ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाला ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. या प्रकरणात ठाण्यातील काही राजकीय व्यक्तींची नावं समोर आली आहेत. त्यामुळे परमारनंतर आता या प्रकरणात देखील राजकीय पक्षांचे साटेलोट असल्याचे समोर आले. दाऊदच्या नावाने धमकावून खंडणी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी इकबाल कासकरला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जागेचा ताबा घेण्यासाठी धमकावणे तसेच जागा खाली करण्यास भाग पाडणे याप्रकरणी इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ड्रग्स माफियांचा समावेश आहे का?, याचा पोलीस तपास करत आहेत. ठाण्यातील कासारवडवली परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर याच्यासमवेत इकबाल पारकर, मोहम्मद यासीन ख्वाजा हुसेन शेख, आणि नुवान याला अटक केली. इकबाल पारकर हा दाऊदच्या बहिणीचा दीर आहे.

ठाण्यातील जैन नावाच्या बिल्डरकने इकबाल कासकर याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. ३० लाख रुपये आणि ४ फ्लॅट घेतल्यानंतर पुन्हा खंडणी मागितल्याचा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. ठाण्यातील रोझा बेला इमारतीमध्ये सदरचे फ्लॅट असून त्यात दाऊदचा एक व्यक्ती देखील राहत असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.

हसीना पारकर यांच्या घरातून इकबालला अटक करण्यात आली. ठाण्याप्रमाणे वाशी येथील १५ ते २० ज्वेलर्स आणि बिल्डर यांच्याकडे त्यांनी खंडणी मागितली असल्याचे तपासात समोर आले आहे. सदरचा तपास भविष्यात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात येणार असून खंडणी आणि ड्रग्जसंदर्भातही विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपास करण्यात येईल. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे सर्वजण खंडणी वसूली करत होते.