तरुणाईचा जोश जितका कृतिशील असतो, तितकाच तो विध्वंसक होऊ शकतो. विविध प्रकारच्या मोहमयी माश्या त्यांच्याभोवती घोंगावत असतात व कळत नकळत तरुण मंडळी या मोहाला बळी पडतात. नशेचा मोह तर तारुण्याच्या तीरावरील मंडळींना भलताच आकर्षित करतो. दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत गाडय़ा चालवून अपघात घडविणारे आणि दृष्कृत्ये घडविणारे आपल्या आजूबाजूला सर्रासपणे वावरत असतात. ही तर खरी जागतिक पातळीवरची समस्या आहे.
स्पेनमधल्या विगो युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी तिथल्या कॉलेज युवकांचे सर्वेक्षण घेतले. त्यांनी कॉलेज युवक-युवतीकडून होणारे अल्कोहोल, मादक द्रव्यांचे सेवन, त्यांचे विचित्र खाणेपिणे यांचा आढावा घेत, त्यांची जीवनशैली तपासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना आढळले, की तिथल्या तरुणींमध्ये दारू पिण्याचे व्यसन मोठय़ा प्रमाणात आहे. विशेष म्हणजे तरुण मंडळी या व्यसनाच्या आहारी जाऊन वारंवार मद्यप्राशन करीत असली तरी तरुणी थोडय़ाच वेळात त्यांच्यापेक्षाही जास्त दारू ढोसताना आढळल्या. त्या संशोधकांनी आपल्या युनिव्हर्सिटीतील ९८५ विद्यार्थ्यांची या शास्त्रोक्त सर्वेक्षणासाठी निवड केली होती. त्यात विविध विषयांचा अभ्यास करणाऱ्या आणि वेगवेगळय़ा वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणातील अनेक निष्कर्षांपैकी सर्वात धक्कादायक निष्कर्ष होता की ५६ टक्के कॉलेज युवती दारूच्या आहारी गेलेल्या आढळल्या. या संशोधकांच्या मते, एक विशिष्ट प्रकारचे जनुक या व्यसनाला कारणीभूत असावे.
स्पेनमधल्या व्हॅलेन्सिया युनिव्हर्सटिीतील वैज्ञानिकांनी तरुणाईच्या व्यसनाधीनतेवर आणखी प्रकाश टाकला आहे. दारू पिऊन रस्त्यात धिंगाणा घालायचा, हा जणू तिथल्या तरुणांचा हक्क बनला आहे. पौगंडावस्थेतील तरुण-तरुणींपेक्षा कॉलेजातील मुलेमुली वयाने मोठी असतात व त्यांच्यात तुलनात्मकदृष्टय़ा दारू पिण्याचे प्रमाण जास्त असते, असा समज होता. त्यांचे वाढलेले वय व त्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकणारे मद्य, यामुळे तसे गृहीत धरले जात होते. पण ज्या वेळी व्हॅलेन्सिया, कास्टोलिनो आणि आलिकान्ते या तीन शहरांतील ६००९ मुलांची माहिती गोळा करण्यात आली तेव्हा या विषयाचे दुसरे अंग स्पष्ट झाले. त्या संशोधकांनी २००७ ते २००९ या दोन वर्षांच्या काळात १४ ते २५ वयोगटांतील दारू पिऊन तमाशा केलेल्या नि धिंगाणा घातलेल्या तरुण मंडळींचा भरणा असलेल्या गटाची निवड केली होती. वाढत्या वयामुळे तरुण मुले अधिकाधिक मद्यप्राशन करतात असा अनुभव असताना, या सर्वेक्षणानुसार पौगंडावस्थेत नि तारुण्यात मुले सारख्याच प्रमाणात दारू पिताना आढळली.
जर शाळांतील व कॉलेजांतील मुलांचे दारू पिण्याचे प्रमाण एकसारखे असेल तर शाळांत शिकणारी पौगंडावस्थेतील मुले तारुण्यात प्रवेश करतील तेव्हा त्यांची काय अवस्था असेल, याचा छडा संशोधकांना घ्यायचा होता. या सर्वेक्षणातून आणखी काही धक्कादायक बाबी उघड झाल्या. शाळांत शिकणारी १३-१४ वर्षांची मुले अल्कोहोलचे जादा प्रमाण असलेली दारू पितात, तर कॉलेजातील १४-१५ वयोगटांतील तरुण बीअरसारखे मवाळ मद्य पसंत करतात. याशिवाय आपण वैयक्तिक कारणास्तव दारूचा आधार घेतो असा पौगंडावस्थेतील पोरांचा दावा होता, तर आम्ही केवळ मौजमजेसाठी पितो असे कॉलेजकुमारांचे सांगणे होते.
विशेष म्हणजे या दोन्ही गटांना दारूच्या प्राशनाने होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची फारशी जाणीव झालेली नव्हती. हँगओव्हर, उलटी करणे, रस्त्यावर पडणे, यांसारख्या तत्काळ घडणाऱ्या शारीरिक परिणामांची फक्त माहिती होती. तसेच टीव्हीवरील कार्यक्रमातील जाहिराती मोहिमेत दाखवल्यानुसार मद्यप्राशनाने तुटणारी नाती, भडकूपणा, अपघात यांची खबर होती. या संशोधकांच्या मते, दारूच्या आहारी जाणारी तरुणाई ही समाजाची शोकांतिका ठरू शकते व त्याला वेळीच पायबंद घालणे तितकेच अगत्याचे ठरते.
स्वित्र्झलडमधील स्विस इन्स्टिटय़ूट फॉर दी प्रिव्हेन्शन ऑफ अल्कोहोल अँड ड्रग प्रॉब्लेम्स या संस्थेतील मानसशास्त्रज्ञांच्या मते मुलांच्या मद्यव्यसनाला त्यांचे मातापित्याशी असलेले नाते कारणीभूत असते. ज्या मुलांचे आईवडिलांशी घट्ट संबंध असतात, अशी मुले सहजासहजी दारूच्या आहारी जात नाहीत. विशेष म्हणजे आपले मूल पहिल्यांदा दारूला स्पर्श करते तेव्हा त्यांचे पालक जी भूमिका घेतात ती महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचा संयमी प्रतिसाद किंवा आक्रस्ताळेपणा यावर त्या मुलाच्या व्यसनाधीनतेची पुढची दिशा ठरते. तिथल्या संशोधकांनी ३६४ मुलांचे दोन वर्षांच्या कालावधीत तीनदा सर्वेक्षण घेतले. जी मुले अल्पवयात दारूच्या मोहाला बळी पडली होती त्यांची व्यसनाधीनता उत्तरोत्तर वाढत गेली होती. त्याच वेळेला बालक-पालकातील उच्च दर्जाच्या नात्यामुळे पौगंडावस्थेतील मुले दारूपासून दूर राहताना आढळली.
पौगंडावस्थेतील मुलांना दारूचा स्पर्श करू दिला की ते मद्यप्राशनापासून दूर राहतील असे पालकांना विशेषत: आयांना (चारपैकी एकीला) वाटत असते. तसेच ४० टक्के मातांच्या मते, अशा मुलांना मद्यापासून वंचित केले तर ते त्याकडे अधिकाधिक आकर्षित होत राहतील. नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील अभ्यासूंनी हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी १०५० मतांची आणि त्यांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलांची निवड केली व दर चार वर्षांनी त्यांचे सर्वेक्षण घेतले. परमेश्वराने ‘मना केलेल्या फळा’ने प्रथम मानवाला मोहात टाकले. तद्वतच पौगंडावस्थेतील मुलांची मद्याबाबत अवस्था होत असते, असे पालकांना वाटत असताना संशोधकांना आढळले की अल्पवयात मुलांना दारूची चव कळली तर पौगंडावस्था ओलांडताना मद्यप्राशन ही त्यांची समस्या बनू शकते.
अल्पवयात मद्याची चव चाखलेली मुले तरुणपणी ताणतणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी दारूच्या आहारी गेलेली आढळतात. याशिवाय बाल्यावस्थेतील मद्यप्राशनाने शरीरातील जनुकात बदल घडत असल्याचे शास्त्रज्ञ मंडळींच्या नजरेस आले आहे. यातला आणखी एक कंगोरा लक्षात घ्यायला हवा. काही आया आपल्या दु:खद भावनांना वाट करून देण्यास दारूचा आश्रय घेतात. आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांना त्या मद्याचा वास येतो. अशा मुलांना जेव्हा संशोधकांनी दोन वासांपैकी एकाची निवड करण्यास सांगितले तेव्हा दारूच्या (अल्कोहोल) वासापेक्षा त्या मुलांनी कुजक्या अंडय़ाचा वास देणाऱ्या पिरेडीन या रसायनाला प्राधान्य दिले. मायलेकाच्या नात्यातील एक अनोखा पैलू या दारूच्या वासाने व्यक्त होतो. काही पालक आपल्या वाढत्या वयातील मुलांना जबाबदारीने दारू पिण्याचे शिकवतात. बापाची चप्पल मुलाच्या पायात बसू लागली म्हणजे त्यांच्यात मित्राचे नाते निर्माण होते. मग पिता-पुत्र एकत्र बसून दारू एन्जॉय करू लागतात. मुलांना घरात दारू प्यायला दिली म्हणजे ते बाहेर मित्रमंडळीत मद्यप्राशन करणार नाहीत असे पालकांना वाटते. पण डच संशोधकांनी हा समज खोटा पाडला आहे. नेदरलँडमधल्या ४२८ कुटुंबीयांची यासंदर्भात पाहणी करण्यात आली. प्रत्येक कुटुंबातून १३ व १५ वर्षांची दोन मुलेदेखील या अभ्यासात सामील करण्यात आली होती. मातापित्यांसमवेत घरी मद्यप्राशन करणारी मुले घराबाहेरदेखील तितक्याच प्रमाणात दारू पिताना आढळली. आपल्यासोबत घरात मद्यप्राशन केल्याने मुलांच्या पिण्यावर नियंत्रण राहू शकेल हीदेखील एक भ्रामक कल्पना आहे असे त्या संशोधकांना आढळले. वस्तुत: मुलांना दारू पिण्यास मुळीच प्रोत्साहन देऊ नये, असे या तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
स्वस्त मिळणारी दारू हेदेखील तरुणाच्या व्यसनाधीनतेचे एक कारण आहे, असे इंग्लंडमधील लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सटिीतील संशोधकांना आढळले आहे. मद्यधुंद अवस्थेत कामरंग उधळून त्यानंतर पश्चात्ताप करणे, सार्वजनिक ठिकाणी पिण्यानंतर आपल्या वस्तू विसरून जाणे, भांडणे उकरून काढणे, असले अश्लाघ्य प्रकार तरुणाईत घडताना त्यांनी नमूद केले आहेत. एकूण काय तर तरुणाईतली व्यसनाधीनता ही एकूण मानव समाजाची समस्या आहे व तिच्या खबरदारीचे उपाय योजण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, हेच खरे!
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2013 रोजी प्रकाशित
मद्यप्राशनाच्या विळख्यात तरुणाई
तरुणाईचा जोश जितका कृतिशील असतो, तितकाच तो विध्वंसक होऊ शकतो. विविध प्रकारच्या मोहमयी माश्या त्यांच्याभोवती घोंगावत असतात व कळत नकळत तरुण मंडळी या मोहाला बळी पडतात. नशेचा मोह तर तारुण्याच्या तीरावरील मंडळींना भलताच आकर्षित करतो.

First published on: 12-03-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays youth is addict in alcohol