सध्याच्या युगात पैसा महत्त्वाचा आहे, या गोष्टीला कदाचित कोण नाकारणार नाही. त्यात हा पैसा आयता हातात पडला तर लक्ष्मी नाकारु नये, म्हणत काही जण त्याचा आनंदाने स्वीकारही करतील. परंतु काही असे लोक असतात की, दोन रुपये कमी मिळाले तरी चालतील पण कष्टाची भाकर त्यांना प्यारी असते. पुण्यातील वाहन चालकाने याचेच एक उदाहरण दाखवून दिले. वाहन चालवून कंबरडे झिजवणाऱ्या चालकाची कथा श्रीमंतीची झलक दाखवून देणारी अशीच आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अनिल नथुराम पवार नावाच्या चालकाच्या गाडीमध्ये एक प्रवासी पैशाने भरलेली बॅग विसरुन गेला होता. ही बॅग पोलिसांत जमा करुन अनिलने प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवून दिले. कष्टाचे पैसे राहत नाही मग हे पैसे काय राहणार असा विचारही अनिलने या घटनेनंतर बोलून दाखविला.

अनिल उदरनिर्वाहासाठी वाहन चालवतो. त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्याची पत्नी चार घरची धुणीभांडी करुन आपल्या पतीला आर्थिक हातभार लावते. आपल्या मुलांना वाढवण्यासाठी दोघे अहोरात्र मेहनत घेतात. अनिल त्याच्या मेहुण्याच्या गाडीवर चालक म्हणून कामाला आहे. तो भोसरी ते विश्रांतवाडी या दरम्यान प्रवाशी वाहतूक करतो. शनिवारी रात्रीच्यावेळी नेहमीप्रमाणे अनिल विश्रांतवाडीवरून भोसरीसाठी गाडीमध्ये ६ प्रवासी घेऊन चालला होता. यातील चार लोक भोसरीच्या अगोदर उतरले. तर दोन प्रवासी भोसरीमध्ये उतरले. अनिल जेव्हा पुन्हा विश्रांतवाडीला निघण्याच्या तयारीत होता त्यावेळी त्याला गाडीमध्ये बसलेला प्रवासी बॅग विसरला असल्याचे लक्षात आले. त्यांनी जेव्हा ही बॅग उघडली तेव्हा त्यांना त्या बॅगेत पैशाचे बंडल पाहायला मिळाले. मात्र, रोज पैशासाठी मेहनत घेणाऱ्या अनिलचे नोटांचे बंडल पाहून मन विचलित झाले नाही. कदाचित त्याच्या रक्तात प्रामाणिकपणाचा गुण असल्यामुळेच ही रक्कम हडप करण्याचा कोणताच मनसुबा त्यांच्या मनात आला नाही.

नक्की कोणत्या प्रवाशाची बॅग आहे याची माहिती नसल्यामुळे अनिलने पैशाने भरलेली ही बॅग विश्रांतवाडी पोलिसांकडे सुपुर्द केली. त्यानंतर ही बॅग पोलिसांनी योग्य व्यक्तिच्या ताब्यात दिलीय आशिष भन्साळी यांनी बॅग हरवल्याची तक्रार नोंदवल्यानंतर त्यांना पोलिसांनी बॅग परत केली. या बॅगेत तब्बल १० लाखांची रक्कम होती. पैशाचे बंडल पाहूनही प्रामाणिकपणा दाखवून देणाऱ्या अनिलला बॅगच्या मालक असणाऱ्या आशिषने २० हजार रुपयांचे बक्षिस दिले. तसेच विश्रांतवाडी पोलिसांच्यावतीने देखील अनिलचा सत्कार करण्यात आला.