वाहतूक पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत मंडपांना परवानग्या

ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमधील वाहतूक व्यवस्थेची उडालेली दैना लक्षात घेता गणेशोत्सव मंडपांना १ सप्टेंबरनंतरच उभारणीची परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्यानंतरही ठाण्यासह सर्वच शहरांमध्ये रस्ते, पदपथ अडवून मोठय़ा प्रमाणावर मंडप उभारणी सुरू झाली आहे. ठाणे शहरात तर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना वाकुल्या दाखवत मंडळांनी मनमानेल त्या पद्धतीने मंडप उभारणी सुरू केली असून त्यामध्ये राजकीय मंडळांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १० दिवस आधीपासूनच शहरांत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे रस्त्यावर मंडप टाकून उत्सव साजरे केले जातात. अशा उत्सवाच्या आयोजनात राजकीय पक्षांशी संबंधित मंडळे आघाडीवर असल्याचे दिसून येते. उत्सवांसाठी मंडप उभारण्याकरिता पालिकेकडून परवानगी घेताना वाहतूक पोलिसांचा ‘ना हरकत दाखला’ अत्यावश्यक मानला जातो. मंडपांसाठीचे अर्ज आल्यानंतर पालिका त्या अर्जाची प्रत वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्याकडे पाठवते. पोलीस संबंधित जागेची पाहणी करून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होईल की नाही, हे पाहतात व ‘ना हरकत दाखला’ देतात. मात्र, यंदा ही प्रक्रियाच गुंडाळून ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.

यंदाच्या वर्षी वाहतूक पोलिसांनी काही मंडळे वगळता उर्वरित मंडळांना अद्यापही ना हरकत दाखला दिलेला नाही. ना हरकत दाखला देण्यात आलेल्या मंडळांचा आकडा हाताच्या बोटावर मोजण्या इतकाच आहे. असे असले तरी गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारण्याची कामे सुरू केली असून काही मंडळांनी नियमापेक्षा जास्त जागा व्यापली आहे, असे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

ठाणे वाहतूक पोलिसांनी सर्वच शहरातील महापालिका आयुक्तांना आठवडाभरापूर्वी पत्र पाठवून संबंधित मंडपांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या मंडपांसाठी १ सप्टेंबरनंतर परवानगी देण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते. काही ठिकाणी मंडपांसाठी नियमापेक्षा जास्त जागा व्यापण्यात आली असून, अशा भागात रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी पालिकेला कळवल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली. तसेच पाचपाखाडी आणि खेवरा सर्कलच्या मंडपासाठी नियमापेक्षा जास्त जागा व्यापल्याचे दिसून येत असून त्यासंबंधीही संबंधित प्रभाग समित्यांकडे पत्र व्यवहार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही.

आयुक्तांच्या डोळय़ांदेखत नियमभंग

एरवी कडक शिस्तीचे अधिकारी असा बोलबाला असणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तर मुजोर मंडळांपुढे शरणागती पत्करली आहे. जयस्वाल यांच्या डोळ्यादेखत वाहतूक पोलिसांनी हरकत घेऊनही मंडपांची उभारणी सुरू असून जागोजागी कायदे धाब्यावर बसविले जात आहेत.