‘लोकसंख्येचं ओझं!’ हा अंजली राडकर यांचा लेख वाचला. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, भारतात फक्त ५५ टक्केच जोडपी कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे उर्वरित जोडप्यांना साधने न वापरल्यामुळे इच्छा नसतानाही किंवा काही वेळा साधने मिळाली नाहीत म्हणून मूल झाल्याच्या घटना पाहावयास मिळतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या साधनांचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. म्हणूनच लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
– संदीप संसारे, ठाणे

लोकसंख्या वरदानही!
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी मागे एकदा वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचे समर्थन केले होते. कष्ट करणारी लोकसंख्या ही विकासाला मारक नसून कारक आहे असे सांगितले होते. आज आपल्या देशात कारागीर, शेतमजूर, कुशल कामगार यांची वानवा आहे. उपयोगाविना हजारो एकर जमीन पडून आहे. सरकारने जर थोडी कठोर भूमिका घेतली तर आपला देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही. जागतिक लोकसंख्यादिनी आपण कुशल मनुष्यबळाने युक्त एक बलवान भारत बनवू या!
आपल्या देशाला जर बलवान करायचे असेल तर ज्या ठिकाणी सेवा पोहोचल्या नसतील त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून घ्यावा.
भारताला गरज आहे कडक कायद्याची व तेवढय़ाच तत्परतेने त्यांच्या अंमलबजावणीची. इथे काम करणाऱ्यांनाही खायला मिळते आणि न करणाऱ्यांनाही मिळते. पंगू कायदे, बेजबाबदार प्रशासन आणि भ्रष्ट राजकारणी जोपर्यंत आपल्या देशात आहेत तोपर्यंत आपली कुठलीही समस्या संपणार नाही. सगळ्या अपयशाचे कारण एकच आहे, ते म्हणजे व्यवस्थापनाचा अभाव. हिरोशिमा, नागासाकीवर बॉम्ब टाकूनही जपान पुन्हा उभा राहतो. आणि आम्ही लहान लहान समस्यांभोवती शक्ती वाया घालवतो. एकच महत्त्वाचे आहे, एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येचा जर विधायक वापर केला आणि दर्जेदार व्यवस्थापन अवलंबिले तर वाढती लोकसंख्याही आपल्याला वरदान ठरू शकते!
– संदीप वरकड, खिर्डी (ता. खुलताबाद)

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

समाज वास्तवाची जाणीव
९ जुलैच्या अंकातील ‘एकला चलो रे’ या सदरातील वासंती वर्तक यांचा ‘लावणी खेळता खेळता..’ हा ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतलाबाई नगरकर यांच्या एकल पालकत्वाचा जीवनप्रवासावरचा लेख वाचला आणि एका वेगळ्या समाजजीवनाची वास्तव जाणीव झाली. शकुंतलाबाई ज्या परिस्थितीत जीवन जगल्या त्याला खरोखरच तोड नाही. आपल्या मुलींना व मुलाला त्यांनी कटाक्षाने मनावर दगड ठेवून आठव्या वर्षांपासून हॉस्टेलवर ठेवलं व शिकवलं, पायावर उभं केलं, याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पांढरपेशा समाजात मिसळतानाचा टप्पा किती अवघड असतो हे कोवळ्या वयातच मुलांना समजून घ्यावं लागलं. कलेच्या प्रांतात त्यांनी घेतलेली भरारी खरोखर उत्तुंग आहे. एका चॅनेलवरील कामाच्या निमित्ताने त्यांचा कलाकार व परीक्षक म्हणून असलेला ‘सखोल अभ्यास’ याची नव्याने पुन्हा ओळख झाली. बाई तुम्ही खरोखर ‘ग्रेट’ आहात.
– विकास मुरलीधर मुळे, पुणे<br />विधवांची ससेहोलपट थांबवावी
सुवर्णा दामले यांचा ‘आपुलीच माणसे होती, आपुलीच वैरी’ या विस्तृत लेखात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला एकविसाव्या शतकातदेखील अशा रीतीने वागवले जाते, हे वाचून शरमेने मान खाली गेली. खेडोपाडी पुरुषप्रधान संस्कृतीपुढे विधवांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, वाचून मन उद्विग्न झाले. थोडय़ाफार फरकाने याला स्त्रीसुद्धा जबाबदार आहे.
गेली चार-पाच वर्षे आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. खरे तर सरकार बरेच काही करू शकते. दुष्काळग्रस्त भागात तरुण शेतकऱ्यांना एकत्र जमवून, विधवांची करुण कहाणी त्यांच्यासमोर मांडायला हवी, जेणेकरून आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याच्या समोर आपल्यानंतर आपल्या पत्नीचे, मुलाबाळांचे कसे हाल होतील, हे त्यांना कळेल व बरेच शेतकरी आत्महत्येच्या मार्गापासून दूर जातील. अन्यथा स्त्रियांची सुरू असलेली ससेहोलपट कधीच थांबणार नाही!
– शिल्पा प्रफुल्लचंद्र पुरंदरे, मुंबई</p>

स्त्रीचा पायरीसारखा उपयोग?
२ जुलैला प्रसिद्ध झालेल्या ‘आपलीच माणसे होती आपुलीच वैरी’ या लेखाने मन कातरले. प्रत्येक संकटामध्ये अजूनही स्त्रीला गृहीत धरले जाते. तिच्या मनाचा कधीही कोणी विचार करीत नाही. आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली हेच दु:ख इतके मोठे आहे की, तेच पचवणे तिला कठीण जात असेल. त्यात घरातील माणसांकडून सहानुभूती मिळणं दूरच; पण तिचाच उपयोग पायरीसारखा करून त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करणारी माणसं पाहून मन दुखावले. कदाचित परिस्थिती त्यांना तसे कृत्य करण्यास भाग पाडत असेल. परंतु शिकलेल्या स्त्रियांपेक्षा कधीकधी ग्रामीण बायका जास्त कणखर असतात. त्या परत आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी शून्यातून विश्व निर्माण करतात. अशा स्त्रियांना माझा सलाम!
– मॅटिल्डा अ‍ॅंथनी डिसिल्वा, वसई.

अधिक मार्गदर्शन हवे होते
नेहमीप्रमाणेच मृणालिनी चितळे यांचा २ जुलैच्या अंकातील ‘हाती फक्त हात हवा’ हा लेखही फारच छान जमला आहे. दोन कुटुंबातील परिस्थिती वर्णन करून समारोप करताना कवी अनिल यांची जीवनातील सुखदु:खांना सामोरे जायचे तर हाती फक्त हात हवा ही कल्पना वाचकांच्या मनात रुजवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. हा लेख मुलांच्या मानसशास्त्राशी संबंधित आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तो फुलवला असता तर वाचकांना संसारात ‘हाती हात टिकायला’ काय करायला पहिजे याचे मार्गदर्शन झाले असते असे वाटून जाते.
मुलांकडून जशा अवास्तव अपेक्षा करू नयेत तसेच त्यांच्या प्रत्येक हालचालींवर शक्य तितके लक्ष ठेवणे गरजेचे आहे, हे दुसऱ्या उदाहरणावरून मनोमन पटते. मुलांच्या वागण्याचा विचार करताना आई-वडील यांच्यात सामंजस्य गरजेचे आहे. आजच्या समतेच्या काळात मतभेद हे असणारच, पण ते मतभेद मुलांसमोर उघड होता कामा नयेत; अन्यथा मुले त्या मतभेदाचा बरोबर फायदा करून घेतात व मुलांना वाढवण्यात दोष निर्माण होऊ शकतात. थोडक्यात, हाती हात असणे म्हणजेच एकमेकांना साथ असणे हे या लेखाचे फलित मनावर बिंबते.
-प्रसाद भावे, सातारा

प्रभाकर जोग यांचे योगदान अमूल्य
२ जुलैला प्रसिद्ध झालेल्या दृष्टिआडची सृष्टीमधील ‘स्वराधीन आहे जगती..’ हा लेख आवडला. मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नामवंत संगीतकारांबरोबर काम करून प्रभाकर जोग यांनी मानाचे पान पटकावले आहे. जोग हे चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आहेतच, पण आजदेखील संगीत क्षेत्रात उत्साहाने कार्यरत आहेत. ‘गाणारे व्हायोलिन’ या त्यांच्या कार्यक्रमाने आणि ध्वनिफितीने हजारो रसिकांची मने रिझवली आहेत. जोगांचे ‘स्वर आले जुळुनी’ हे आत्मचरित्र अतिशय वाचनीय आहे. गीत रामायणाच्या रचनेत आणि सादरीकरणात बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांचे साहाय्यक या नात्याने जोगांचे योगदान अमूल्य स्वरूपाचे आहे. असा हा मोठा आणि तेवढाच शालीन कलाकार खरोखर स्वराधीन आहे.
-सुरेश पटवर्धन, कल्याण</p>

व्यवहारज्ञानातही भागीदारी हवी
२ जुलैच्या ‘आपुलीच माणसे होती आपुलीच वैरी..’ हा सुवर्णा दामले यांचा लेख वाचून मनाला विषण्णता आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना ‘नवऱ्याची आत्महत्या’ यापेक्षाही मोठय़ा आपत्तींना पुढे तोंड द्यावं लागतं, तेही नातलगांमुळे ओढवलेल्या प्रसंगांना, हे खरोखरच खेदजनक आहे.
खरं तर शहरांतही नवऱ्याच्या आकस्मिक निधनानं परिस्थितीवश नोकरी व्यवसायाच्या व्यवहारी जगात पाऊल ठेवावं लागलेल्या कितीतरी स्त्रिया असतील. मूल पदरात असतानाच नवरा गेल्यावर कायमची माहेरी आलेली मुलगी सासरच्यांशी आपलेपणानं वागत राहिल्यानं त्यांचा तिला कायम आधार राहिल्याचं उदाहरण आहे. लग्न झालेला मोठा मुलगा अचानक अपघातात गेल्यावर धाकटा मुलगा विधवा सुनेला तिच्या मुलीसकट स्वीकारून संसार थाटतो असंही उदाहरण आहे. तसंच लगेचच विधवा झालेल्या सुनेचं कन्यादान करणाऱ्या सासरच्या मंडळींचंही उदाहरण आहे. पण या स्त्रिया शिकल्यासवरलेल्या, व्यवहारी जगाचं आवश्यक तेवढं तरी ज्ञान असलेल्या असल्यानं त्या ‘आपल्या’ माणसांना व्यवस्थित हाताळू शकतात.
या पाश्र्वभूमीवर शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातल्या स्त्रियांनाही शिक्षण, व्यवहारज्ञान निदान शेतीउत्पादनाची बियाणं खरेदीपासून ते शेतीउत्पादन बाजारात विकेपर्यंतच्या व्यवहारांचं ज्ञान शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे. केवळ चूल आणि मूल या संस्कारांचा अट्टहास सोडून दिला पाहिजे. स्वत: शिक्षण घेऊन मुलांना शिकवण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. घर, जमीन यांची क्षेत्रपळं, कागदपत्रं, सात-बाराचा उतारा, कुणा नातलगांचे किती भाग त्यात आहेत, त्यांचे बाजारभाव यांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यानं पत्नीला देऊन ठेवली पाहिजे. पत्नीसाठी व मुलांसाठी बचतीची सवय लावून दिली पाहिजे, खर्च करून वाचलेलं उत्पन्न कशाकशात गुंतवलं आहे हे सांगून ठेवलं पाहिजे. तिच्या व मुलांच्या भविष्यासाठी वारसाहक्काच्या तरतुदी माहीत करून दिल्या पाहिजेत. अपघात, आजार यामुळे आपण या जगातून गेलो तर बायको-मुलांवर आधार शोधण्याची वेळ येऊ नये, बेभरवशी पावसासारखी नातीही बेभरवशी होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनीही हे सारं केलं पाहिजे. हे सामाजिक संस्था, प्रशासन यांनी खेडोपाडी बिंबवत राहिलं पाहिजे.
‘निसर्ग काही र्वष कोपला तरी केव्हा तरी त्याची कृपादृष्टी होईल याची खात्री असते, पण जेव्हा आपली माणसेच कोपतात तेव्हा स्वत: उठून उभं राहण्याशिवाय पर्याय उरत नाही’ हे या लेखातलं वाक्य यादृष्टीनं फार महत्त्वाचं वाटतं. केवळ सुखदु:खात सहभागी करून घेण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं झालंय ते, पत्नीला व्यवहारज्ञानातही भागीदार करून घेणं.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे