आज सकाळपासून घरात जरा उदास वातावरण होतं. अर्थात, तसं होणंही स्वाभाविकच होतं. गेले महिनाभर ज्या दिवसाची भीती मनात बसली होती, तो दिवस आज उजाडला होता. येणार येणार म्हणून वाटत असलेला शार्दूलच्या बदलीचा दिवस आज उजाडला होता. तसं पाहिलं तर बदली ही अनेकांची होत असते. पण शार्दूल हा पहिल्यापासून घराशी खूपच जोडलेला. लहानपणी तब्येत जरा नरमगरमच असायची. त्यामुळे आई-बाबांचं आणि त्यातही आईचं जरा जास्तच लक्ष त्याच्यापाशी असायचं. त्यात तो एकुलता एक आणि आईही पूर्णवेळ गृहिणीच होती. त्यामुळे काय हवं-नको ते त्याच्या हातात मिळायचं. त्याची शाळा आणि कॉलेज घरापासून पंधरावीस मिनिटांच्या अंतरावर. पुढे इंजिनीअिरगला गेल्यावर ते कॉलेजही अध्र्या तासाच्या अंतरावर. तिथूनच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आणि पुन्हा एकदा तासाभराच्या अंतरावर नोकरी मिळाली. नंतर दोन र्वष नोकरी केल्यावर नोकरीत असतानाच फायनान्स घेऊन एमबीए झालं, तेही कॉलेज फार लांब नव्हतं. मग पुढे दोन वर्षांनी रीतसर मुलगी पाहून लग्न झालं. ग्रॅज्युएट असलेल्या मृदुलालाही नोकरीची फारशी आवड नसल्यामुळे तीही गृहिणीच होती. त्यामुळे शार्दुलला सगळं हातात द्यायची आईची गादी तिने चालवायला घेतली. नंतर वर्षभरात गोड बातमी मिळाली आणि मृण्मयीचा जन्म झाला. छोटी मृण्मयी दीड वर्षांची असताना कुटुंबवत्सल शार्दूलला हातात बदलीची ऑर्डर मिळाली, तीही थेट बंगळुरूला जायची. त्यामुळे घरापासून कायम अध्र्या ते एक तासाच्या अंतरावर शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त असणाऱ्या शार्दूलला कधी काही झालं तर आपण लगेच घरी जाणार आणि आपली काळजी घेणारी माणसं आपल्याला भेटणार हा विश्वास मनात दृढ झाला होता. पण आता बंगळुरू म्हणजे घराजवळ तर सोडाच, पण आपल्या राज्यातही नाही. प्रदेश परका, भाषा परकी, माणसं परकी म्हणजे मी अगदी पोरका, अशा भावनेने बदलीची ऑर्डर घेतली. तेव्हापासून ते आजपर्यंत घरात हा सगळा असा दु:खी माहौल. काल रात्री झोपताना मृण्मयी अगदी पटकन झोपी गेली. मृदुलाचाही डोळा लागला होता. पण घरातले आपले जुने दिवस, आई-बाबा, मृदुला, मृण्मयी यांच्याबरोबरचे घरात घडलेले वेगवेगळे प्रसंग, त्याच्या आठवणींच्या लाटांमध्ये िहदोळे खायला लागले. झोप येत नसल्यामुळे पडल्यापडल्या छताकडे नजर स्थिरावलेली होती. मृण्मयीला आवडतात म्हणून बेडरूमच्या छतावर फ्लोरोसण्ट रंगात चांदण्या रंगवून घेतल्या होत्या. खोलीतले दिवे बंद झाल्यानंतर खिडकीतून येणारी रस्त्यावरच्या म्युनिसिपाल्टीच्या दिव्याच्या प्रकाशाची तिरीप पडून या चांदण्या उजळून निघाल्या होत्या. त्याकडे पाहतापाहता शार्दूलच्या कल्पनाचक्षूंसमोर हा आठवणींचा पट उलगडत होता.

लहानपणी बाबांनी घरात मुद्दाम शार्दुलच्या अभ्यासासाठी जुन्या िहदी चित्रपटात असायचा तसा मुनीमजीच्या बाकासारखा डेस्क करून घेतला होता. त्यावर बसून केलेला अभ्यास, आईने वाचून दाखवलेले धडे आणि नंतर दहावीच्या परीक्षेआधी त्या डेस्कवर बसून वेळ लावून सोडवलेले पेपर, असं सगळं डोळ्यासमोरून सरकलं. मग इंजिनीअिरगला गेल्यावर ड्रॉइंग काढण्यासाठी म्हणून बाबांनी जेवणाचं मोठं फोिल्डग डायिनग टेबल आणलं होतं. ते शार्दूल ड्रॉइंगबोर्डसारखं वापरायचा. त्याची शार्दूलला आठवण झाली. रोज रात्री झोपण्यापूर्वी आई शार्दूलच्या डोक्यावर तेल घालायची. पण इंजिनीअिरगला असताना एकदा रात्री चार वाजेपर्यंत जागून याच टेबलावर ड्रॉइंगचं सबमिशन केलं आणि सगळं ड्रॉइंग संपतच आलं होतं, तेवढय़ात ड्रॉइंगचा शेवटचा भाग कसा काढायचा याचा विचार करण्यासाठी कपाळाला लावलेला हात डोक्यावरच्या केसांमधून फिरला आणि खोडरबराचा ड्रॉइंग पेपरवर पडलेला चुरा झटकण्यासाठी त्याच हाताने झाडल्यावर, कागदाला तेलकट हात लागून तेलाचे डाग पडले. दुसऱ्या दिवशी सरांनी ते ड्रॉइंग परत काढून आणायला सांगितल्यावर शार्दूलचा पारा चढला. घरी येऊन डोक्यावर तेल घातल्यामुळे हे सगळं झालं, म्हणून तो आईला रागाने खूप बोलला. त्या दिवसापासून डोक्यावरचं तेल बंद झालं, या आठवणीने शार्दूलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आपण आईला उगाचच दोष दिला. तेव्हा तिची काहीच चूक नव्हती. पण तरीही नंतर कधीतरी खूप थकल्यावर डोक्यावर प्रेमाने तेल घालून देणारी आई उद्यापासून आपल्याबरोबर नसणार, या विचाराने डोळ्यात तरळलेलं पाणी गालांवरून ओघळू लागलं. शार्दूलच्या बेडरूममध्ये िभतीतून बाहेर आलेल्या दोन कॉलमच्यामध्ये असलेल्या पाच फूट खळगावजा जागेत बाबांनी गजूसुताराला बोलवून खास शार्दूलसाठी पुस्तकं ठेवायला कपाट आणि त्याचं दार खाली आडवं पडलं की त्यावर रायटिंग टेबल असं स्टडी टेबल करून घेतलं होतं. शार्दुल एमबीएला गेल्यानंतर केलेल्या या कपाटाची आठवण शार्दूलला झाली. पण त्याची आठवण व्हायचं कारणही तसंच होतं. बाबांच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी बाबांना करून दिलेल्या लाकडी कपाटावर बाबांचा खूप जीव होता. जुन्या बर्मा टीक लाकडाचं हे कपाट जुनाट दिसत असूनही बाबांनी ते आजोबांची आठवण म्हणून जपलं होतं. नवं कपाट घेऊया आता हे लहान पडतंय, असं आईने अनेकदा सांगून पाहिलं होतं. पण त्यावर बाबा चिडायचे. इतका जीव असलेलं हे कपाट बाबांनी शार्दूलच्या अभ्यासासाठी मोडून हे स्टडी टेबल करून घेतलं होतं. आपल्यावर इतकं प्रेम असलेल्या बाबांना आता आपल्याला सोडून जावं लागणार, या विचाराने शार्दूलच्या डोळ्यांना पुन्हा एकदा धार लागली.
बाबा एकटेच कमावणारे होते. शार्दूलच्या इंजिनीअिरग आणि एमबीएच्या महागडय़ा शिक्षणावर बराच पसा खर्च झाल्यामुळे घरात बरीच र्वष काहीही नवीन फíनचर आणलं गेलं नव्हतं. मृदुलाबरोबर लग्न ठरल्यावर घरात उत्साहाचं वातावरण होतं. घरात थोडंसं का होईना, पण काहीतरी नवीन करून घ्यावं असा विचार आईने मांडला. आता शार्दूलही कमावता होता. मग अर्थातच स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाचा विचार झाला. साखरपुडा आणि लग्न यात सहा महिन्यांचा काळ होता. त्याच काळात हे काम करून घेतलं. स्वयंपाकाचा ओटा आणि मॉडय़ुलर किचन तसंच किचन कॅबिनेट नवीन करून घेतलं. ते करताना मृदुलाचाही विचार घेण्यात आला होता. गेले महिनाभर चहा, डाळभात, अशा बेसिक गोष्टींचे धडे शार्दूल मृदुलाकडून याच ओटय़ावर घेत होता. कारण रोजचं बाहेरचं तेच तेच खाऊन कंटाळा आला, पोटाला नाही झेपलं, तर काहीतरी शिजवता यायला हवं. आता उद्यापासून ओटय़ाकडे जायची पाळी आली तर सावरायला, सांगायला मृदुला नसणार. मोबाइलवरून विचारून विचारून करता येईलही, पण थेट भेट नाही, या विचाराने शार्दूलला पुन्हा एकदा गलबलून आलं. इतक्यात, शेजारी झोपलेल्या मृण्मयीने थोडीशी चुळबुळ करून कुस बदलली आणि शार्दूलचं तिच्याकडे लक्ष गेलं. रोज सकाळी ऑफिसला लवकर निघताना झोपलेल्या मृण्मयीचा चेहरा कौतुकाने न्याहाळणारा शार्दूल संध्याकाळी घरी आल्यावर तिच्याबरोबर खेळता येईल, असं मनाला समजवायचा. पण आता ते शक्य होणार नव्हतं. या विचारानंतर आलेला हुंदका ओठ गच्च दाबून शार्दूलनं घशातच गिळला. नुकतंच धरून धरून उभं राहायला शिकलेल्या मृण्मयीला चालायला शिकवण्यासाठी समोरच्या बाजूला मणी असलेला, दोन पाय दोन बाजूला टाकून समोर असलेल्या दांडय़ाला धरून त्याच्या आधाराने चालता येणारा पांगुळगाडा असलेली छोटी गाडी मृण्मयीला आणून दिली होती. खोलीच्या कोपऱ्यातल्या त्या रिकाम्या गाडीकडे शार्दूलचं लक्ष गेलं. शांत झोपलेल्या मृण्मयीला उद्या या गाडीत बसून चालताना बाबा दिसणार नव्हता. नव्या नोकरीत लगेचच रजा घेऊन येणं शक्य होणार नव्हतं. चार-सहा महिन्यांनंतर आपण कधी आलो, तर केवळ फोनवरच्या बाबाच्या आवाजाने समोर आलेला हाच तो आपला बाबा, याची खूण मृण्मयीला पटेल का? असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. शेवटी एकूणच विचारांचं काहूर शार्दूलच्या मनात माजलं आणि त्याचा शीण येऊन कधीतरी त्याचा डोळा लागला.
दुसरा दिवस उजाडला. जायची वेळ झाली. सगळे शार्दूलला सोडायला स्टेशनवर गेले. गाडी सुटली आणि हात करणारे आई-बाबा, मृदुला आणि तिच्या कडेवर बसून काय घडतंय, हे न कळता उगाचच हात हलवणारी मृण्मयी हे सगळे वेगाने पुढे सरकणाऱ्या गाडीबरोबर मागे गेले. खरं तर मृदुलाला त्याच्याबरोबर बंगळुरूला जायचं होतं. पण मृण्मयी लहान असल्यामुळे तिचं सगळं शेडय़ूल, काही लागलं तर तिचे डॉक्टर, हे सगळं बंगळुरूला गेल्यावर स्थिरस्थावर झालं नसतं. त्यामुळे तिला जायचा बेत रहित करावा लागला. बाबांच्या हार्टच्या आणि डायबिटिसच्या डॉक्टरांच्या फेऱ्यांमुळे आई किंवा बाबांनाही शार्दूलबरोबर जाणं शक्य नव्हतं. आईला रडू आवरलं नाही. पण बाबांनी तिला समजावलं. शार्दुलला आधीपासूनच जर स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं असतंस तर इतकं दु:ख करायची पाळी आली नसती. असू दे. आता यानिमित्ताने तरी तो चांगला तयार होऊन येईल. बाबा आईला समजावत होते. मृदुलानेही डोळ्याच्या कडा पुसल्या आणि रडू आवरलं. तिलाही बाबांनी समजावलं. ‘अगं, माझा त्याच्यावर जीव नाहीये का? पण म्हणून असं रडून कसं चालेल? आपल्या माणसावर आपली माया जरूर असावी. पण त्या मायेच्या बेडय़ा त्याच्या पायात घालून त्याला आपल्या कुबडय़ांच्या आधाराने आयुष्यभर जगायला लावणं, म्हणजे आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षाला िपजऱ्यात जखडून त्याच्यावर जबरदस्तीने प्रेम करण्यासारखं आहे. आयुष्यात अनेक चढउतार, बरेवाईट प्रसंग येतात. या प्रसंगाना खंबीरपणे आणि समर्थपणे जर त्या माणासाने तोंड द्यावं असं वाटत असेल, तर त्याच्या भावनाविवश होण्याला खतपाणी घालणं चुकीचं आहे. आपलं माणूस आपल्यापाशी राहावं, असं वाटणं यात गर काही नाही. पण त्यासाठी त्याच्या प्रगतीच्या मार्गात येणं हा गुन्हा आहे. शार्दुल स्वभावाने प्रेमळ आहे, लाघवी आहे. तो नक्की नवीन ठिकाणी माणसं जोडेल. त्याने तो एकटा पडणार नाही. तू काहीही काळजी करू नकोस. आपण स्वत:ला सावरलं पाहिजे आणि त्याच्या गरहजेरीत तूही त्याच्याइतक्याच जबाबदाऱ्या पार पाडू शकतेस, कुठेही कमी नाहीस, हे तुला खंबीर राहून सिद्ध करायचंय. आणि असं झालं तर त्यालाही तिथे निश्चितपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल, नाही का?’ बाबांचं म्हणणं मृदुलाला पटलं. तिच्या मलूल झालेल्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणि आत्मविश्वास उमटलेला दिसला. सगळे घरी परतले.
हळूहळू काळ सरला. शार्दुल बंगळुरूला जाऊन र्वष झालं. तिथे नवीन सेंटर सुरू करायचं होतं. काम आव्हानात्मक होतं. जसजशा जबाबदाऱ्या पडत गेल्या, तसं एकएक करून शार्दूल प्रश्न मार्गी लावत गेला. सुरुवातीला तो एक महिना मित्राच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये राहिला. मग कंपनीजवळच असलेल्या एका बंगल्यात पेइंगगेस्ट म्हणून राहायला सुरुवात केली. त्या बंगल्यात एक ज्येष्ठ जोडपं रहात होतं. त्यांचा मुलगा अमेरिकेत कायमचा वास्तव्याला होता. त्यामुळे त्यांनाही सोबतीची गरज होती. शार्दूलच्या रूपाने त्यांना दुसरा मुलगाच मिळाला. आजींनी त्याला केवळ त्यांची कन्नड भाषाच नाही, तर जेवणाचे पदार्थही शिकवले. शार्दूलही आवडीने सुट्टीच्या दिवशी स्वत: जेवण करून आजींना विश्रांती द्यायचा. कामाच्या रगाडय़ात त्याला मुंबईला यायला जमलं नव्हतं. फोनवरून रोजचा संपर्क होता. आई-बाबा, मृदुला आणि मृण्मयीबरोबर गोष्टी करायचा. आता मृण्मयी अडीच वर्षांची झाली होती. त्यामुळे शार्दूलने निर्णय घेतला की, बंगळुरूमध्येच आजी-आजोबांच्या घराजवळच आता फ्लॅट घ्यायचा. आई-बाबा आणि मृदुलाला बंगळुरूलाच घेऊन यायचं आणि मृण्मयीलाही तिथेच शाळेत घालायचं. आजी-आजोबांमुळे बंगळुरूमधले डॉक्टर्सही ओळखीचे झाले होते. त्यामुळे बाबांच्या उपचारांचाही प्रश्न सुटणार होता. या विचाराने तो मोठी सुट्टी घेऊन मुंबईला निघाला. घरी पोहोचला. दारावरची बेल वाजली. मृण्मयीने धावत जाऊन दार उघडलं. ‘बाबा आलेऽऽ’ म्हणून जोरात हाक मारून शार्दुलला दरवाजातच गच्च मिठी मारली. शार्दुल घरात शिरला. आई-बाबा मृदुला सगळ्यांनाच आनंद झाला होता. त्याच्या मागोमाग त्याचं मुंबईचं घर पुन्हा कधी बघायला मिळणार, म्हणून त्याच्याबरोबर आलेले आजी-आजोबाही घरात आले आणि त्याने त्यांची सगळ्यांशी ओळख करून दिली. शार्दूलच्या या बदलीमुळे काही काळ तो त्याच्या घरापासून दूर गेला खरा, पण त्याला अजून एक नवं घर नवे आई-बाबा, मृण्मयीला नवे आजी-आजोबा आणि त्या आजी-आजोबांनाही मुलगा, सून आणि नातही मिळाली होती. त्यामुळे शार्दूल आता एकाऐवजी दोन घरांशी जोडला गेला होता.. anaokarm@yahoo.co.in