व्यवस्थेच्या गलथान कारभाराला बळी पडलेली शेकडो उदाहरण आहेत. आता याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. तामिळनाडूचे रहिवासी असलेले रविकुमार हे या राज्याच्या पशुसंवर्धन विभागात गेल्या १७ वर्षांपासून फक्त २ रुपये प्रतिदिन एवढ्या कवडीमोल पगारावर सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. अखेर न्यायासाठी त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

जून २००० सालापासून या विभागात रविकुमार अर्धवेळ सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाले. या बदल्यात त्यांना दरोरोज २ रुपये एवढाच पगार दिला जातो. दोन वर्षांनंतर त्यांना याच विभागात पूर्णवेळ नोकरी मिळणं अपेक्षित होतं. पण त्यांच्या वाटेला मात्र उपेक्षाच आली. गरिबीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होत, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम करायला सुरूवात केली. १७ वर्षांपूर्वी ते या विभागात अर्धवेळ कर्मचारी म्हणून रूजू झाले होते. पण आता नोकरीवर नियमितपणे रुजू करून न घेतल्याने न्यायासाठी त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला या विभागात सहायक म्हणून रूजू करून घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

वाचा : माणूस म्हणून रतन टाटांना जाणून घ्यायचं असेल तर हा किस्सा जरूर वाचा

रविकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पशुसंवर्धन विभागाला पुन्हा एकदा सहायक पदासाठी मुलाखती घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने एप्रिल महिन्यात सहायक पदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींवर स्थगिती आणली होती. रविकुमार यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. गेल्या कित्येक वर्षांत ते सरकारी खात्यात फक्त दोन रुपयांवर काम करत आहेत. तेव्हा सरकारी विभागात अर्धवेळ काम करणारा देखील सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी पात्र ठरू शकतो, असेही देखील न्यायालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे या विभागात इतकी वर्षे काम करूनही रविकुमार यांचं सहायक पदासाठी नाव न सुचवल्याने न्यायालयाने या विभागातील अधिकाऱ्यांना फटकारले आहे.