एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, कर्तृत्व यावरून समाजात त्या व्यक्तीचे वेगळेपण ठरत असते. व्यक्तीच्या विशिष्ट वैशिष्टय़ांमुळे तिची स्वतंत्र ओळख तयार होत असते. प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा काही वेगळे नाही. प्रत्येक प्राणी त्याच्या वेगळ्या वैशिष्टय़ांमुळे लोकप्रिय ठरतो. श्वान प्रजातींमध्ये जगभरात प्रसिद्ध असणारी आणि लोकप्रिय असणारी जात म्हणजे डॉबरमन.
गवेगळय़ा जातीतील श्वानाचे मिश्रण असलेली, ताकदवान आणि संरक्षणासाठी उत्तम अशी डॉबरमनची ओळख सर्वज्ञात आहे. मात्र या प्रजातीमागे एक रंजक इतिहास आहे. १८९०च्या सुमारास जर्मनीतील अल्पोडा गावात कार्ल फ्रेडरिक लुईस डॉबरमन हा सरकारी कर वसुलीदार कार्यरत होता. गावातील भटक्या कुत्र्यांना पकडून निवारा केंद्रात ठेवण्याची जबाबदारीही त्याच्याकडे होती. कर वसुलीदार म्हणजे अर्थात भरपूर पैसा. या पैशाचे रक्षण करणे हे मोठे जिकिरीचे काम. त्यामुळेच लुईसने कुत्र्यांना यासाठी प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. मात्र, ताकद, चपळाई, प्रामाणिकपणा, सोशिकता आणि हुशारी असे सर्व गुण असलेला श्वान आपल्याकडे असावा, अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली. यातूनच मिश्र प्रजातीच्या संगमातून नव्या श्वानाचा जन्म झाला. तोच डॉबरमन. लुईसने संकरित केलेल्या या वंशाच्या कुत्र्यांना मागणी वाढत गेली. वेगासाठी ग्रेहाउंड, जड डोके आणि लहान पाय यासाठी रॉटव्हीलर, ओल्ड जर्मन पिन्श्चर, वेमार्नर, ब्लू डेन, मॅन्चेस्टर पेरियर, इंग्लिश ग्रेहाउंड यांसारख्या निरनिराळ्या जातीपासून हे डॉबरमन जातीचे श्वान बनले आहे. कालांतराने अमेरिका देशात ही जात तयार करण्यास सुरुवात झाली आणि अलीकडे जगभरात डॉबरमन ही कुत्र्याचे जात लोकप्रिय ठरत आहे.

वैशिष्टय़े
डॉबरमन ही प्रजाती मालकाच्या संरक्षणासाठी ओळखली जाते. ताकदवान, मजबूत शरीरयष्टी, चौकस वृत्ती, रागीट आणि हट्टी स्वभाव ही डॉबरमनची शारीरिक आणि स्वभावाची वैशिष्टय़े. आपल्या मालकाशी निष्ठावान असलेले हे डॉबरमन संरक्षणासाठी सज्ज असतात. हे श्वान गर्दीतही बिथरत नाही. साधारण इतर जातीचे कुत्रे प्रतिकूल परिस्थितीत बचावात्मक माघार घेतील, मात्र डॉबरमन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता संरक्षणासाठी धावून जातात. त्यामुळे डॉबरमन पाळण्याकडे अनेकांचा ओढा असतो. अर्थात त्यातही नर डॉबरमनपेक्षा मादी आपल्या मालक आणि कुटुंबाशी भावनिकदृष्टय़ा अधिक जोडली जाते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?

प्रशिक्षण
साधारण २ ते ३ महिन्यांपासून या श्वानांना भाषिक प्रशिक्षण सुरू करावे लागते, ज्यात स्वत:चे नाव ओळखणे, सुचनांचे पालन करणे, शौचास जाण्याचे ठिकाण कळणे या सर्वाचे प्रशिक्षण दिले जाते.
४ ते ५ महिन्यांनंतर न खेचता चालायला शिकवणे गरजेचे असते. यात स्टॉप, सीट, डाऊन यांसारख्या काही कमांड शिकवल्या जातात.
६ ते ८ महिन्यांपर्यंत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते. डॉबरमन कुत्र्याचे पिल्लू जन्मत:च चौकस वृत्तीचे असल्याने जसे वय वाढत जाते तशी या कुत्र्यांची चौकस वृत्ती वाढत जाते.
या श्वानांचा स्वभाव हट्टी असल्याने त्यांच्यावर एखाद्या व्यक्तीचा धाक असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना सांभाळणे कठीण जाते.
या श्वानांना कडक शिस्त लावावी लागते. ते सतत हालचाली करण्यासाठी उत्सुक असतात, असे कुत्र्यांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणारे सागर हर्शे यांनी सांगितले.

गुन्ह्य़ांच्या तपासासाठी उपयुक्त
या कुत्र्यांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या गंधाच्या आधारे माग काढण्याची क्षमता भरपूर असते. म्हणूनच पोलीस किंवा सैन्य दलात या कुत्र्यांचा उपयोग होतो. मात्र बॉम्बनाशक पथकामध्ये सहसा हा कुत्रा वापरत नाहीत, कारण मुळात हा कुत्रा जास्त आत्मविश्वासू, अतिशय चपळ असल्याने पटकन बॉम्बवरसुद्धा झडप घालण्याची शक्यता असते.
खाणे, व्यायाम आणि आजार
डॉबरमनच्या खाण्याविषयीच्या वेगळय़ा आवडीनिवडी नसतात. शाकाहारी किंवा मांसाहारी हे दोन्ही खाद्यप्रकार ते तितक्याच आवडीने खातात. ते सहसा आजारी पडत नाहीत. मात्र, काही प्रमाणात त्यांना गॅस्ट्रोची लागण होण्याची शक्यता असते. अर्थात उत्तम रोगप्रतिकारक क्षमतेमुळे ते लवकर बरे होतात. योग्य आहार, व्यायाम यामुळे ११ ते १२ वर्षे हे कुत्रे जगू शकतात.

‘ती आमच्या कुटुंबातलीच’
ठाण्यातील वैष्णवी शंकपाळ यांच्या घरी डॉबरमन मादी जात आहे. लुसी या नावाने घरातील सदस्य तिला हाक मारतात. पाच महिन्यांच्या लुसीला शंकपाळ कुटुंबीयांनी नुकतेच प्रशिक्षण सुरू केले आहे. लुसी अतिशय हुशार आणि कुटुंबीयांबद्दल आपुलकी असणारी आहे. आपली गाडी कोणती हे लुसीला योग्य ओळखता येते. लुसीचे वैशिष्टय़ म्हणजे तिला रागावलेले कळते आणि वाईट वाटल्यावर घरातील कोणाही सदस्याजवळ तक्रार करते. गंमत म्हणजे लुसीला पाणी प्यायला आवडत नाही मात्र बर्फ खूप आवडीने खाते. तसेच संपूर्णत: शाकाहारी आहार घेत असून गाजर, फळ, वरण-भात खाण्यासाठी लुसीची पसंती आहे. घरच्या सदस्यांसारखीच लुसी असल्याने प्रेमाचे संबंध लुसीशी तयार झाले आहेत, असे वैष्णवी शंकपाळ यांनी सांगितले.

शेपूट कापण्याचे रहस्य
डॉबरमनचे शेपूट कापलेले असते. याचे कारणदेखील त्याच्या उगमातच दडलेले आहे. लुईसकडे डॉबरमन मादीने जन्म दिलेल्या एका पिल्लाला जन्मत:च शेपूट नव्हती. हे शेपूट नसलेले पिल्लू दिसायला आकर्षक होते. तेव्हापासून लुईसने या कुत्र्यांची शेपूट कापण्यास सुरुवात केली आणि आपल्या नावाने शेपूट नसलेल्या कुत्र्यांचा हा ट्रेड मार्क तयार केला. इतरांनी सुद्धा याचे अनुकरण केले आणि आता जगभरात या कुत्र्यांचे शेपूट कापण्याचा ट्रेंड तयार झाला आहे.