वसईतील क्रिकेट स्पध्रेमध्ये अनोखी बक्षिसे

स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये विजेता-उपविजेता संघ, मालिकेत चमकदार कामगिरी करणारे खेळाडू यांना आयोजकांकडून लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात, पण ही बक्षिसे असतात रोख रकमेच्या किंवा वस्तू स्वरूपात. मात्र वसईच्या स्थानिक क्रिकेट मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट मालिकेमध्ये विजेत्या संघाला आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बकरे, गावठी कोंबडय़ा आणि अंडी अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. वसईच्या उमेळमान गावात रविवारी ही स्पर्धा रंगणार आहे.

उमेळमान गावातील ‘साई साई मित्र मंडळाच्या’वतीने दरवर्षी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येते. या गावातीलच स्थानिक तरुणांचे संघ या स्पध्रेत सहभागी होत असतात. यंदा स्पध्रेतील विजेत्यांना रोख रक्कम न देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. यासाठी मंडळाने आगळीवेगळी शक्कल लढवली आणि बकरा क्रिकेट स्पध्रे आयोजन करण्यात आले. २६ मार्च रोजी उमेळमान गावात ही स्पर्धा होणार असून बकरे, कोंबडय़ा आणि अंडी यांची लयलूट करण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे.

रोख रकमेपेक्षा बकऱ्या आणि अंडी बक्षिसे म्हणून ठेवल्याने ही स्पर्धा चर्चेचा विषय बनली आहे. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत. हे मंडळ कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसून गावातील तरुणांसाठीच ही स्पर्धा असल्याने अशी बक्षिसे ठेवल्याचे मंडळाचे सागर पाटील यांनी सांगितले.

स्पध्रेतील बक्षिसे

  • स्पध्रेतील विजेता संघ : २५ किलोचा बकरा आणि चषक.
  • उपविजेता संघ : पाच गावठी कोंबडय़ा
  • तिसऱ्या क्रमांकाचा संघ : दोन डझन गावठी कोंबडीची अंडी.
  • सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, सामनावीर पुरस्कार : अंडी, कोंबडय़ा.

नोटाबंदीमुळे पैशांची चणचण होती. स्पर्धा भरवून त्यातील आकर्षण कायम ठेवायची होती. त्यासाठी आम्ही अनोखी बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दिवशी मैदानात कोंबडय़ा आणि बकऱ्या आणून ठेवल्या जातील. स्पध्रेनंतर गावातही झकास मेजवानीचा बेत आहे.

सागर पाटील, साई साई मंडळ.