भारत आणि इंडिया ही ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांनी केलेली मांडणी. देशाचा ग्रामीण भाग म्हणजे भारत. तो अजूनही मागासलेल्या अवस्थेत आहे असा त्याचा ढोबळ अर्थ, पण आज या ‘भारता’चीही फाळणी झाल्याचे चित्र दिसत असून, तेथेही जागोजागी ‘इंडिया’ दिसत आहे. बागायती पट्टय़ातील गावांतील चकचकीत मॉल्स, आलिशान गाडय़ांची शोरूम, बीअर बार, हॉटेले आणि रिसॉर्ट, एवढेच नव्हे तर आलिशान मंगल कार्यालये यांतून तेथील बदललेल्या अर्थकारणावर चांगलाच प्रकाश पडतो. त्यातीलच एक कवडसा.. भारतातील इंडियाचे चित्र सुस्पष्ट करणारा..

शेती परवडत नाही, ही नेहमीची ओरड. त्यात काहींसाठी तथ्य आहे, काहींसाठी तो नुसताच कांगावा आहे. यातले पहिले काही म्हणजे छोटे बागायतदार, अल्पभूधारक, गरीब कास्तकार. दुसरे म्हणजे बडे बागायतदार. स्वत:ला बळीराजा म्हणवून घेणारे, पण बहुतांश चित्र असे की, त्यातील बळी केव्हाच बाद झाला आहे आणि उरला आहे तो केवळ राजा. घरचा बारदाना घरच्यांवर सोपवून गावपांढरीत पुढारकी करणारा, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारा राजा. पूर्वी गावातल्या फुफाटय़ातून हे vv03राजे फटफटय़ांवर फिरत असत. जावा, येझ्दी, राजदूत. कारभारी जरा मोठाच असेल तर बुलेट. मधल्या काळात गाव तेथे एसटीमुळे रस्त्यांवर डांबर नाही तरी खडी तरी पडली. रस्ते सुधारले आणि त्यावरून धावणारी वाहनेही बदलली. फटफटय़ांवरून उडणारे शेमले दिसेनासे झाले. त्यांऐवजी मोटारी आणि जीपगाडय़ांतून रेबनचे गॉगल लावून फिरणारे टिनोपॉली सफेद कपडय़ांतले गाडीवान दादा दिसू लागले आणि हे चित्र केवळ पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध बागायती पट्टय़ांतीलच नाही. इतरत्रही हेच दिसते. उदाहरणार्थ नाशिक जिल्हा.

उत्तर महाराष्ट्रातील हा कांदा आणि द्राक्ष उत्पादक जिल्हा. निफाड, पिंपळगाव, पालखेड, खेडगाव, वडनैर भैरव हा तेथील परिसर दर्जेदार द्राक्षांसाठी नावाजलेला. या जिल्ह्य़ात यंदा गारपिटीने मोठेच नुकसान केले. या भागातल्या अनेक गावांमधून फिरले की दिसतात ते ऑइलपेंटने रंगवलेले बंगले वा शेतघरे आणि त्यापुढे उभ्या असणाऱ्या चारचाक्या. मोटारींची मांदियाळीच. शेजारच्या जळगाव जिल्ह्य़ातील रावेर हा केळीउत्पादक पट्टाही यात मागे नाही. या भागांमधील किमान ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांकडे एक वा त्याहून अधिक चारचाकी मोटारी असल्याचे सांगण्यात येते. मारुती आणि टाटाच्या मोटार आणि जीप गाडय़ा हे त्यातल्या त्यात कमी मोठय़ांचे वाहन. बडय़ांची धाव केव्हाच त्या पुढे गेली आहे. पूर्वी फक्त टीव्हीच्या रंगीत खोक्यातूनच दिसणाऱ्या ऑडी, मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्लू, पजेरो अशा आलिशान मोटारीही आता सहजपणे या बागायती पट्टय़ांतून दिसतात. या वाहनांची किंमत असते किमान ४० लाख ते कमाल तीन कोटी.
बाजारात एखादे नवे मॉडेल आले रे आले, की ते लगेच या भागातल्या रस्त्यांवरून धावताना दिसतेच. पूर्वी ही मक्तेदारी उद्योजक, बांधकाम व्यावसायिक वा तत्सम कोटय़धीशांची असे. ही मंडळीच अशा मोटारगाडय़ांच्या खरेदीचा विचार करू शकतात असाच एक सार्वत्रिक समज असे, पण आता त्यास बळीराजानेही छेद दिला आहे.

वाहनखरेदी म्हटले, की पांढरपेशी नोकरदार मंडळी पहिल्यांदा बँकांच्या तोंडाकडे पाहणार. ऑन किती द्यायचे आणि ईएमआय किती पडणार याचा विचार करणार. नाशिक, जळगावच्या विशिष्ट पट्टय़ांतील बागायदारही अशा वेळी बँकांकडे पाहत नाहीत असे नाही. त्यांनाही बँकांमध्ये जावे लागते, पण कर्जासाठी नाही. आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी. नाशिक आणि जळगावातील वाहनवितरकांचा हा नेहमीचा अनुभव आहे. मर्सिडिज बेन्झचे एक वितरक आहेत ओम मोहरीर म्हणून. ते सांगतात, ‘शेतकरी ग्राहक जास्त करून रोख पैसे देऊनच वाहनांची खरेदी करतात. आता या ग्राहकांमध्ये शहरी आणि ग्रामीण असे काही सांगणे अवघड आहे. कारण ग्रामीण भागात शेती असलेले, पण शहरात इतर व्यवसायात गुंतलेले अशा ग्राहकांची संख्या बरीच आहे. त्यांना ब्रँड हवा असतो. आपला वापर कसा आहे यावरून तो गाडीची निवड करतो.’ पण ग्रामीण भागात कोणती कार अधिक चालते, असे विचारल्यावर ते सांगतात, ग्रामीण शेतकऱ्यांनी मर्सिडिज बेन्झला चांगला प्रतिसाद दिला आहे. म्हणजे हे शेतकरी लाखो रुपयांचा हा माल रोकड देऊन घरी घेऊन जातात. शास्त्रीजींनी ‘जय किसान’ अशी घोषणा दिली होती. ती अल्पांशाने का होईना पण प्रचंडच खरी ठरली आहे.

मर्सिडिज बेन्झसारखी महागडी कार रोख पैसे देऊन खरेदी करण्याएवढी संपन्नता येथील शेतकऱ्याकडे असणे ही खरोखरच आनंदाचीच बाब मानली पाहिजे. पण याच भागातील काही बागायतदार अस्मानी संकटाने कोलमडून पडत असताना, त्यातील काही सरकारने मदत न केल्यास आत्महत्याच करावी लागेल, असे सांगत असताना, काही शेतकऱ्यांकडेच एवढी सधनता आली कोठून? द्राक्ष आणि केळीतून मिळणारे उत्पन्न व त्या अनुषंगाने तयार झालेले उद्योग हे त्याचे उत्तर. नाशिकच्या निफाड, पिंपळगाव, पालखेड, खेडगाव आदी पट्टय़ातील द्राक्षे मोठय़ा प्रमाणावर निर्यात होतात हे एक. दुसरे म्हणजे काही भागांतील द्राक्षे हंगामाच्या प्रारंभीच बाजारात येतात. त्यामुळे इतरांच्या तुलनेत आपसूकच त्यांना चांगला भाव मिळतो. काही बडय़ा बागायतदारांचे शेतीनिगडित जोडधंदेही आहेत. द्राक्षबागांसाठी रासायनिक पदार्थ, औषधे लागतात. काही जण ती परदेशातून मागवतात आणि येथील छोटय़ा उत्पादकांना विकतात. हा व्यवसायही चांगलाच बहरला आहे. द्राक्षबागेच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक उत्पन्न या धंद्यातून मिळते. काही शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच स्थावर मालमत्ता क्षेत्रात प्रवेश केला आहे. हे असे आर्थिक बागा फुलवणारे शेतकरी हेच आलिशान वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचेही लक्ष्य असतात. चारचाकी वाहनांच्या शोरूमची वाढती संख्या हे त्याचेच लक्षण आहे. हे सगळे वाचल्यावर, द्राक्ष, ऊस, केळी यांसारखी नगदी पिके घेणारेच चारचाक्यांची चैन करू शकतात, असे कोणी म्हणेल. त्यात तथ्य आहेही, पण अर्धेच. ते पाहण्यासाठी आपल्याला नाशिकहून मध्ये दोन जिल्हे सोडून अमरावतीला यावे लागेल.
विदर्भातील अमरावती जिल्हा. बहुतांश शेती कोरडवाहू. पावसाच्या लहरीवर अवलंबून. त्यामुळे कास्तकाराच्या कपाळावर कर्जबाजारीपणाचा शिक्का कोरलेलाच, पण याच भागात अनेक शेतकरी सधनही आहेत आणि त्यांच्याकडे चारचाकी वाहनाचा बोजा उचलण्याची ताकदही आहे. जिल्ह्य़ातील कारमालकांपैकी सुमारे २५ टक्के शेतकरी आहेत. हे गणित कोणास चुकीचे, कोणास अतिरंजित वाटण्याची शक्यता आहे, पण जिल्ह्य़ातील वाहनांच्या आकडेवारीवर नजर टाकली की चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होते.

एस. के. वाडेकर हे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. अमरावती जिल्ह्य़ातील एकूण कार व्यवहाराबद्दल माहिती देताना ते सांगतात, जिल्ह्य़ात गेल्या आर्थिक वर्षांत एक हजार ८४९ कारची नोंदणी झाली. एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत एक हजार ८८९ नवीन कारची नोंदणी झाली. जिल्ह्य़ात २००९ मध्ये कारची संख्या होती ११ हजार २५६. दर वर्षी त्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होत आहे. २०१२ मध्ये कार बाळगणाऱ्यांची संख्या २० हजार ८९६ होती. ती आता २५ हजारांच्या पलीकडे गेली आहे.

अमरावतीत एकूण सात प्रमुख कारविक्रेते आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर समजते की, कार खरेदी करणाऱ्यांपैकी २० ते २५ टक्के शेतकरी आहेत. त्यातील अनेकांकडे महागडय़ा गाडय़ाही आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये विविध ठिकाणांहून अठराशेवर कारची खरेदी झाली. त्यातल्या सुमारे ३० ते ४० टक्के लोकांनी आपला व्यवसाय शेती असल्याचे नमूद केले आहे. त्यातले काही संमिश्र व्यावसायिकही आहेत. कार खरेदीच्या वेळी काही नोकरदार आणि उद्योजकही आपला व्यवसाय शेती असल्याचेच लिहून देतात. पण कारमालकांपैकी २० ते २५ टक्के लोक हे सधन शेतकरी असल्याचे दिसून आले आहे. येथील ‘अॅस्पा बंडसन्स’चे संचालक रणजित बंड हेसुद्धा याला दुजोरा देतात.

अल्प आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कारचा खर्च परवडणारा नसतो. त्यांचा कल साधारणत: मोटारसायकलींकडेच असतो, पण बडय़ा बागायतदारांमध्ये मात्र कारचे चांगलेच आकर्षण आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही. त्यातील अनेकांच्या शेत-गराजांमध्ये आलिशान गाडय़ाही डौलाने उभ्या आहेत. त्याचीही खंत बाळगण्याचे काही कारण नाही. आपल्या गाडीवान दादाने ढवळ्या-पवळ्याच्या खांद्यावर जू ठेवून बैलगाडीच हाकावी असे कोणीच म्हणणार नाही. त्याने ‘कार’वान दादाही बनावे. फक्त एसी कारमध्ये बसून डोळ्यांत धुरळा गेल्याचा कांगावा करू नये.

नाशिकमध्ये वर्षांत १६७ आलिशान मोटारींची खरेदी 
नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदीनुसार वर्षभरात १६७ नव्या आलिशान मोटारींची नोंदणी झाली. गत वर्षांच्या तुलनेत या मोटारी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. २० लाख ते तीन कोटी रुपये किंमत असणाऱ्या मोटारी या विभागाने आलिशान श्रेणीत समाविष्ट केल्या आहेत. वर्षभराच्या काळात बीएमडब्लू १६, मर्सिडिज बेंझ ३२, ऑडी ३१, पजेरो स्पोर्ट्स १०, फॉच्र्युनर ३२ यांच्यासह रेंज रोव्हर, जॅग्वॉर, रेक्स्टॉन आदी प्रकारंच्या १६७ आलिशान मोटारी ग्राहकांनी खरेदी केल्याचे लक्षात येते.

(माहिती संकलन – अनिकेत साठे- नाशिक, मोहन अटाळकर- अमरावती)