त्याकाळी आमची संपूर्ण कॉलनी म्हणजे छोटीछोटी बंगल्यासारखी घरं आणि त्याभोवती गर्द झाडी असलेली बाग अशी होती. संध्याकाळी सात नंतर रस्त्यावर शुकशुकाट असे. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर आम्ही मुलं खडूने चौकट काढून खेळत असू. एखादी-दुसरी गाडी क्वचित जाई. कुणाच्याही घरी गेलं की निघताना सवाष्णीला हळदकुंकू, बागेतलं एखादं फुल दिलं जाई. कडीपत्ता, शेवग्याच्या शेंगा विकत आणायच्या असतात हे आम्हाला ठाऊकच नव्हते. ‘‘लक्ष्मण, दोन शेंगा घेऊन ये रे.’’ म्हटलं की आमचा घरकामाचा गडी त्याच्या दुसऱ्या कामावर विचारून शेंगा घेऊन येई; समोरच्या कुलकण्र्याच्या बंगल्यातून कडीपत्ता आणला जाई.
आम्ही- सारस्वत कॉलनी, जोगेश्वरी (पूर्व) येथे राहत असलेलं आमचं घर म्हणजे माझे पणजोबा (आईच्या आईचे वडील) शंकर जोगप्पा वागळे यांनी १८ रु. पगारावर पोस्टात खर्डेघाशी करून घेतलं. त्या पगारातून तीन मुलींची लग्ने, मुलांची शिक्षणे, पै-पाहुणा, आला-गेला यांचा आदर सत्कार इ.करून उरलेल्या बचतीतून बांधलेला एक मजली बंगला. माझी पणजी (होडली आई) हिच्या इच्छेखातर हा सारस्वत कॉलनीतील रामेश्वर मंदिराच्या अगदी शेजारचा प्लॉट माझ्या पणजोबांनी निवडला. त्यांच्या आईचे नाव सुंदर. तिच्या स्मृतीखातर बंगल्याचे नाव ‘सुंदर निवास’ ठेवले गेले.
बंगला पूर्वाभिमुख होता. बंगल्याच्या उत्तरेस रामेश्वर मंदिरापुढचा मोकळा प्लॉट होता. एकूण बंगल्याच्या वायव्य कोपऱ्यात रामेश्वर मंदिर होतं. तसा हा बंगला जोगेश्वरी स्टेशनकडून येणाऱ्या हमरस्त्यावर होता. बंगल्याची रचना म्हणजे मध्ये एक मोठा हॉल व त्याच्या दोन्ही बाजूला दहा बाय दहाच्या तीन-तीन खोल्या. हॉलच्या पुढे-मागे दोन्ही बाजूला मोठमोठे व्हरांडे होते, तळमजल्यावर हे दोन्ही व्हरांडे उघडे होते. पण पहिल्या मजल्यावर अर्थातच लाकडी कठडय़ाने ते बंद केले होते.
होडली आई अतिशय देवभक्त असल्याने सकाळी उठल्याबरोबर रामेश्वराचं दर्शन घडावं म्हणून पहिल्या मजल्यावरची पश्चिमेकडील खोली तिने स्वत:करिता ठेवली होती. नंतरच्या पुढच्या दोन खोल्या आईच्या सर्वात धाकटय़ा व मोठय़ा मामासाठी ठेवल्या गेल्या होत्या. हॉलच्या दक्षिणेकडे असलेली पूर्वेकडील बाहेरची खोली आईच्या मधल्या मामाकरिता होती तर त्याच्या शेजारच्या खोलीत होडली आईचे सुंदर देवघर होते. त्याच्याही पुढे येणारी खोली म्हणजे स्वयंपाकघर, मागचा व्हरांडा त्यात सामील करून स्वयंपाकघर प्रशस्त बनवले होते. एकूण बंगला फारच सुंदर दिसत असे.
होडल्या आईला आपल्या मुलीदेखील आपल्या सोबत राहाव्या असे वाटत होते, म्हणून तिने पणजोबाकडून बंगल्याचा एक मजला बांधून घेतला आणि आपण व आपली मुलं यांनी पहिल्या मजल्यावर राहायचे आणि मुलींनी तळमजल्यावर अशी स्वप्नं पाहिली. परंतु प्रत्यक्षात तिच्या मुलांनी पहिल्या मजल्यावर वास्तव्य केले, परंतु मुली या ना त्या कारणाने तळमजल्यावर राहायला आल्याच नाहीत. तिची इच्छा थोडय़ाशा प्रमाणात का होईना माझ्या आईने म्हणजे तिच्या नातीने पूर्ण केली.
बंगल्याकडे तोंड करून उभं राहिलं असता उजवीकडच्या आगगाडीसारख्या लाईनीत ३ खोल्यांत माझ्या आई-बाबांचा संसार होता. माझा आणि माझ्या धाकटय़ा भावाचा जन्म या घरातच झाला. माझ्या वयाच्या पंचविशीपर्यंत आम्ही याच घरात राहिलो. या घराने आम्हाला मायेची उब दिली, एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं, आपुलकी शिकवली. या घराने आमच्या आयुष्यातील अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले, आमच्या आयुष्यातल्या अनेक उत्कट प्रसंगाचे ते घर साक्षीदार राहिले. माझ्या बालपणातील, कळत्या वयातील असंख्य आठवणी त्या घराशी निगडीत होत्या.
माझ्या पणजोबांना मी पाहिलं नाही. मला आठवते तेव्हापासून पहिल्या मजल्यावर आईचे तीन मामा आपल्या कुटुंबियांसह राहात तर तळमजला भाडेकरूंसाठी दिला होता. आम्ही नातेवाईक असलो तरी माझी आई ही पणजोबांच्या मुलीची मुलगी असल्याने आम्ही भाडेकरूच होतो आणि महिना २३ रु. भाडे भरून राहात होतो.
बंगल्याच्या भोवती आईच्या प्रत्येक मामाची वेगवेगळी मोठी बाग होती. बंगल्याला लोखंडी मोठं गेट होतं, पण ते बहुतेक बंदच असे. त्याला एक जेलसारखा छोटा दरवाजा होता. तोच येण्या-जाण्यासाठी वापरला जाई. गेटवर फुलांचा वेल सोडण्यासाठी एक लोखंडी कमान होती. त्यावर जाईचा वेल फुललेला असे. संध्याकाळी खाली फुलांचा सडा पडे.
त्याकाळी आमची संपूर्ण कॉलनी म्हणजे छोटीछोटी बंगल्यासारखी घरं आणि त्याभोवती गर्द झाडी असलेली बाग अशी होती. संध्याकाळी सात नंतर रस्त्यावर शुकशुकाट असे. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर आम्ही मुलं खडूने चौकट काढून खेळत असू. एखादी-दुसरी गाडी क्वचित जाई. कुणाच्याही घरी गेलं की निघताना सवाष्णीला हळदकुंकू, बागेतलं एखादं फुल दिलं जाई. कडीपत्ता, शेवग्याच्या शेंगा विकत आणायच्या असतात हे आम्हाला ठाऊकच नव्हते. ‘‘लक्ष्मण, दोन शेंगा घेऊन ये रे.’’ म्हटलं की आमचा घरकामाचा गडी त्याच्या दुसऱ्या कामावर विचारून शेंगा घेऊन येई; समोरच्या कुलकण्र्याच्या बंगल्यातून कडीपत्ता आणला जाई.
संपूर्ण कॉलनीत त्याकाळी एक प्रकारचा एकापो होता. हेवे-दावे असत तरी सर्वजण एकमेकांच्या सुखद:खात सहभागी होत. कुठलीही नवीन बातमी वाऱ्याप्रमाणे कॉलनीत पसरायला वेळ लागत नसे.
आमचा बंगला बाहेरून चांगला दिसत असला तरी वेळेवर डागडुजी न केली गेल्याने आतून पार खिळखिळा झाला होता. पावसात तर आमचे असे काही हाल होत की विचारू नयेत. त्यातल्या त्यात हॉलमध्ये तर गळत नाही असा कोणताही कोपरा शिल्लक राहात नसे. आमचे तर काहीच नाहीत इतके हाल पहिल्या मजल्यावर राहाणाऱ्या आईच्या मामांचे होत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळ्याआधी ‘नेमेचि गच्चीवर डांबर घालणे’ हा उद्योग असे. माझ्या भावाने- विकासने मग त्यावर डोकं लढवून पावसाळा आला की आमच्या संपूर्ण हॉलचाच छतापासून दोन एक फूट समांतर प्लॅस्टिक बांधायची शक्कल लढवली. ते प्लॅस्टिक मग तो एका बाजूला किंचित तिरपे करून ठेवत असे. त्यामुळे गावात जसं कौलारू घरावरून वाहणारे पाणी पाटाच्या रूपात एका ठराविक जागी जमा होतं तसंच इथंही त्याजागी आम्ही एखादी बाटली ठेवत असू.
पावसाचं मुबलक पाणी घरात येई, पण घरातल्या नळाला पाणीच नसे. आमच्या स्वयंपाकघरातल्या नळातून तर पाणी येऊ शकतं हे आम्ही विसरूनच गेलो होतो. आमच्या बाथरूममधल्या नळाला थोडंसं पाणी येई, त्यावर आई पिण्याचं पाणी भागवून घेई. बाकी वरच्या वापरासाठी आम्ही २ मोठी पिंप ठेवली होती. मी आणि विकास दररोज सकाळी ६ वाजता उठून आमच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या बागेतील पाणी वाहून आणून ती भरत असू.
एक वर्षी तर य गळतीवर उपाय म्हणून आईच्या मामांनी संपूर्ण गच्चीला सर्कसच्या तंबूच्या कापडाचे आच्छादन केले होते. बिल्डिंगची गच्ची म्हणजे सर्कसचा मिनी तंबू दिसत होता. हा प्रयोग कितपत यशस्वी झाला हे काही आता आठवत नाही, परंतु बिल्डिंग जास्त दिवस टिकत नाही हे लक्षात येऊन आईच्या मामांनी ती बिल्डरला विकून त्याजागी नवीन बिल्डिंग बांधायचे ठरवले व त्याप्रमाणे बिल्डरला विकून आताची ४ मजली इमारत झाली व आम्ही अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल १९८७ साली या नवीन घरात राहायला आलो.
नवीन बिल्डिंगच्या नामकरण सोहळ्याच्या मीटिंगमध्ये नवीन आलेल्या फ्लॅटधारकांनी अगोदरच्या ‘सुंदर निवास’ याच नावावर शिक्कामोर्तब केलं आणि आमच्या पूर्वजांची स्मृती जतन झाल्याच्या आनंदात आम्ही कृतकृत्य झालो.