ठाणे : लोकसभा मतदान पार पडत असल्याने महावितरण कंपनी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याचे खोदकाम करू नये असे आदेश दिले होते. असे असतानाही सोमवारी सायंकाळी एका ठेकेदाराने मुजोरी करत चक्क मतदान यंत्रणा ठेवलेल्या जागेत म्हणजेच, दक्षता सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रुम) असलेल्या भागात रस्ते दुरुस्तीसाठी खोदकाम केले. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सुदैवाने स्ट्राँग रुमच्या विद्युत वाहिनी तुटली नाही. अन्यथा येथील यंत्रणा ठप्प झाली असती. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात खोदकाम करणारी कंपनी लँडमार्क काॅर्पोरेशन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासारवडवली येथील एका शाळेमध्ये स्ट्राँग रुम स्थापन करण्यात आले आहे. या स्ट्राँग रुममध्ये मतदान यंत्र ठेवले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोठ्याप्रमाणात यंत्रणा येथे स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांही येथे कडेकोट बंदोबस्त असतो. येथील विद्युत पुरवठा खंडीत केला जाऊ नये यासाठी महावितरण कंपनीने ठाणे महापालिका, एमएमआरडीए यासह सर्वच यंत्रणांना घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा ते कावेसर पर्यंत खोदकाम करू नये अशी सूचना केली होती. घोडबंदर भागात मे. लँडमार्क काॅर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीला ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचा ठेका दिला आहे. या कंपनीलाही खोदकाम करू नये असे आदेश महापालिकेने दिले होते. असे असतानाही कंपनीने स्टाँग रुम पासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर खोदकाम करून विद्युत वाहिनी तोडली. सुदैवाने स्ट्राँग रुमच्या विद्युत वाहिनीला धक्का लागला नसल्याने येथील विद्युत पुरवठा सुरळीत होता. परंतु एक विद्युत वाहिनी तुटल्याने येथील परिसरातील इतर भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला.
हेही वाचा : कल्याण लोकसभा शहरी, ग्रामीण भागात मतदार स्वयंस्फूर्तीने रांगेत; अनेक मतदारांची नावे यादीतून गायब
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणने मे. लँडमार्क काॅर्पोरेशन प्रा. लि.विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठेकेदाराने यापूर्वी अशाचप्रकारे अनेकदा खोदकाम करून विद्युत वाहिन्या तोडल्या आहेत अशी माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.