जातं म्हणजे घराची शोभा, पावित्र्य, त्याला पाय लागला की लगेच नमस्कार केलाच जायचा. सर्वसाधारण दीड-दोन फुटी व्यासाच्या आणि तीन-साडेतीन इंच उंचीच्या, एकाच मापाच्या दोन वर्तुळाकार दगडांची युती म्हणजे ‘जातं’. गं, मी तुझ्यासाठी कोकणातून हे आंबोळीपीठ आणलंय. जात्यावर दळलेलं आहे बरं का! बघ कसं किंचित जाडसर आहे. एक तासभर दही किंवा ताक घालून पीठ भिजवून ठेव आणि मग आंबोळ्या घाल. बघ कशा जाळीदार फक्कड होतील त्या.’’ माझ्या मैत्रिणीला- संपदाला, जात्यावरच्या पिठाचं किती कौतुक करू आणि किती नको, असं झालं होतं. पीठ बाजूलाच राहिलं, मी मात्र ‘जात्या’बरोबर गरगर फिरत भूतकाळात पोहोचले.
माझ्या डोळ्यांसमोर फ्डॅशबॅक दिसू लागला. घरातली सगळी माणसं आपापल्या उद्योगधंद्याला जाईपर्यंत सूर्यदेव अगदी डोळ्यांसमोर यायचे. ‘‘आली ओटीवरी उन्हे बघ,’ म्हणे आई, ‘दहा वाजले’ ’’ असं स्वत:शीच पुटपुटत आई दळणाच्या तयारीला लागायची. काचेच्या बरणीतील मेतकुटाच्या उंचीने तळ गाठण्याची चिन्हे दिसली की तिला मेतकूट करण्याचे वेध लागत. ‘संपलंय गं मेतकूट, करायला हवंय’ असा ‘आशावाद’ कधी ऐकायला मिळत नसे. ‘इव्हेंट मॅनेजमेंट इतकं पक्कंहोतं की ‘नाही’ हा शब्द नसण्यातच गृहिणीची श्रीमंती होती. मेतकूट भाजून झाल्यावर तिचा मोर्चा जात्याकडे वळायचा. खाली जाड पोतं, त्यावर चौघडी घालून एक स्वच्छ फडकं घातल्यावर जात्याची बैठक सजायची. लहान मुलं कसं सायकलचा टायर गोल गोल फिरवत आणतात तसं हे जड जातं ‘गाडी गाडी’ करत आणून तयार केलेल्या आसनावर मधोमध त्याची प्रतिष्ठापना व्हायची. तास-दीड तास मेतकूट दळण्याचा कार्यक्रम चालायचा. गोळ्याच्या सांबाराचा भरडा, थालीपिठाची भाजणी, साबुदाणा, खांतोळी करण्यासाठी तांदुळाचा रवा, मोदकाची पिठी, खडे मीठ, पिठीसाखर असं काही ना काही प्रासंगिक नैमित्तिक दळण चालूच राहायचं. ‘जरा हात लाव गं’ असं म्हणून तिने बोलावलं की अस्मादिकांची स्वारी हलायची. दळता दळता आईने सांगितलेल्या भूतकाळातील आठवणी, तिच्या सावधगिरीच्या सूचना यात गुंतून गेल्यामुळे माझं बूड थोडा वेळ का होईना जात्याभोवती टिकायचं. पण हात लावण्याचा नेम मात्र कधी चुकायचा नाही.
पावसाळ्याची बेगमी करून पावसाळ्यात मात्र जात्याला विश्रांती मिळायची. खरं तर इतकं मेहनतीचं काम ती सहज आवडीने कसं काय करायची याचं मला आश्चर्य वाटायचं. आजूबाजूच्या घरांतूनही ‘जातं’ दिसायचं. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत बेळगावला आजोळी जायचो. तिथे तर जात्याची खूपच ‘घरघर’ असायची. लाहय़ापीठ, पापडाचे डांगर असं काही काही मोठय़ा प्रमाणात दळलं जायचं आणि मग परतताना त्याच्या पुरचुंडय़ा माहेरवाशिणींच्या सामानात येऊन बसायच्या. जोडय़ा जोडय़ा हौसेने दळायला नंबर लावायच्या. शेवया करण्यासाठी रवापिठी जात्यावरतीच काढली जायची. मग काय पांढऱ्याशुभ्र शेवयांचे चवंगेच्या चवंगे काठीवर वाळत पडायचे. सासरी आल्यावरही या ‘घरघरीने’ साथसंगत सोडली नाही. लोणच्यासाठी सासूबाई लाल मोहरी जात्यावर भरडायच्या. सुपाने पाखडून सालं काढून टाकायच्या आणि मग पुन्हा जात्यावर त्या मोहरीच्या डाळीची जाडसर, गरबरीत पूड केली जायची. ती एकसंध पूड घालून केलेल्या मसाल्यामुळे त्या लोणच्याचा थाट काही औरच असायचा.
तर असं हे जातं म्हणजे घराची शोभा, पावित्र्य, त्याला पाय लागला की लगेच नमस्कार केलाच जायचा. सर्वसाधारण दीड-दोन फुटी व्यासाच्या आणि तीन-साडेतीन इंच उंचीच्या, एकाच मापाच्या दोन वर्तुळाकार दगडांची युती म्हणजे ‘जातं’. दोन भागांना तळी किंवा पेड म्हणतात. खालच्या तळीमध्ये लोखंडी अरी मधोमध पक्की बसवलेली असते. वरची तळी त्यावर अशी ठेवली जाते की, त्याच्या भोकातून ती ‘अरी’ वर येते आणि त्याच्या आधारावर वरची तळी फिरत राहते. ती म्हणजे वरची तळी फिरवण्यासाठी वरच्या तळीमध्ये एका खोबणीत लाकडी खुंट बसवलेला असतो. हा अधूनमधून बाहेर निसटण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नारळाची शेंडी किंवा ओली चिंधी करून त्या खोबणीत घालून बत्त्याने किंवा पहारीने तो घट्ट बसवला जातो. हा खुंटा बळकट राहण्यावरच दळणाची मदार. या गोष्टीमुळे खुंटा बळकट करणे म्हणजे एखाद्याचं मत किंवा विचार पक्का आहे ना हे तपासणे, हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. जात्यावर दळण्यासाठी खास पोझ घेतली जाते. एक पाय सरळ लांब ठेवायचा आणि दुसरा जवळ घेत मांडी घालायची. कौतुकानं जातं पुढय़ात घ्यायचं. उजव्या बाजूला असलेल्या परातीतून किंवा सुपातून मूठभर धान्य घेऊन वरच्या तळीच्या भोकातून हलकेच जात्याला भरवायचं. घास घालण्याच्या तंत्रावर पिठाची गुणवत्ता अवलंबून असते. खुंटय़ाला उजव्या हातात घेऊन ‘जातं’ फिरवायला सुरुवात करायची. सुरुवातीला हळूहळू फिरवत मग वेग वाढवायचा. रवाळ दळण हवं असेल तर गती कमी पुरते. पण बारीक गंधासारखे दळायला; दळणाचा शेवट करताना जातं जोरात फिरवतात. उजवा हात दमला की डावा हात पुढे येतो. मांडी ही अधूनमधून बदलली जाते. रिकामा हात कधी कधी जवळच्या पायावर विसावतो. मान ही त्याच्या बाजूला कलते. संपूर्ण शरीर जात्याच्या गतीवर एका लयीत हलत राहते. कधी एकटीने दळण्यापेक्षा दुसरीचाही ‘हात’भार घेतला जातो. भुरुभुरु पीठ पडत राहतं. जात्याच्या खालच्या तळीला टेकून पिठाच्या छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा घेराव घालतात. दोघीही रंगात आल्या की जातं वेगात गरगरत राहतं. गप्पाष्टकांमुळे ‘श्रम वाटतात हलके’ अशी किमया घडते. अनुभवी नजरेने आणि स्पर्शाने मधूनच पीठ चिमटीत घेऊन त्याची ‘जात’ तपासली जाते. असं शुद्ध, भेसळरहित पीठ स्वत:च्या ‘श्रम’दानाने, आपलेपणाने तयार करत मागच्या पिढीतल्या स्त्रीने स्वत:बरोबर घराचं ‘आरोग्य खातं’ उत्तम राखलं.
‘जात्यामधुनी मंजुळ ओवी, घराघरांतुनी ऐकू येई’ असं खेडय़ातील पहाटेचं चित्र सुरेल केलं ते या जात्यानेच. जात्यावर बसलं की ओवी सुचते ही म्हणच आहे. कवयित्री बहिणाबाईंनी म्हटलंच आहे, ‘‘अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून येते पिठी, तसतसं माझं गानं, येतं पोटातून व्होटी.’’ जात्याच्या सोबतीनं संसाराचं गाणं गातांना त्या म्हणतात, ‘‘कसा घरोट घरोट, माझा वाजे घरघर, घरघरीतून त्याच्या, माले ऐकू येतो सूर, त्यात आहे घरघर, वेडय़ा आपल्या घराची, अरे आहे घरघर, त्यात भल्या आभायाची.’’ आजी, आई यांच्या जात्यावरच्या ओव्या ऐकत ऐकतच अनेक साहित्यिक कवी यांचे पिंड पोसलेले आहेत, त्यातूनच साहित्याची अक्षरलेणी कोरली गेलेली आहेत आणि हे सगळं घडलं या जात्याच्या, दगडातून. जात्यातून धान्याचे पीठ होतं, ही एक साधी प्रक्रिया पण कविमनाने या घटनेतून वैश्विक सत्य सहज सांगून टाकलं. ‘जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती, कळे न त्याला, मरण उद्याचे अंती या जगती.’ असं सांस्कृतिक संचित असलेल्या जात्याच्या खुंटय़ाला हळकुंड-सुपारी बांधून त्यात उडीद भरडले जातात आणि लग्नाच्या कामांचा शुभारंभ केला जातो.
यांत्रिक युगामुळे मिक्सरचा अवतार झाला आणि कमी किमतीचे चिरकाल टिकणारे, वीजबचत करणारे, घटमूट, ‘टाकीचे घाव’ सोसून आरोग्यसंपदा बहाल करण्याचा ‘वसा’ घेतलेले, थंड डोक्याचे, हातभर लांबीच्या केरसुणीने साफ करण्यास सुलभ, साहित्यनिर्मितीत योगदान देणारे भातुलकीच्या चिमुकल्या संसारात रंगीत लाकडी रूपात चिरमुऱ्याचा पापड करणारे ‘जाते’, त्याच्या अस्तित्वाला घरघर लागली. उमलत्या पिढीच्या शब्दकोशातून तर ‘जातं’ जातच राहिलं. स्थूलता निर्मूलन शिबिरात दळण्याची अ‍ॅक्शन करण्याच्या निमित्ताने तसेच मंगळागौरीच्या खेळात फुगडी खेळताना ‘जातं’ घातलं गेलं की अचानक त्याच्या ‘दत्त’ होण्याने स्मृतीची पानं मात्र फडफडत राहतात.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती