नाराज नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेला शह देण्याच्या रणनितीला खीळ
ठाणे महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेसोबत दोन हात करायचे बेत आखत स्वत:ची ताकद अजमावू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला किसन नगर आणि कळव्यात झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे जोरदार धक्का बसला असून पक्षाच्या संघटनात्मक मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. या दोन्ही प्रभागांमधील निवडणुक भाजपने मोठय़ा प्रतिष्ठेची केली होती. असे असताना दोन्ही ठिकाणी पक्षाला मोठय़ा फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे इतर पक्षांतील नाराजांवर गळ टाकत शिवसेनेला तगडे आव्हान उभे करण्याच्या भाजपच्या मनसुब्यांनाही तडे बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेपाठोपाठ पुढील वर्षी होणारी ठाणे महापालिकेची निवडणूकही स्वबळावर लढविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. ठाणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी झालेले घोटाळे पुन्हा बाहेर काढण्याची तयारीही यानिमित्ताने सुरू झाली असून नगरविकास विभागाने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांमागील राजकीय हेतू स्पष्ट होऊ लागला आहे. राज्यातील भाजप सरकारने नगरविकास विभागाच्या माध्यमातून शिवसेनेने घेतलेले काही वादग्रस्त निर्णय रद्द करण्याचा सपाटा एकीकडे लावला असला तरी स्थानिक भाजप नेत्यांना मात्र या निर्णयांचा राजकीय लाभ उचलता आलेला नाही. ठाणे महापालिकेत भाजपचे आठ नगरसेवक असले तरी मिलिंद पाटणकर यांच्यासारखा एखादा अपवाद वगळला तर इतर नगरसेवकांचे अस्तित्वही जाणवत नाही, अशी परिस्थिती आहे. महापालिकेतील स्थायी समितीसारखे महत्त्वाचे पद भाजपकडे आहे. मात्र, महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरू असलेल्या उद्योगांमुळे या आघाडीवरही पक्षाचा कारभार वादग्रस्त ठरण्याची चिन्हे अधिक आहेत.

शिवसेना,भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची
दरम्यान, साडेचार वर्षांपूर्वी झालेली महापालिका निवडणुकीत विटाव्याची जागा भाजपने लढवली होती. त्यामुळे यंदाही ही जागा शिवसेनेने सोडावी, असा आग्रह भाजपने धरला होता. मात्र, काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजा गवारी शिवसेनेत आल्याने हा प्रभाग भाजपला सोडण्यास शिवसेना नेते तयार नव्हते. त्यामुळे स्वतंत्र निवडणूकीसाठी आग्रही असलेल्या भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबई शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनीही या प्रभागात जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
मतेम सहा महिने मुदतीचे असलेल्या या निवडणुकीत पैशाचे पाट वाहिल्याची चर्चाही आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात विटाव्यातून शिवसेनेने तब्बल १८८५ मतांनी विजय मिळवत भाजपला अस्मान दाखविले आहे. तर किसन नगर येथील भटवाडी भागातील बालेकिल्ल्यात मात्र शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागात भाजपला जेमतेम आठशेच्या आसपास मते मिळाली.

निवडणूक मोजणीसाठीच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी
ठाणे : ठाणे शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या गजानन महाराज चौकाजवळील वारकरी भवनमध्ये सोमवारी महापालिका क्षेत्रातील दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी ठेवण्यात आली होती. या मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर शंभर मीटर परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने आसपासच्या भागांतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. राम मारुती रोड, अल्मेडा चौक, वंदना सिनेमागृह, दगडी शाळा आणि गडकरी परिसरात वाहनांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. तर ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागत होती.
या मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. तसेच निवडणूक नियमानुसार शंभर मीटर परिसरात बॅरेकेटिंग केले होते. त्यामुळे गडकरी रंगायतन येथून दगडी शाळेमार्गे गजानन महाराज चौकातील रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होता. याशिवाय, गजानन महाराज चौकातून राम मारुती रोडकडे जाण्यासाठीचा काही भाग वाहतुकीसाठी बंद केल्याने वारकरी भवन परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

दादोजी कोंडदेवसाठी पोलीस आग्रही
ठाणे महापालिका क्षेत्रातील पोटनिवडणुकांची मतमोजणी यापूर्वी दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात घेण्यात आली आहे. या ठिकाणामुळे पोलिसांना फारसा बंदोबस्त तैनात करावा लागत नाही, तसेच रस्त्यावरील वाहतुकीस फारशी अडचण होत नाही. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील वारकरी भवनमध्ये सोमवारी मतमोजणी घेण्यात आल्यामुळे पोलिसांना जास्त मनुष्यबळ तैनात करावे लागले होते. याशिवाय, या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या पाश्र्वभूमीवर पुढच्या निवडणुकांसाठी हे ठिकाण ठेवू नये, यासाठी पोलिसांकडून पालिकेला पाठविण्यात आले आहे.