सभासदांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे  एका उत्तम सोयी-सुविधा असलेल्या सोसायटीच्या दुर्दशेविषयीची गोष्ट!
दहाएक वर्षांपूर्वी मी माझ्या मित्राबरोबर पश्चिम उपनगरातील एका ठिकाणी राहण्याची जागा पाहण्यासाठी गेलो होतो. ते एक मोठय़ा इमारतींचे संकुल होते. त्या संकुलात बिल्डरने चांगले रुंद रस्ते तयार केले होते. मधोमध एक आखीव-रेखीव उद्यान होते. खूप छान हिरवागार हिरवळीचा पट्टा त्यात राखला होता. त्या उद्यानाच्या भोवताली फिरण्यासाठी जॉिगग ट्रॅक तयार केला होता. नानाविध लहान-मोठय़ा वृक्षवेलींनी तो परिसर सुंदर सजविला होता. लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, मेरी गो राऊंड, झोके, आणि इतर कितीतरी आकषर्क रंगीबेरंगी खेळण्याचे उत्तम प्रकार उपलब्ध करून दिले होते. बसण्यासाठी आरामदायी आणि आकर्षक बाकांची जागोजाग व्यवस्था केली होती. निळ्याशार पाण्याचा स्वििमग पूल होता. अत्याधुनिक साहित्याने सज्ज असा क्लब हाऊस, त्यात टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम आणि इतर खेळ तरुणांना खेळता येतील अशी व्यवस्था केली होती. त्या सर्व परिसरात केलेल्या आकर्षक प्रकाशयोजनेमुळे रात्रीच्या वेळी तो परिसर स्वप्नवत वाटत असे. येणारा-जाणारा त्या परिसरातील अप्रतिम सौंदर्याने हरखून जात होता. अगदी रांगणाऱ्या मुलापासून वस्तीतील वृद्ध राहिवाशांना तो आनंदाचा ठेवा जणू बिल्डरने तयार करून दिला होता. राहण्याचे घर असावे तर ते अशा सौंदर्याने नटलेल्या परिसरामध्ये असेच प्रत्येकाला वाटेल असा सगळा माहोल होता.
बघता बघता सर्व इमारती रहिवाशांनी भरून गेल्या. माझ्या मित्रानेही तेथे एक राहण्याची जागा घेतली. आणि काही कारणास्तव मला जवळ जवळ दहाएक वर्षांनी त्याच्याकडे जाण्याची वेळ आली. आज मात्र तो सारा परिसर, भकास, उदास, उजाड आणि रुक्ष झाला होता. धूळ, खड्डे,  सुंदर बांधकामाची जागोजाग पडझड झाली होती. हिरवळीचा पत्ता नव्हता, शुष्क झाडे, लहान मुलांच्या खेळण्यांचे म्हणजे घसरगुंडी, झोपाळे, ह्यांच्या भंगाराचा एक ढीग तयार झाला होता. स्वििमग पुलात पाण्याचा थेंब नव्हता. आजुबाजूच्या रहिवाशांची अंथरुणे त्यात वाळत पडली होती, उनाड कुत्री त्यात दंगामस्ती करत होती. काही लहान मुले त्यातल्या त्यात जमेल तसा क्रिकेट खेळत होती. स्वििमग पुलाच्या िभतीवर त्यांनी कोळशाने स्टंप आखले होते. दिव्यांचे खांब त्यावरील तुटलेल्या दिव्यासकट गंजून इतस्तत: पडले होते. क्लब हाऊसची दशा तर पाहवत नव्हती, खेडेगावातील वर्षांनुवष्रे दुर्लक्षित एखाद्या घरासारखी त्याची पडझड झालेली दिसत होती. चांगले रुंद अंतर्गत रस्ते जिथे तिथे खडय़ांनी भरले होते. आणि उरलेली सर्व जागा चारचाकी वाहनांनी भरून गेली होती. मी ते सर्व उद्ध्वस्त वास्तव पाहत पाहत मोठय़ा खिन्न मनाने माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो. माझे त्याच्याकडचे काम उरकल्यावर न राहवून मी त्या परिसरात पाहिलेल्या भयाण दृश्याचा विषय त्याच्याजवळ काढला.
अनेक इमारतींच्या संकुलाचे मुंबईत इतरत्र होते, तेच ह्या संकुलातही  झाले. एकाच भूखंडावर अनेक सोसायटय़ा उदयाला आल्या. प्रत्येकाची कार्यकारिणी वेगळी. मध्यंतरीच्या काळात सामायिक वापराच्या वेगवेगळ्या सोईसुविधांवरून, पाìकग  वरून त्यांच्यात वाद उद्भवले, कोणाचे अहं दुखावले गेले, भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झाल्या, काही प्रकरणे पोलिसांपर्यंत आणि तेथून पुढे कोर्टाच्या कक्षेत गेल्या. येथे सर्व धर्माचे, पंथांचे आणि विविध भाषिक समाजातील रहिवासी वास्तव्यास असल्याने ज्याची-त्याची संमेलने, धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवासाठी बगीच्याच्या जागेचा बिनदिक्कत, बेपर्वा वृत्तीने वापर सुरू झाला. जातीधर्म आणि प्रादेशिक गटा-तटाचे आणि शिवाय राजकीय वाद झडू लागले. जे सर्वाचे असते ते कोणाचेच नसते ह्या मानसिकतेप्रमाणे कोण कोणाला  विचारणार? अशा  परिस्थितीत बागेची आणि क्लब हाऊसची देखभाल कोणी करायची हा मुद्दा वादग्रस्त बनत चालला. म्हणजे अर्थात आíथक पशाचा मुद्दा मोठा होता. तसे सर्व रहिवाशी चांगल्या आíथक स्तरातील होते. चांगल्या राहाणीमानाचे जे काही दंडक अभिप्रेत आहेत त्यानुसार जीवनमान राखणारे होते. पण अशा सार्वजनिक कामासाठी पसे देण्यासाठी खळखळ करण्याची जी सार्वत्रिक वृत्ती दिसते तशी त्यांच्यातही होती. बिल्डरने सर्व सदनिका विकून झाल्यावर आपले अंग  हलकेच काढून घेतले होते. ह्या सर्व सोईसुविधा जरी बिल्डरने करून दिलेल्या होत्या तरी ती राहिवाशांवर त्यांनी केलेली  मेहरबानी नव्हती, ह्या सर्वासाठी लागणारा प पसा त्यांनी रहिवाशांकडून आधीच वसूल केला होता. तरीही एक गोष्ट म्हणावी लागेल, मुंबईसारख्या दिवसेंदिवस बकाल होत जाणाऱ्या शहरात आपल्या राहण्याच्या ठिकाणी लोकांना प्राप्त झालेली दुर्मीळ अशी सौंदर्यरचना लोकांनी आपल्या कर्माने उद्ध्वस्त करून टाकली होती. कर्म धर्म संयोगाने तेथे त्यांच्याच नात्यातील एक व्यक्ती त्यांच्या सोसायटीतही अशीच परिस्थिती आहे म्हणून माझ्या अनुभवाला त्यांच्या अनुभावाची जोड देत होते. तेव्हा जागा घेणाऱ्यांनी ह्या वरवरच्या लावण्यमय स्वरूपाला भुलून जास्त पसे देऊन सदनिका विकत घेण्यापूर्वी ह्या सर्व वास्तवाचाही अवश्य विचार करायला हवा. पण ह्याचा अर्थ त्यांनी अशा सुंदर परिसराने युक्त ठिकाणी घर घेऊ नये असा नाही, तर अशाच ठिकाणी रहायला जावे पण तो परिसर जसा सुंदर आहे तसाच कायम  राहील ह्यासाठी सर्वाना बरोबर घेऊन प्रयत्न करावेत. कारण अशा निसर्गरम्य आणि म्हणून दुर्मीळ ठिकाणांचे आपल्या कुटुंबाचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी फार मोठे योगदान असते.