* आमच्या सोसायटीचे रिडेव्हलपमेंटचे काम सन २०११ मध्ये झालेले आहे. आम्ही ज्या दिवसापासून सदनिकांचा ताबा घेतला त्या दिवसापासून एक बाथरूम गळत आहे. मजल्यावरील फ्लोअरिंगदेखील सारखे नाही. संबंधित सदस्याने संस्थेकडे तक्रार केली व हे निदर्शनास आणून दिले की, उच्च प्रतीचे सामान उदा. पाइप न वापरल्याने ही गळती होत आहे. डेव्हलपरबरोबर झालेल्या करारनाम्यात सर्व प्रकारचे दोष दूर करण्यासाठी १० वर्षांची गॅरंटीदेखील दिलेली आहे; परंतु संस्थेचे पदाधिकारीच उपविधीचा आधार घेऊन दुरुस्तीचा अर्धा खर्च करा, असे सांगतात याबाबत आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
मेघा शास्त्री, विलेपार्ले, मुंबई.
* या ठिकाणी आपण दोन प्रश्नांची गल्लत करीत आहात. ती म्हणजे, एक नियमित उद्भवणारी गळती व दुसरी म्हणजे रिडेव्हलपमेंटचे झालेले काम नीट न झाल्याने होणारी गळती. अशा प्रकारे आपणाला गळतीची विभागवारी करता येईल. जर नियमित स्वरूपात होणारी गळती असती तर संस्थेच्या उपविधीमधील तरतुदींप्रमाणे सभासदांना खर्च सोसावा लागला असता. आमच्या मते, आपण अजूनही गॅरंटी पिरिअडमध्ये आहात तेव्हा सदर गळती (लीकेज) हे बिल्डरमार्फतच (डेव्हलपरमार्फतच) दुरुस्त करून घेणे योग्य होईल. मात्र त्यासाठी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यात ऐकोपा असणे जरुरीचे आहे. तसे तुम्ही सर्वजण एकत्रितरीत्या लढा दिलात तर खात्रीने विकासकाला गळती बंद करण्याचे काम करून द्यावे लागेल.
* ‘असोसिएट्स मेंबर’ हा पूर्वी आवश्यकतेनुसार मतदानात भाग घेत असे. आता नवीन सुधारणेनुसार त्याचे नाव शेअर सर्टिफिकेटवर घातले गेले तर तो पदाधिकारी पदासाठी निवडणूक लढवू शकतो. याबाबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील याबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन केल्यास बरे होईल.
भास्कर खरे, मुंबई.
* खरे तर सहयोगी सदस्य (असोसिएट्स मेंबर) हा मूळ सदस्याचा पाठिंबा असेपर्यंत संस्थेच्या कारभारात भाग घेऊ शकतो. असोसिएट मेंबर होण्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत विहित केलेले शुल्कदेखील गृहनिर्माण संस्थेकडे जमा करावे लागते. त्यानंतर त्याला सहयोगी सदस्य बनवून त्याच्यावर संस्थेमध्ये शिक्कामोर्तब व्हावे लागते. ज्या वेळी त्याचे सहयोगी सदस्यत्व निश्चित केले जाते त्या वेळी शेअर सर्टिफिकेटवर त्याचे नाव सहयोगी सदस्य म्हणून घातले जाते. त्यामुळे तेव्हाही हे नाव घालावे लागत होते; परंतु त्याकडे इतक्या काटेकोरपणाने पाहिले जात नसावे असे वाटते.