हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळवर शनिवार दिनांक २५ एप्रिलला भीषण भूकंपामुळे आपत्तीचा हिमालयच कोसळला. या भूकंपात आत्तापर्यंत ७,०००हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले असून, त्याहून अधिक नागरिक जखमी व बेघर झाले आहेत. तब्बल ७.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी झाला आणि दोन मिनिटांत त्याच्या तांडवात अनेक इमारती, मंदिरे व ऐतिहासिक वास्तू भुईसपाट झाल्या. अजूनही भूकंपाचे धक्के अधूनमधून जाणवत आहेत आणि मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचे रस्ते उखडले गेल्याने व रस्त्यांना भेगा पडल्याने दळणवळणाबरोबर संपर्क यंत्रणाही ठप्प झाली आहे. त्यामुळे संपूर्ण नेपाळवर भीतीचे सावट आहे.
भारताच्या उत्तर, पूर्व व ईशान्य भागात भूकंपाच्या धक्क्यामुळे ७० हून अधिक जण मृत्युमुखी पडले असून जखमी झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या असून काही ठिकाणी छपरासह घरे कोसळली आहेत. तसेच अनेक इमारती व घरांना तडे गेले आहेत. त्यानंतरही अधूनमधून भूकंपाचे धक्के वरील भागात जाणवत असून त्याची व्याप्ती अगदी अंदमान बेटापर्यंत पोहोचली आहे.
  भूकंपामुळे होणारे नुकसान व प्राणहानी टाळण्यासाठी ‘भारतीय मानक ब्युरो’ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने आत्तापर्यंत केलेले संशोधन व विविध ठिकाणच्या भूकंपाच्या अभ्यासावरून मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध केली आहेत. अशा या संस्थेविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ :-
 भारतीय मानक ब्युरो, भारतीय राष्ट्रीय मानक संस्था ही भारतीय मानक ब्युरो कायदा १९८६ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली वैधानिक संस्था आहे. विविध विभागीय परिषदेच्या माध्यमांतून विविध अभियांत्रिकी विषयांवरील भारतीय मानक तयार करणे ही त्यापकी एक जबाबदारी आहे. संरचनात्मक अभियांत्रिकी, इमारत साहित्य आणि घटक, आरेखन नियोजन, बांधकाम आणि स्थापत्य अभियांत्रिकी संरचना अनुपालन, बांधकाम पद्धती, इमारतीमधील सुरक्षितता इत्यादीसाठी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात प्रमाणीकरण करण्यास स्थापत्य अभियांत्रिकी विभाग परिषद जबाबदार आहे. संशोधन आणि विकास संस्था, ग्राहक, उद्योग जगत, चाचणी प्रयोगशाळा आणि शासकीय प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या तांत्रिक समितीच्या माध्यमातून ही मानके विकसित करण्यात आली आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी विभाग परिषद वरील ध्येय साध्य करण्याच्या दिशेने ३५ शाखा समित्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर काम करीत आहे व त्यातील एक शाखा समिती आहे भूकंप अभियांत्रिकी शाखा समिती, सी. ई. डी. ३९.
 भारत जवळजवळ सर्व नसíगक आणि मानवनिर्मित संकटे यामुळे सर्वात आपत्तीप्रवण देश आहे. ८५ टक्के क्षेत्र एक किंवा एकापेक्षा अधिक संकटे पेलण्याच्या दृष्टीने असुरक्षित आहे आणि देशाच्या राजधानीसह अंदाजे ५७ टक्के क्षेत्र तीव्र भूकंपप्रणव आहे. इमारती आणि संरचनात्मक बांधकामे पुरेशी मजबूत नाहीत. नसíगक धोका व परिणाम सहन करण्यासाठी जमीन वापरावर र्निबध लादणे जेणेकरून लोकांची असुरक्षितता टाळणे किंवा कमी करणे यासाठी आपत्ती प्रतिबंध अभियांत्रिकी हस्तक्षेप अपेक्षित असतो.
हिमालयाच्या पर्वतराजी प्रदेश, पश्चिम भारत व कच्छ देशातील भूगर्भीयदृष्टय़ा अस्थिर भाग आहेत आणि तेथे जगातील काही विनाशकारी भूकंप झाले आहेत. द्वीपकल्पासारख्या असणाऱ्या भारताच्या एका मोठय़ा भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. परंतु त्यांची संख्या तुलनेने अत्यंत कमी व कमी तीव्रतेचे होते. भूकंपरोधक डिझाइन आणि संरचना बांधकाम या गोष्टी विचारात घेऊन भूकंप अभ्यास खात्यात भूकंपाची माहिती घेऊन सुसूत्रीकरण करणे ही फार पुर्वीपासूनची गरज होती. भारतीय मानक ब्युरोने डिझाइन आणि भूकंपरोधक संरचना बांधकाम क्षेत्रात आणि त्या अनुषंगाने मोजमाप व चाचण्या या क्षेत्रात राष्ट्रीय मानके निर्माण करून बहुमोल सेवा केली आहे. भूकंपासारखा नसíगक धोका कमी करण्याच्या बाबतीत भारतीय मानकांचा तपशील खालीलप्रमाणे :-
आय. एस. १८९३: १९८४ – भूकंपरोधक संरचनेसठी डिझाइनचे निकष :– हे भूकंपरोधक डिझाइनसंबंधीचे मानक असून ते इमारती, अधिक उंचीची संरचनात्मक ़बांधकामे, पूल, धरणे, इत्यादीसाठी लागू आहे. तसेच भूकंपाच्या तीव्रतेवर आधारित या देशातील पाच भूकंप झोनची विभागणी दर्शविणारा एक नकाशा देण्यात आला आहे.
आय. एस. १८९३ :   प्रथम भूकंपरोधक संरचना डिझाइन शिफारसी म्हणून १९६२ मध्ये प्रकाशित  करण्यात आल्या आणि नंतर १९६६ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. भारतातील भूकंपांची अतिरिक्त माहिती गोळा करून आणि प्रगत तंत्रद्यान व अनुभव यावर आधारित मानकामध्ये १९७० साली आणि नंतर १९८४ साली सुधारणा करण्यात आली. देशाच्या विविध भागांत झालेले भूकंप यामध्ये उत्तर काशी, लातूर व भूज यांचा समावेश असून, शेतीच्या प्रगतीत तांत्रिक सुधारणांच्या विविध प्रकारच्या समस्या हाताळणाऱ्या संरचना शाखा समितीने या मानक प्रकाशनाचा परिणाम म्हणून पाच भागांत मानक सुधारित करण्याचा निर्णय घेतला :
भाग १ —  सर्वसामान्य तरतुदी व इमारती
भाग २ —  जल पदार्थाच्या जमिनीच्या आधारे व उंच टाक्या
भाग ३ —  पूल आणि संरक्षक भिंती
भाग ४ —  एकावर एक थर असलेल्या औद्योगिक संरचनात्मक वास्तू
भाग ५ —  धरणे आणि बांध / बंधारे
भारतातील किमान ३८ शहरे भूकंपाचा उच्च धोका असलेल्या झोनमध्ये आहेत. मुंबई, कोलकाता व चेन्नई ही शहरे भूकंपप्रणव झोन ३ मध्ये आहेत. भारतीय उपखंडातील अंदाजे ६० टक्के भूभाग भूकंपप्रणव क्षेत्रात मोडत असून घाईघाईने आणि बहुतांश बांधकामे भूकंपरोधक नसल्याने, अनियोजित पद्धतीने उभारल्या गेलेल्या शहरांना भूकंपाने मोठे नुकसान व प्राणहानी होण्याचा धोका संभवतो. मोठा भूकंप अकल्पितपणे केव्हाही येऊ शकतो, असा धडा बिहारमधील १९३४ व आसाममधील १९५० सालच्या भूकंपाने दिला आहे.
मुंबई हे शहर भूकंपप्रणव झोन ३ मध्ये आहे. मुंबईत अजून तरी भूकंपाचा मोठा तडाखा बसला नसला तरी शेजारील ठाणे व अन्य परिसरात नेहमीच भूकंपाचे छोटे-मोठे धक्के बसल्याची नोंद आहे. म्हणून मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात इमारतींचे तसेच कोणत्याही प्रकारचे संरचनात्मक बांधकाम करताना भारतीय मानक ब्युरोने उपलब्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच करण्याचे बंधनकारक होणे आवश्यक आहे. इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने याबाबत पुढाकार घेऊन या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची व बांधकाम व्यावसायिकांची एकत्रितपणे बठक घेऊन भारतीय मानक ब्युरोच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी व पडताळणीसाठी नियमावली तयार करण्याबाबत तसेच मुंबई परिसरात बहुमजली इमारती उभारण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे व त्याची कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.         
विश्वासराव सकपाळ -vish26rao@yahoo.co.in   

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ