चैतन्य प्रेम यांना परिचित असलेल्या ‘माई’ यांची व्यक्तिरेखा साकारणारे ‘वियोगिनी’ (१ एप्रिल) आणि ‘योगिनी’ (१५ एप्रिल) हे माहितीपूर्ण व विश्लेषणात्मक लेख वाचले. लेखाच्या सुरुवातीला म्हटले आहे की, कुणाचंही नाव लिहिणार नाही. वास्तविक त्यात उल्लेखिलेल्या कोणीही व्यक्ती हयात नाहीत. शिवाय लेखात कोणाची बदनामीही केलेली नाही. तेव्हा नावे देण्यास काहीच हरकत नव्हती. त्यामुळे वाचकांची उत्सुकता विनाकारण ताणली जाते.

लेखातील काही विधाने, तपशील खटकले. त्यासाठी हा पत्रप्रपंच. माई कुणाच्या पत्नी आहेत हे लेखकाला का खटकले व त्यामुळे त्यांना भेटावेसे वाटले नाही हे समजू शकत नाही. कारण लेखात त्यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे माईंचे पती एक तपस्वी संन्यासी होते व जगात त्यांना आदराचे स्थान होते. परंतु त्यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील अभिनव प्रयोग त्यांना भिडत नव्हते. हा अर्थात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोपामुद्रा, अनसूया या योगिनी विवाहित होत्या हे येथे लक्षात घ्यावयास हवे.

माईंच्या काही गुरुभगिनींना माई ‘अज्ञानी’ वाटत असल्याचे म्हटले आहे. माईंच्या पूर्वाश्रमीच्या पतींनी त्यांच्या संन्यासपूर्व व संन्यासोत्तर आयुष्यात त्यांचे नवतत्त्वज्ञान प्रतिपादन करणारी प्रथम इंग्रजी व नंतर जी ग्रंथनिर्मिती केली त्यातील बरेचसे माईंच्या हातातून गेले आहेत. तसेच त्यांचे प्रूफरीडिंगदेखील त्यांनीच केले आहे. शिवाय सदर ग्रंथांतील तत्त्वज्ञानाबाबत माईंची त्यांच्या पतींशी चर्चा होत असे. तेव्हा ‘फुलासंगे मातीस वास लागे’ या न्यायाने माईंनीही ते ज्ञान बऱ्याच प्रमाणात आत्मसात केले होते. अर्थात त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराबाबत बोलण्याची माझी योग्यता नाही. माईंनी लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात स्वत:च्या व त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतींबद्दल तपशीलवार लिहिले आहे.

माधव बावकर, मुलुंड (पूर्व)

वेळीच सावध व्हावे

१५ एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध झालेला ‘असामान्य रोग, असामान्य जिद्द’ हा लेख वाचला. यात मंगेश ससे या ३ वर्षांच्या मुलाला झालेला आजार आणि सढळ हाताने मदत करणारे, माणुसकीचं दर्शन याबद्दल वाचनात आलं. माझ्या मते या आजाराचा मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय. मुळात हा आजार मंगेशला झाला त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, त्याचे आई-वडील हे सख्खे मामेबहीण- आतेभाऊ  या नात्यातले आहेत. वर्षांनुवर्षांपासून तज्ज्ञ लोक म्हणत आलेत की जवळच्या नात्यातील लग्ने टाळा. कारण अशा लग्नांचा थेट परिणाम म्हणजे मंगेशला झालेला हा दुर्मीळ आजार. अशा प्रकारे लग्न झालेल्या सगळ्यांनाच अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल असं नाही, पण वेळीच सावध असलेलं बरं!

 हर्षदा शिंपी, मुंबई</strong>

विचार करायला लावणारा लेख

‘हवं समाजभान’ हा १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला संगीता बनगीनवार यांचा लेख अतिशय समर्पक आहे. समाजाने आपली विचारांची दिशा व भाषा बदलली तर खूप काही बदलू शकेल. प्रत्येक मूल हे परिस्थितीमुळे बालसंगोपन केंद्रात येते. ‘मूल’ हे ‘मूल’ आहे दत्तक, औरस या सगळ्या प्रक्रिया आहेत. आई-बाबा हे आई-बाबाच आहेत. यात खरे-खोटे असे नसते. हे विचार तसेच शाळांचेही प्रबोधन करणे गरजेचे आहे हे विचार अनुकरणीय आहेत. मुलामध्ये तू आम्हाला हवा आहेस, ही भावना असणे महत्त्वाचे. हा लेख वाचून विचार करावा.

– सुधा गोखले, मुंबई

एल्वाची भूमिका संभ्रमात्मक

८ एप्रिलला प्रसिद्ध झालेला आणि आरती कदम यांनी लिहिलेला ‘क्षमेपलीकडचा अर्थ’ याबद्दल थोडे बोलावेसे वाटते. आयुष्याची १६ वर्षे आपल्यावर आलेल्या दुर्दैवी(?) प्रसंगाचा आणि चुकीचा पश्चात्ताप करीत राहणे आणि पेक्षा त्या संबंधित व्यक्तीकडे सदर चुकीबद्दल आणि प्रसंगाबद्दल व्यक्त न होणे, तर हे काहीसे निष्फळ वाटते. एल्वाच्या भूमिकेचे विश्लेषण करताना थोडे संभ्रमात्मक वाटते. केलेल्या चुकीची जाणीव होणे नक्कीच मान्य आहे, पण त्याने त्या घडून गेलेल्या चुकीचे परिणाम तर नाही ना बदलता येत. हो, कदाचित त्यातून सावरता येत असेल. पण म्हणून गुन्हा करून त्या गुन्ह्याबद्दल सहानुभूती मिळवणे किंवा दाखवणे हे थोडे वादग्रस्त आहे. या प्रसंगांमध्ये टॉमला त्याच्या चुकीचा पश्चात्ताप झाला आणि तो अगदी धाडसाने अख्ख्या जगासमोर आपली बाजू मांडतो आणि त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतो हे चांगलेच आहे; परंतु त्याची ही भूमिका सर्वच ठिकाणी ग्रा नाही धरता येणार. आणि त्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची बाजू ऐकताना नेमके प्रमाण काय मानावे हेपण थोडे प्रश्नार्थक आहे.

एल्वाच्या म्हणण्याप्रमाणे, बलात्कार करणाऱ्याला माफी असावी का? याबद्दल विचार करताना असे वाटते की, असा गुन्हा करणाऱ्याला त्याबद्दल सफाई देण्याची संधी द्यायला हरकत नाही; परंतु केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेला सामोरे जाण्याची मानसिकता ही गृहीत धरली पाहिजे. या प्रसंगाबद्दल हेच सांगावेसे वाटते की, स्त्री-पुरुषांचे एकत्र येणे हे नैसर्गिक आहे; परंतु या वैश्विक विचाराला तडा देऊन आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक मर्यादांचेदेखील भान असणे कुठे तरी तेवढेच महत्त्वाचे वाटते. अर्थात इथे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की कोणाला आणि कधी आपल्या जवळ येण्याची मुभा द्यावी. पण अशा प्रसंगी दोघांपैकी एकाचाही विरोध असेल तर दुसऱ्याने ते समजून त्याला किंवा तिला साथ द्यायला हवी आणि एकाच्याही मनाविरुद्ध कोणी पुढे गेले तर मात्र ते सपशेल अमान्य आहे.

एल्वाच्या एका मुद्दय़ाचे नक्कीच समर्थन करावेसे वाटते की, कोणा स्त्रीवर हा प्रसंग येतो तेव्हा त्यानंतर तिला होणारा मानसिक आणि सामाजिक त्रास. अशा वेळी समाजाने वैचारिक प्रगल्भता दाखवून तिला अतिसहानुभूती किंवा दोषी न धरता तिला सर्वसामान्य वागणूक दिली पाहिजे. मुळात तिला खंबीर साथ आणि धीर देण्याची गरज असते. तिच्यावर आलेला प्रसंग म्हणजे एक कलंक नसून एक दुर्दैवी वेळ होती की ज्यातून तिला सावरायचे आहे. समाजाच्या विचारांवरच तिची मानसिकता अवलंबून आहे.

शेवटी ‘क्षमेपलीकडचा अर्थ’ याबद्दल एवढेच बोलावेसे वाटते की, एल्वाने तिच्या एके काळच्या मित्राची बाजू समजून त्याला क्षमा केली आणि तितक्याच खंबीरपणे त्याला पुढच्या आयुष्यात एक मित्र म्हणून साथ देतेय, याला पण समजून घ्यावेसे वाटते. अर्थात फक्त या दोघांच्या भूमिका समजून घेणे त्यांच्यापर्यंत मर्यादित आहे.

– अदिती पाटील, जळगाव</strong>

ch07२१ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘योगदान स्त्री नाटककारांचं’  या लेखात गिरीजाबाई केळकर यांचे चुकीचे छायाचित्र लावले गेले. सोबत गिरीजाबाईंचे मूळ छायाचित्र.