माणसाच्या कुठल्याही छंदात त्याचे कुटुंबीय सहभागी असले की त्या छंदाला एक वेगळीच झळाळी येते. रिझव्र्ह बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या मधुकर सरपोतदार यांच्या बाबतीतही काहीसं असंच आहे. त्यांना स्वत:ला तर रेकॉड्स जमवण्याची, जुनी गाणी, चित्रपट या सगळ्याची आवड आहेच पण त्यांच्या पत्नी मेधा सरपोतदार यासुद्धा त्यांच्या या छंदात बरोबरीने सहभागी आहेत. कुठलंही जुनं गाणं, चित्रपट, कलाकार यांचे सगळे संदर्भ त्यांना अगदी चुटकीसरशी आठवतात. या दोघांशी गप्पा मारणं म्हणजे एखाद्या संगीत मैफिलीत जाण्यासारखंच आहे.
सरपोतदार हे लहान असताना त्यांच्या घरी असलेल्या रेडिओवर ते गाणी ऐकायचे. त्या वेळी गोवा भारतात सामील झालं नव्हतं. मात्र, रेडिओवरच पणजी स्टेशन आपल्याकडे सुस्पष्ट लागत असे. त्यावर मराठी गाण्यांचाच भरणा असे. ही गाणी ऐकण्याचा सरपोतदार यांना छंदच लागला. ते पाहून त्यांच्या वडिलांनीही घरी एक रेकॉर्ड प्लेअर आणला. प्रल्हाद िशदे, कृष्णा िशदे वगरे सगळ्यांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या घरी होत्या. त्या वेळी सरपोतदार यांचे वडील गिरगावातल्या घैसास आणि कंपनीकडून रेकॉर्ड्स घेत असत. सरपोतदारकाकांनी पहिली रेकॉर्ड घेतली ती १९७०च्या सुमारास. त्या वेळी लता मंगेशकर, मोहम्मद रफी वगरे लोकप्रिय गायकांच्या रेकॉर्ड्स साधारणपणे लोक घेत असत. काका मात्र कोणत्याही गायक – गायिकांच्या रेकॉर्ड्स तितक्याच आवडीने घेत असत. त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या गायकांच्या अनेक दुर्मीळ रेकॉर्ड्स जमा झाल्या.
काकांशी बोलता बोलता ‘सुपर सेव्हन’ रेकॉर्ड्सबद्दल कळलं. आत्तापर्यंत ‘एलपी’, ‘ईपी’ ‘७८ आरपीएम’ च्या रेकॉर्ड्स माहीत होत्या. पण ‘सुपर सेव्हन’ हे प्रकरण नव्यानेच ऐकलं. ‘सुपर सेव्हन’ म्हणजे रेकॉर्डचा आकार ई.पी. एवढा असतो पण स्पीड मात्र ‘एलपी’ इतका असतो. त्यामुळे अशा रेकॉर्डमध्ये सहा गाणी असतात. ही माहिती सांगता सांगताच काकांनी त्यांचा खजिना खोलण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडच्या १९३४-३५ सालापासूनच्या रेकॉर्ड्स हाताळताना वेगळाच अनुभव आला. त्यात जी. एन. जोशी यांचं ‘तुलसीदास’ या सिनेमातलं िहदी गाणं होतं, मनहर बर्वे यांनी वाजवलेले घुंगरू तरंग, काष्ठ तरंग होते, १९४०च्या आधीच्या ‘शराबी’ चित्रपटातलं ज्ञान दत्त यांचं गाणं होतं, अभिनेत्री ललिता पवार यांच्या आवाजातलं ‘दुनिया क्या हैं’ चित्रपटातलं गाणं होतं, मालती अलूरकर यांच्या आवाजातली गाणी, दुर्गा खोटे, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर, लोंढे यांच्या आवाजात मो. ग. रांगणेकर लिखित ‘शंभरावी मुलगी’, मास्टर मदनच्या आवाजातली ‘दानापानी’ची रेकॉर्ड, गडकरी यांच्या छोटय़ा नाटकाची रेकॉर्ड, लग्नविधींची रेकॉर्ड, मनहर कपूर यांच्या आवाजातली सगल यांच्या ‘दुनिया रंग रंगिली’च्या चालीवर आधारित ‘मं मन की बात बताऊ’ या गाण्याची रेकॉर्ड अशा अनेक दुर्मीळ रेकॉर्ड्स होत्या.
काही आठवडय़ांपूर्वी गोिवदराव टेंबे यांच्याबद्दलच्या लेखात त्यांच्याकडे ऐकलेल्या बाबूजींच्या आवाजातल्या ‘सागरा प्राण तळमळला’बद्दल लिहिलं होतं. सरपोतदार काकांकडे याच कवितेची आणखी एक चाल ऐकायला मिळाली. प्रसिद्ध कीर्तनकार गोिवदस्वामी आफळे यांच्या आवाजातली ही कविता त्यांच्याकडे एकाच रेकॉर्डवर दोन भागांत आहे. अत्यंत साधी, सोपी-वर्गात शिक्षकांनी मुलांना कविता शिकवल्यासारखी चाल आहे. त्यामुळे ऐकताना शब्द नीट कळत होते आणि त्या सहजतेमुळे कविता अगदी मनापर्यंत पोहोचत होती.
सरपोतदारकाकांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी जमवलेली जुन्या काळातल्या अभिनेते-अभिनेत्री यांची छायाचित्रे. कुठल्याही मासिकातला किंवा वृत्तपत्रातला एखादा फोटो आवडला की काका तो फोटो एन्लार्ज करून घेतात. अशा अनेक दुर्मीळ फोटोंचा त्यांच्याकडे संग्रह आहे. मधुबाला, नíगस, नूतन यांचे फोटो तर बघतच राहावंसं वाटतं! काकांशी गप्पा मारता मारता त्यात काकूही सहभागी झाल्या आणि एकेक किस्से सांगायला लागल्या. काकूंना जुने चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड. त्या आवडीपायी लहान मुलींना गिरगाव-दादरला ट्रेनच्या गर्दीतून घेऊन जाऊन एकाच दिवशी वेगवेगळ्या चित्रपटांचे लागोपाठ तीन खेळ त्यांनी बघितले होते, सकाळी साडेनऊ वाजताचा खेळ बघितला होता! हे किस्से ऐकता ऐकता आणि जुनी जुनी, दुर्मीळ गाणी रेकॉर्ड प्लेयरवर ऐकत ती संध्याकाळ कधी संपली ते कळलंच नाही!
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2015 रोजी प्रकाशित
दुनिया रंगरंगिली
माणसाच्या कुठल्याही छंदात त्याचे कुटुंबीय सहभागी असले की त्या छंदाला एक वेगळीच झळाळी येते. रिझव्र्ह बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या मधुकर सरपोतदार यांच्या बाबतीतही काहीसं असंच आहे.

First published on: 27-05-2015 at 01:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhukar sarpotdar collector of song recordings