वर्षभरात ३५० वृक्षांची लागवड करून जोपासना

रिक्षा म्हणजे कटकट, वैताग आणि मनस्ताप अशीच बहुतेकांची धारणा. मात्र ठाण्यातील काही संवेदनशील रिक्षाचालकांनी वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबवून शहराच्या पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचलत आपली ही बदनाम ओळख पुसून टाकण्याचा निर्धार केला आहे. हिरवाई टिकविण्याच्या निर्धाराने प्रेरित झालेल्या ठाण्यातील सुमारे ४० रिक्षाचालकांनी वर्षभरात तब्बल ३५० वृक्षांची लागवड करून त्याची नियमित जोपासना सुरू केली आहे. रिक्षात पाण्याचा कॅन ठेवून हे रिक्षाचालक येता-जाता झाडांना पाणी घालतात.

या हिरव्या मोहिमेची सुरुवात इंदिरानगरमधील रूपादेवी टेकडीवर झाली. तिथे राहणाऱ्या पुरुषोत्तमलाल गुप्ता या रिक्षाचालक असणाऱ्या गृहस्थांना झाडांची खूप आवड आहे. गेल्या वर्षभरात शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरणात शेकडो वृक्षांची तोड केली. आपल्या परीने त्याची भरपाई करण्याचा उपक्रम गुप्ता यांनी सुरू केला. सुरुवातीला त्यांनी उपवन येथे वृक्ष लागवड केली. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेतली. केवळ झाडे लावूून ते थांबत नाहीत. ती वाढावीत म्हणून त्यांना ते नियमितपणे पाणी घालतात. ‘झाडांना पाणी घालण्यासाठी रिक्षात नेहमीच २० लिटरचे कॅन ठेवतो,’ अशी माहिती पुरुषोत्तमलाल गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

त्यांचे पाहून आता शहरातील सुमारे ४० रिक्षाचालक या हिरव्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. सध्या महिन्याच्या एका रविवारी त्यांच्या परिसरातील विद्यार्थी आणि रिक्षाचालक एकत्र येऊन ठाण्यातील हाईड पार्क, एव्हरेस्ट वर्ल्ड, कोलशेत, ढोकाळी, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आदी भागांमधील मोकळ्या जागांवर त्यांनी वृक्षारोपण केले. सध्या ते लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाचे कार्य करत आहेत. सद्भावना उपक्रमात पावसाळ्यात वृक्षारोपण करणे आणि उन्हाळ्यात वृक्षांना पाणी देण्याचे कार्य रिक्षाचालकांचा हा गट करतो. त्यांनी लावलेल्या झाडांच्या नोंदी करून त्या झाडाची होणाऱ्या वाढीकडे त्यांचे कायम लक्ष असते.