पीडित मुलीच्या वडिलांकडून सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे

तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून ठाणे स्थानकातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असताना सुरक्षा यंत्रणा ढिम्म आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेसाठीच्या उपाययोजनेची पडताळणी करण्यासाठी तक्रारदार तरूणीच्या वडिलांनी बुधवारी तिकीट तपासनीस असल्याचा दावा करून स्थानक परिसरात प्रवाशांची तिकीटे तपासली. यावेळी कोणत्याही सुरक्षा यंत्रणेने त्यांना हटकले नाही. तसेच परिसरात अद्याप सीसीटीव्ही लावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बदलापूर येथे राहणारी १७ वर्षीय मुलगी ठाणे स्थानकात बारावीच्या शिकवणीसाठी येते. काही दिवसांपूर्वी ती घरी जाण्यासाठी सॅटीसवरील तिकीट घराजवळून ती रेल्वे पुलावर येताच तेथे एका बोगस तिकीट तपासनीसाने तिला अडवून तिच्याकडे तिकिटाची विचारणा केली. त्यावेळी तिने आपल्या जवळचा रेल्वेचा पास दाखवला. मात्र, तरीही तुला मोठय़ा साहेबांकडे यावे लागेल, असे सांगून त्याने तिचा हात पकडला आणि स्थानकाबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणीने मोठय़ा हिमतीने त्याच्या हाताला झटका देऊन आपला बचाव केला.

याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आहे. या मुलीच्या वडीलांनी या परिसरातील सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकात काही प्रवाशांची तिकीट तपासणी केली. यावेळी त्यांना त्या परिसरात सीसीटीव्ही लावल्याचे अथवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे आढळून आले. यामुळे मुलीचे शिक्षण ठाणेऐवजी बदलापूर येथील महाविद्यालयात घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.दरम्यान, सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे स्पष्ट करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

सीसीटिव्हीसाठी २५ हजार

अपहरणाच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी रेल्वे आणि ठाणे महापालिका प्रशासनाकडे सीसीटीव्ही लावण्याबाबत विचारणा केली. मात्र, याबाबत टोलवाटोलवी करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर या मुलीने पालकांनी तिच्या नावे शिक्षणासाठी ठेवलेली २५ हजारांची बचत ठेव मोडून ती रक्कम या पुलावर सीसीटिव्ही लावण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.