रेल्वे स्थानकांच्या आवारात एखाद्या भाजीचे ढीग लावून बसलेले विक्रेते अलीकडे प्रचंड वाढले आहेत. त्यांच्याकडे मिळणारी भाजी दिसायला स्वच्छ आणि खिशाला स्वस्तही असते. मात्र रेल्वे रुळांशेजारील जमिनीवर नाल्यांतील पाण्याच्या सिंचनातून फुलवलेल्या या भाजीत घातक रसायनांचाच अंतर्भाव जास्त असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या डोळय़ांत धूळफेक करण्यासाठी असा भाजीपाला विक्रीस नेण्यापूर्वी चांगला धुतला जातो, पण तोही साचलेल्या डबक्यातील पाण्यानेच!
पांढराशुभ्र मुळा, हिरव्या चकचकीत रंगाची भेंडी, पालक, चवळी, मुळा, लाल रंगाची चवळी, अंबाडी आणि लाल माठ अशा सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या भाजीपाल्याची भुरळ पडून ती खरेदी करण्याचा मोह प्रत्येक गृहिणींना झाल्याशिवाय राहत नाही. लांबच्या भाजी मंडई किंवा भाजी बाजारात जाण्यापेक्षा रेल्वे स्थानक परिसरामध्येच स्वस्त दरामध्ये उपलब्ध होणारी भाजी खरेदी केली जाते. मात्र स्वस्ताईचा हा सोस प्रकृतीसाठी महाग पडू शकतो. ठाणे, कळवा, डोंबिवली आणि ठाकुर्ली या मध्य रेल्वेच्या मार्गाच्या आजूबाजूचा कैक एकर जमीन भाजीपाला  लागवडीसाठी रेल्वे प्रशासनाने भाडे तत्त्वावर दिली आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात भाज्यांची लागवड केली जाते. मात्र त्यासाठी परिसरातील नाल्यांमधून वाहणारे रसायनमिश्रित पाणी वापरले जाते. मोटारीच्या साह्य़ाने खेचून हे पाणी भाजीच्या वाफ्यांना पुरवले जाते. त्यामुळे अशा पाण्यावर पिकलेल्या भाजीमध्ये उपयुक्त अन्नघटकांपेक्षा विषारी रसायनांचे प्रमाण अधिक असते. अशा भाजीच्या सेवनामुळे हाडे ठिसूळ होणे, दातांवर परिणाम होणे आणि कॅन्सरसारखा महाभयंकर आजारही या प्रकारची भाजी सेवन केल्याने होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
 विशेष म्हणजे, घाण पाण्यावर पिकणारी ही भाजी ‘चांगली’ दिसावी म्हणून ती सामूहिकरीत्या धुतली जाते. कळवा स्थानक परिसरातील भाजीची काढणी झाल्यानंतर हे कामगार परिसरातील तलावामध्ये मोठी गर्दी करून या भागात भाज्या धुऊन स्वच्छ करतात. मात्र हा तलावही स्वच्छ नाही. भाजी धुतल्याने ती वरून स्वच्छ होत असली तरी त्यावर अनेक जंतू पसरतात, असे डॉक्टर सांगतात.

नियंत्रण ठेवणे अशक्य
शेतकरी प्रत्यक्ष भाजीविक्री करीत असेल तर त्यावर अन्न व औषध प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नसते. मात्र शेतकऱ्याकडून व्यापारी खरेदी करून विक्री करणार असल्यास त्यावर अन्न व औषध प्रशासन तपासणीची कारवाई करते. मुंबई आणि उपनगरांमध्ये सुमारे साडेतीन लाखांहून अधिक भाजीपाला विक्रेते असून कर्मचाऱ्यांची संख्या मात्र दोन हजार आहे. त्यामुळे शंभर टक्के भाजीपाल्याची तपासणी करणे शक्य होत नाही.
– सुरेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभाग

रेल्वेच्या परिसरातील जमिनीमधील घटक आणि या भाजीपाल्याला दिले जाणारे पाणी यातील रासायनिक प्रमाण यामुळे भाज्यांची गुणवत्ता घसरून त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो. भाजीपाल्याची वेगळ्याच पद्धतीने अवाढव्य वाढ होऊ शकते. नेहमीपेक्षा मोठय़ा आकाराची भाजी येत असल्याने त्याची मागणी वाढते. मात्र ते घातक असू शकते.  – डॉ. उल्हास कोल्हटकर, बालरोगतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक

श्रीकांत सावंत, ठाणे</strong>