शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येत असल्याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी कळवा नाका येथे केलेल्या आंदोलनामुळे ठाण्यासह नवी मुंबई, कल्याण, भिवंडी येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तब्बल दोन तास कोंडी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून आणलेल्या छत्रपती शिवाजींच्या अर्धपुतळय़ाची आरती करून १५ मिनिटांत आव्हाड येथून चालते झाले. मात्र, यानिमित्ताने आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याची संधी न सोडता त्यांच्या कार्यकर्त्यांनी कळवा नाक्यावरील वाहतूक अक्षरश: रोखून धरली. सकाळी भरगर्दीच्या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई येथे ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे कळवा नाका नेहमीच गजबजलेला असतो. विशेषत: सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच बुधवारी सकाळी आव्हाडांच्या आंदोलनामुळे वाहनांच्या कोंडीत भर पडली. बुधवारी सकाळी घोषणा देत कळवा चौकात उतरलेल्या आव्हाड समर्थकांनी कळवा नाक्यावरील वाहतूक रोखून धरली. येथील पूर्णाकृती पुतळ्यासमोर मांडून कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या जमावामुळे या भागात अभूतपूर्व कोंडी झाली. आंदोलक वाहतूक पोलिसांनाही जुमानत नव्हते. सुमारे दीड ते
दोन तास असेच चित्र राहिल्याने
संपूर्ण परिसर वाहनांनी गजबजून गेला होता.
कार्यकर्त्यांकरवी शक्तिप्रदर्शन करवून घेतल्यानंतर आव्हाड चौकात अवतरले. त्यानंतर नाक्यावरच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा चौकात आणण्यात आला. तेथे सुमारे १५ मिनिटे त्यांनी शिवरायांची आरती केली व निघून गेले. मात्र, त्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यास सुमारे तासभर लागला.