाकार स्ट्रेइसँड यांच्याबरोबरच्या चुंबन दृश्याने त्यांना इजिप्तचे नागरिकत्व गमावावे लागले होते. ‘शिकागो ट्रिब्यून’साठी ते ब्रिजवरचा स्तंभ लिहीत असत. २००३ मध्ये त्यांना ‘मॉनसियर इब्राहिम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फ्रान्सचा सिझर पुरस्कार मिळाला. ‘द टॅमरिंड सीड’ व ‘द पिंक पँथर स्ट्राइक्स अगेन’, ‘बीहोल्ड द पेल हॉर्स’, ‘चेंगीज खान’, ‘द यलो रोल्स रॉइस’ व ‘द नाइट ऑफ द जनरल्स’, ‘द लास्ट व्हॅली’, ‘द हॉर्समन’, ‘द बर्गलर्स’ हे चित्रपट त्यांनी केले होते. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चित्रपटच त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा होता. तो मिळाला नसता तर सामान्य आयुष्य जगलो असतो, असे त्यांनी ‘टाइम्स’च्या मुलाखतीत म्हटले होते. आता इजिप्तची ओळख पिरॅमिड, उंट अन् ओमर शरीफ अशी आहे, हीच त्यांची कमाई होती.