अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या २२ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपचे परस्परविरोधातील आरोप-प्रत्यारोप, बडय़ा नेत्यांनी पिंजून काढलेले प्रभाग आणि आश्वासनांचा पाऊस पाडल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर निवडणुकीच्या पडद्यामागच्या खलबतांना वेग आला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते फोडणे, मतांसाठी पैसेवाटप असे गैरप्रकार मतदानाच्या दिवशी सकाळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अंबरनाथमधील ५७ जागांसाठी एकूण ३२० उमेदवार रिंगणात आहेत, तर बदलापूरमध्ये ४७ जागांवर १५० जण आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी काही जागांवर अन्य कोणताही उमेदवार न उरल्याने तेथील मतदान प्रक्रिया बाद होऊन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, उरलेल्या जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दोन्ही शहरांत धुमशान मांडले होते. त्यातही शिवसेना आणि भाजप हे राज्य आणि केंद्रात मित्र असलेले पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. प्रचाराच्या काळात सर्व पक्षांतील बडय़ा-बडय़ा नेत्यांनी येथे हजेरी लावून एकमेकांवर टीकास्त्र सोडले. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे जिल्ह्य़ाचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी सभा घेत जनतेकडे कौल मागितला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या जाहीर सभेत बदलापूरची जबाबदारी स्वीकारण्याची हमी दिली. एकनाथ शिंदे यांनी चौकसभांवर भर दिला, तर आव्हाड यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कोपरा सभा घेतल्या. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जातपडताळणीच्या निर्णयावर टीका करत युतीकडे सरकार चालवण्याची क्षमता नसल्याचे सांगितले.
सेना-भाजपचा स्वबळाचा धावा
केंद्रात, राज्यात इतकेच काय हाकेच्या अंतरावर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये युती असलेले सेना-भाजप हे दोन्ही पक्ष अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत. विधानसभा निवडणुकीतील भाजपचे यश हे लाटेचा परिणाम होता हे सिद्ध करण्यास शिवसेना उत्सुक असून त्यासाठी सेनेने जिल्ह्य़ातील सारी ताकद प्रचारात पणाला लावली होती. भाजपनेही सेनेच्या तोडीस तोड प्रचार केला. मात्र एकमेकांवर थेट आरोप करणे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार कपिल पाटील तर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरमधील प्रचारसभेत भाजपला स्वबळाची सत्ता द्या, असे आवाहन केले. शिवसेनेनेही केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींच्या प्रचारसभांबरोबरच अखेरच्या टप्प्यात आदित्य ठाकरेंचा रोड शो करून दोन्ही शहरांमध्ये वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
हिंसाचाराचे गालबोट
यंदा प्रथमच बदलापुरातील निवडणुकीच्या राजकारणाला हत्येसारख्या घटनांचे गालबोट लागले. भाजपच्या राजेंद्र लाड या कार्यकर्त्यांने राजकीय फायद्यासाठी शिवसेना उपशाखाप्रमुखाची हत्या केली. त्यामुळे बदलापुरात काही काळ तणाव पसरला होता, तर प्रभाग क्रमांक ९मधील आशीष दामले व प्रभाकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडले.
पोलिसांची तारांबळ
या निवडणुकीत बदलापुरात हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. निवडणूक काळात १४४ (१) नुसार १२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून बदलापूर पश्चिमेला शस्त्र परवानाधारकांची ४८ शस्त्रे जमा करण्यात आली आहे. बदलापूर पूर्वेला ४२ परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच येथे ३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून कलम १४९ प्रमाणे ५४ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या. दहा उमेदवारांना त्यांच्या मागणीवरून पोलीस संरक्षण पुरविण्यात आले, तर जवळपास १५ प्रभाग हे संवेदनशील घोषित करण्यात येणार आहेत.