कला वक्तृत्वाची : अविनाश धर्माधिकारी

निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे आज, शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. धर्माधिकारी यांनी जून १९९६ ते डिसेंबर १९९७ कालावधीत ‘लोकसत्ता’मध्ये ‘नागरिक’या नावाचा स्तंभ चालविला होता. दर मंगळवारी हे सदर प्रसिद्ध होत होते. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या निमित्ताने त्या सदरातील समारोपाच्या लेखातील काहीभाग. या भागाबरोबरच ‘कला वक्तृत्वाची’ हे सदर येथे समाप्त होत आहे.

आज स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण एका अत्यंत अर्थपूर्ण आणि निर्णायक वळणावर आहोत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, देशद्रोही आणि तत्त्वशून्य राजकारण, पर्यावरणाचा नाश, वाढती विषमता, निरक्षरता, बेरोजगारी, स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, फुटीरतावाद हे घटक प्रबळ होत गेले तर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण नष्ट होऊ. पण याच पन्नास वर्षांत गाठता आलेली अन्नधान्याची स्वयंपूर्णता, शास्त्र-तंत्रज्ञानातील प्रगती, अणू-अवकाश-अंटाक्र्टिका-जैव तंत्रज्ञान-सुपर कंडक्टिव्हिटी-संगणक, इत्यादी घटक प्रबळ होत गेले तर भारताच्या इतिहासातलं एक नवीन, अभूतपूर्व सुवर्णयुग आपण निर्माण करू शकू. यातनं काय निवडायचं, हा ऐतिहासिक पर्याय आपल्यासमोर आहे. कुठले तरी ग्रह-तारे, कुठला तरी नॉस्टड्रॅमस किंवा बहुउद्देशीय कंपन्या याविषयीचा निर्णय करणार नाहीत. तो इथल्या प्रत्येक नागरिकाच्या अंत:करणातून आणि कृतीतूनच आकाराला येणार आहे.

नव्या सुवर्णयुगाच्या आशेचं हे स्वप्न मांडताना देश मध्यावधी निवडणुकांना सामोरा जातोय. सर्वच पक्ष, आघाडय़ांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलंय आणि एकमेकांच्या नागडेपणाचा शंख करणं चाललंय. राजकारण पन्नास वर्षांतल्या सर्वात नीच पातळीला पोचलंय हे बरंच आहे. गटाराचे हे सर्व पूर वाहून, ओसरून गेले की स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी वाटा तयार होतील. तोवर मात्र स्वच्छ, निर्मळ पाण्यानं आपलं स्वत्व जपून ठेवायला हवं. गटाराच्या संगतीत धीर सोडून, शॉर्ट टर्म फायद्यांसाठी स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पाण्यानं गटाराशी आघाडी केली, तडजोड  केली, सीट अ‍ॅटजस्टमेंट  केली, तर सत्तेच्या सिंहासनावर गटारच ओघळणार आहे. आपलं स्वत्व आपणच जपून ठेवायला हवं. त्यासाठी नागरिक म्हणून एकत्र यायला हवं. गेल्या पन्नास वर्षांत या सामान्य नागरिकांनीच पुन्हा पुन्हा आपली राजकीय प्रगल्भता सिद्ध करुन दाखवली आहे. ही प्रगल्भता ही आपली बहुधा शेवटची आणि सर्वात भरवशाची आशा आहे.

आपण नीट विचारपूर्वक दिलेलं एकेक मत आणि आनंदानं बजावलेलेलं एकेक  कर्तव्य नव्या सुवर्णयुगाचं मंदिर घडवेल. ‘नागरिक’ हा त्या मंदिराचा एक स्तंभ. वेगवेगळ्या स्वरूपातल्या नागरिकांच्या समित्या, इथल्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण सर्व मिळून तयार होणाऱ्या देशकारणाला दिशा देऊ शकतील. कारण जगातली सर्व तत्त्वज्ञानं, सर्व धर्म, सर्व विचारधारा, सर्व पोथ्या या सर्वाचा मानवी जीवनाच्या रोजच्या जगण्याच्या पातळीवर एका ओळीचा सारांश काढायचा, तर तो अगद सोपा आहे. तो म्हणजे स्वत:चं कर्तव्य आनंदानं करत जगणं. मला समजणाऱ्या भारतीय/वैश्विक संस्कृतीचा आत्मा हाच आहे. आणि आज तरी दुर्दैवानं संपूर्ण भारतवर्षांत हा आत्मा हरवलेला आहे. आपण कर्तव्य चुकवणारा समाज बनलोय. आणि चुकवत चुकवत कधी कर्तव्य बजावलंच तर ते खत्रूडपणे, रडत-भेकत, आदळआपट करत, घिसाडघाईनं, अकार्यक्षमतेनं, शोषणाचे साक्षीदार बनत आपण कर्तव्य बजावण्याची ‘पाटी’ टाकतो. शंभर कोटींच्या या मानवतेला उत्थानासाठी हवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कर्तव्य बजावणाऱ्या नागरिकांची सेना. संघटित सेना. आम्हाला शिवाजी जन्माला यायला हवा असतो, पण तो शेजाऱ्याच्या घरात. माझ्या घरात आपला पोटार्थी तडजोडवीरच जन्माला यावा. हे झुगारून देऊन आपणच अफजलखानाचा कोथळा काढणारा व आपल्यातच लपलेला शिवाजी बाहेर काढायला हवा. वाघनख्यांसकट. आता आपला उद्धार दुसरा कोणी तरी करणार नाहीये, आपला उद्धार आपणच करायचाय, या भूमिकेवर जेवढे जास्त नागरिक येतील, तेवढा हा देश, हे विश्व जगायला अधिक सुंदर जागा बनेल.

नाही तर सामान्य नागरिकाला लाथा बसतातच आहेत. आपला नुसता जगत राहण्याचा संघर्ष रोज जास्त जास्तच अवघड बनतोय. तो संघर्ष लढत, धडपडत, चाचपडत आपण जगतो. वर लाथा खात राहतो. लाथा देणारा बदलतो. त्याची विचारधारा, रंग, त्याची परिभाषा बदलते, पण नागरिकाला लाथा चालूच राहतात. याला खरा उपाय एकच. लाथा खाणारा हा स्तंभ कडाडू दे. त्यातून विधायक आणि आक्रमक नागरिक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे. मानवी सन्मान आणि आत्मविश्वास असलेला, आपलं कर्तव्य आनंदानं करणारा नागरिक म्हणजे हा नरसिंह. विसाव्या शतकाच्या संध्यासमयी, एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर राक्षसही नाही आणि देवही नाही अशा माणसांच्या संघटित नख्यांनी दुष्ट, भ्रष्ट, लुटारू, चारित्र्यशून्य, अन्याय, अनीतिसंपन्न हिरण्यकश्यपूंची पोटं फाडून काढू दे. हा स्तंभ कडाडू दे.

आता सामान्य नागरिकानं

नख्या रोवाव्यात जमिनीत खोल

अन् मान ठेवावी ताठ

क्रूरच असतील कर्मभोग, तर

बळकट व्हावेत हात

तर आता, कामाला सुरुवात करू या.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.

संकलन –  शेखर जोशी