कोपर रेल्वेस्थानकाच्या आसपास रिक्षा, रस्ते, लोकवस्ती वाढू लागली आहे. परिणामी या भागात नव्याने मोठी गृहसंकुले उभी राहण्यास सुरुवात झाली आहे. फक्त या भागात गृहसंकुलात सदनिकेची नोंदणी करताना प्रत्येकाने संबंधित इमारतीचा बांधकाम आराखडा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने किंवा संबंधित यंत्रणेने मंजूर केला आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
नागरीकरणामुळे डोंबिवली शहर विस्तारत चालले आहे. या शहराचा एक महत्त्वाचा भौगोलिक भाग म्हणजे कोपर गाव. कोपर येथे डहाणू, पनवेल येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकाची उभारणी झाली. त्यानंतर गर्दीने वाकलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार थोडा कमी करावा या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाने गेले सात ते आठ वर्षांपूर्वी अप्पर कोपर व जमिनीलगतचे कोपर अशी दोन्ही रेल्वे स्थानके सुरू केली. दलदलीच्या विळख्यात असलेला हा भाग विकसित होत गेला. रेल्वे, रिक्षा, रस्ते, लोकवस्ती या भागात वाढू लागल्याने या भागात नव्याने मोठी गृहसंकुले उभी राहण्यास सुरुवात झाली आहे. फक्त या भागात गृहसंकुलात सदनिकेची नोंदणी करताना प्रत्येकाने संबंधित इमारतीचा बांधकाम आराखडा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने किंवा संबंधित यंत्रणेने मंजूर केला आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. नवीन गृहसंकुलांमध्ये आतापर्यंत डोंबिवलीत घुसमट होत असलेला जुना रहिवासी राहण्यास येत आहे. आजूबाजूचा मोकळा परिसर, बाजूला खाडी, खारफुटीचे जंगल आणि मोकळी हवा हे या भागाचे मुख्य वैशिष्टय आहे. चोवीस तासात या भागात केव्हाही जा, झुळझुळ वाऱ्याची लहर प्रत्येकाला सुखावून टाकते. राहण्याच्या दृष्टीने योग्य असलेली ही जागा मुलांच्या शिक्षणासाठीही तितकीच सोयीची आहे. आजूबाजूला सर्वप्रकारच्या शाळा आहेत. शाळा परिसरात जाण्यासाठी रिक्षा, शाळांच्या बस दारात येतील अशी व्यवस्था येथे आहे. शिवाय मुंबई, डहाणू, पनवेल भागांत कोठेही जायचे असेल तर कोपर रेल्वे स्थानकातून थेट या दोन्ही मार्गावर कोठेही जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. महापालिकेकडून या विस्तारित भागात रस्ते, पाणी, वीज, उद्यान, बगीचे देण्याचे प्रस्ताव आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या काही काळात डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर ते मानकोली खाडीवरील उड्डाण पूल प्रस्तावित आहे. त्यामुळे भिवंडी दिशेने ठाणे- नाशिक महामार्गावर जाणे सोयीचे होणार आहे. मुंब्रा-डोंबिवली रेल्वे मार्गाला समांतर रस्ता प्रस्तावित आहे. डोंबिवली पश्चिम शहराला वळसा घालून कल्याणच्या दिशेने जाणारा महापालिकेचा रिंगरूट रस्ता आगामी काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोपर परिसरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डोंबिवली शहरात जाऊन मग पुढचा प्रवास करण्याची गरजच उरणार नाही. कोपर भागात राहणाऱ्या नागरिकांना या सर्व सुविधा अधिक दिलासादायक ठरणार आहेत. याच भागातून शिळफाटा, भिवंडी वळण रस्ता येथे जाण्यासाठी काही रस्ते प्रस्तावित आहेत. या रस्त्यांचे यापूर्वीच सव्‍‌र्हेक्षण झाले आहे. अशा विविधांगांनी हा परिसर येत्या काही काळात फुलणार आहे. कोपर परिसराला कापरेरेट लूक येत आहे.