स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईच्या विस्तारीकरणासाठी वेगवेगळ्या योजना लागू झाल्या. त्यातूनच लगतच्या ठाणे विभागातील वागळे इस्टेट, नवी मुंबईतील बेलापूर पट्टी या ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या. फार मोठय़ा प्रमाणात कामगार, तंत्रज्ञ आणि अधिकारी वर्ग मुंबईच्या परिघात नोकरीनिमित्ताने येऊ लागला. त्यांना घरांची निकड भासू लागली. परिणामी तोपर्यंत गावपण जपलेल्या ठाण्याला शहरीकरणाचे वेध लागले. ठाण्याची हद्द तेव्हा कापूरबाडीपर्यंतच होती. आता मध्यवर्ती ठिकाणी असलेला नौपाडा विभागही तेव्हा पालिका हद्दीबाहेर होता. साठच्या दशकात मात्र परिस्थिती हळूहळू बदलू लागली. बैठय़ा घरांच्या वसाहतींमध्ये अपार्टमेंट संस्कृती रुजू लागली. नेमक्या याच काळात महाराष्ट्रीय कुटुंबातील एका सुशिक्षित तरुणाने बांधकाम व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नाव-मुकुंद काशिनाथ नातू. काशिनाथ नातू तत्कालीन ठाणे नगरपालिकेत मुख्याधिकारी. ते स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधर होते. वडिलांप्रमाणेच मुकुंद नातूही स्थापत्य अभियंता झाले. व्यवसायात येण्याआधी १९६३ पासून त्यांनी वास्तुविशारद म्हणून काम केले. त्या काळात अभियंत्यांना तशी प्रॅक्टिस करता येई. त्या अनुभवाच्या भांडवलावर त्यांनी बांधकाम व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीच्या काळात त्यांना साहजिकच वडिलांच्या ‘गुडविल’चा फायदा झाला. त्या पायावर गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ ‘नातू परांजपे’ नामक बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हतेचा कळस मात्र त्यांनी स्वतकर्तृत्वावर गाठला. तो स्वस्ताईचा काळ होता. नौपाडय़ात तीन रुपये चौरस फूट दराने जमीन विकत मिळत होती. दर चौरस फुटास ३० रुपये इतका बांधकाम खर्च येत असे. सभासदांनी एकत्र येऊन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली की शासनाकडून सहज जमीन मिळत होती. १९६५ मध्ये मुकुंद नातू यांनी सुरुवातीला भास्कर कॉलनीत रिझव्‍‌र्ह बँक कर्मचाऱ्यांची बंगलेवजा वसाहत बांधली. साधारण १६ ते १७ हजार रुपये अशी त्या वेळी त्या बंगल्यांची किंमत होती. आता ज्याला ‘टू बीएचके’ म्हणतात, तशा सदनिका त्या काळात साधारण १५-१६ हजार रुपयांमध्ये सहज उपलब्ध होत होत्या.

अत्यंत पारदर्शी व्यवहार, गुणवत्तेशी कसलीही तडजोड न करता केलेले बांधकाम या वैशिष्टय़ांमुळे अगदी अल्पावधीतच ‘नातू-परांजपे’ यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. चंद्रशेखर परांजपे त्यांचे व्यवसायातील भागीदार. परांजपेही स्थापत्य अभियंता. मुकुंद नातू यांचे धाकटे बंधू माधव नातूही स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन व्यवसायात आले.

ठाणे पूर्व विभागात १६ इमारतींची नातू-परांजपे कॉलनी १९७३ मध्ये उभी राहिली आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून ठाण्याच्या बांधकाम व्यवसायात ही कंपनी नावारूपाला आली. पूर्व द्रुतगती महामार्गाअलीकडच्या म्हणजे आता जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात आतापर्यंत नातू-परांजपे यांनी तब्बल १५०हून अधिक इमारती बांधल्या आहेत. जुन्या ठाण्यात असा एकही रस्ता नसेल, ज्यावर आम्ही बांधलेली इमारत नाही, असे मुकुंद नातू अभिमानाने सांगतात. कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या अनेक सोसायटय़ा नातू-परांजपे यांनी उभारल्या. मात्र घोडबंदर रोड नामक नव्या ठाण्यात नातू-परांजपे यांचा एकही प्रकल्प नाही. त्याऐवजी त्यांनी कळवा, पारसिकनगर परिसरात प्रकल्प करणे पसंत केले.

ये ‘ओसी’ क्या होता है ?

नातू-परांजपे यांनी १९८५ मध्ये उल्हासनगरातील सचदेवनगर येथे १३ इमारती बांधल्या. या वसाहतीत ३५० सदनिका आहेत. इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्थानिक कंत्राटदार मंडळी कौतुकाने साइटवर येत. ‘दो बिल्डिंग के बीच इतनी जगह क्यू छोडी, और एक बिल्डिंग हो सकती थी’ अशा शंका व्यक्त करून सल्ले देत. इमारती पूर्ण झाल्यावर त्यांनी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) साठी पालिकेत अर्ज केला, पप्पू कलानी तेव्हा नगराध्यक्ष होते. ते म्हणाले, ‘ऑक्युपेशन सर्टिफिकेट क्या होता है ?’ मग ठाण्याहून ओ. सी. प्रमाणपत्राचा ड्राफ्ट आणला. त्यावरून प्रमाणपत्र मिळविले. तेरापैकी नऊ इमारतींना तशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविले, अशी एक गमतीशीर आठवण मुकुंद नातू यांनी सांगितली.

बांधलेल्या इमारती तोडल्या

नातू-परांजपे यांनी व्यवसायात गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. मात्र बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना सीमेंट भेसळीच्या प्रकरणात त्यांचीही फसगत झाली. नकळतपणे भेसळयुक्त सीमेंट बांधकामात वापरले गेले. मात्र सुदैवाने त्यांच्या ते वेळीच लक्षात आले. इमारतीचे बांधकाम सुरू होते. काही स्लॅबही घातले होते. मात्र होणाऱ्या नुकसानीची तमा न बाळगता त्यांनी ते तोडून टाकले. मुकुंद नातू म्हणतात, ‘अवघ्या दोन तासांत स्लॅब जमीनदोस्त झाले. तशीच इमारत उभी राहिली असती तर रहिवाशांचे काय झाले असते, विचारही करवत नाही.’ नातू-परांजपे यांच्या सर्व इमारती आता तीन-चार दशकांनंतरही सुस्थितीत असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘टीडीआर सुविधेमुळे काही इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागला. मात्र धोकादायक ठरल्याने एकही इमारत खाली करावी लागलेली नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यात बांधकाम व्यवसायातील कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली. या काळात पाच हजारहून अधिक सदनिका बांधल्या. मात्र त्यात एक इंचही अनधिकृत बांधकाम केले नाही,’ असे ते सांगतात.

ठाण्याबाहेरही ठसा

गेली काही वर्षे ठाण्याबाहेरही या कंपनीने आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात जम बसल्यानंतर १९७९ पासून ही कंपनी पुण्यात कार्यरत आहे. पुणे शहरात कोरेगांव पार्क, जंगली महाराज रोड, सातारा रोड, डेक्कन जिमखाना आदी विविध ठिकाणी नातू-परांजपे यांनी ६५ इमारती बांधल्या. २००२ पासून नातू-परांजपे मुंबईतील गिरगावमध्ये इमारती बांधत आहेत. त्याचप्रमाणे दादर, माटुंगा, वांद्रे येथेही इमारतींची कामे सुरू आहेत. महाराष्ट्राबाहेरही बंगळुरू येथे नातू-परांजपे यांचा प्रकल्प सुरू आहे. बंगळुरूला सात मजली इमारत असून प्रत्येक मजल्यावर २४ सदनिका आहेत. आता भविष्यात कर्जत, अलिबाग परिसरात कंपनी गृहनिर्माण प्रकल्प राबविणार आहे.

तिसरी पिढीही कार्यरत

मुकुंद नातू यांचा मुलगा समीर नातू १९९६ पासून कंपनीचे व्यवस्थापन पाहत आहे. आजोबा आणि वडिलांप्रमाणे तेही स्थापत्य अभियंता आहेत. नातू-परांजपे या कंपनीसोबतच त्यांची ‘इशान डेव्हलपर्स’ या नावाने स्वत:ची स्वतंत्र कंपनी आहे.