नामदेव ढसाळ  यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोटय़ा गावी झाला. त्यांच्या आईचं गाव कनेरसर. ही दोन्ही गावं नदीच्या दोन्ही तीरावर आहेत, पुण्यापासून ४० किमी अंतरावर. ढसाळ लहानपणीच वडिलांसोबत मुंबईत आले. इथल्या गोलपिठात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे वडील खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करत. ढसाळांचं पाचवीपासूनचं शिक्षण मुंबईतच झालं. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं, वेश्यावस्तीतही काम केलं. याच काळात चळवळीकडे ते वळले.
१७-१८व्या वर्षांपासूनच ढसाळांनी कविता लिहायला सुरुवात केली. टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळ एकदा एका कविसंमेलनाला गेले होते. तिथं त्यांनी विचारलं की, मलाही कविता वाचायचीय. हा गबाळा मुलगा काय कविता वाचणार या हेटाळणीनं त्यांना परवानगी दिली. पण त्यांच्या कविता ऐकून सगळे अवाक झाले. नंतर ग. दि. माडगूळकर म्हणाले, ‘आता रसाळ नामदेवांचा (संत नामदेव) काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.’
विद्रोहाच्या प्रखर व तीव्र स्वर असलेल्या त्यांच्या कवितेनं सर्व साहित्य-जगताचं लक्ष वेधून घेतलं. ‘गोलपिठा’ (१९७२) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मुंबईचं अधोविश्व आणि दलित समाजाच्या व्यथा-वेदना त्यांनी अतिशय रांगडय़ा, जोशपूर्ण आणि कळकळीनं आपल्या कवितेतून मांडल्या.
‘गोलपिठा’तल्या सगळ्याच कवितांनी आणि त्यातल्या धगधगीत वास्तवानं मराठी साहित्याला आणि मराठी समाजाला हलवून सोडलं. ‘मंदाकिनी पाटील’ ही त्यातली अशीच एका वेश्येची कहाणी सांगणारी दाहक कविता. ‘गोलपिठा’ला विजय तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. (त्या वेळी ढसाळ तेंडुलकरांना ‘सर’ म्हणत, पण नंतर त्यांचे संबंध तणावपूर्ण झाले. तेंडुलकरांची ‘कन्यादान’, ‘कमला’ ही नाटकं दलितविरोधी, त्यांची मानहानी करणारी असल्यानं ढसाळ त्यांचे विरोधक बनले. त्यांचा तो राग तेंडुलकरांच्या निधनापर्यंत कायम राहिला.)
नामदेव ढसाळांनी ‘आंधळे शतक’ या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलंय की, ‘जगातला सर्वात जुना व्यवसाय हा वेश्याव्यवसाय समजला जातो. देहविक्री करून चरितार्थ चालवणं हे पाश्चात्त्यांत प्राचीन काळी गलिच्छ मानलं जात नव्हतं. मुंबईतला प्रतिष्ठित वेश्याव्यवसाय १७ व्या शतकातच सुरू झाला असं मानलं जातं.’
मुंबईतला रेड लाइट एरिया म्हणजे कामाठीपुरा, फोरास रोड, पूर्वीचा फॉकलंड रोड, गोलपिठा, जमना मॅन्शन, गँट्र रोड पूल.. या एरियातल्या प्रत्येक गोष्टीविषयी ढसाळांना तपशीलवार माहिती होती. ‘आंधळे शतक’मध्ये त्यांनी लिहिलंय, ‘प्रत्येक मालकिणीच्या मागे माफिया असतो. कामाठीपुऱ्यात अशा १६ टोळय़ा आणि १०० मनीलेंडर्स आहेत. रेड लाइट एरियावर नियंत्रण ठेवणारी व्हिजिलन्स ब्रँच देहापासून दिडकीपर्यंत सर्व प्रकारचे हप्ते राजरोस उकळत असते. ते पोलीस अधिकाऱ्यापासून उच्चाधिकाऱ्यापर्यंत जातात.’
ढसाळांचं ‘पिला हाऊस’शी जवळचं नातं आहे. त्यांची ‘पिला हाऊसचा मृत्यू’ नावाची कविताही आहे. लेखही लिहिलेत. ‘कामाठीपुरा’, ‘संत फॉकलंड रोड’, ‘भेंडी-बाजार’ या काही कविताही अशाच.
मलिका अमरशेख यांच्याबरोबरचं नामदेव ढसाळ यांचं आयुष्यही बरंचसं वादळी राहिलं. १९८० च्या दशकात काही काळ ते वेगळेही राहिले आहेत. मलिकाताईंनी मला ‘उद्ध्वस्त व्हायचंय’ या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्याविषयी फार उघडपणे लिहिलंय. मात्र त्यांचा मुलगा आशुतोषनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं. सध्या अंधेरीच्या घरी ते तिघे एकत्र राहत.
राजकीय चळवळ
९ जुलै १९७२ रोजी कवी ज. वि. पवार यांच्यासह ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेची स्थापना. १९७५-८० दरम्यान शिवसेनेचा ‘टायगर’ (बाळासाहेब ठाकरे), फॉरवर्ड ब्लॉकचे ‘लॉयन’ (जांबुवंतराव थोटे) आणि दलितांचा ‘पँथर’ (नामदेव ढसाळ) अशा तीन शक्ती तोडीस तोड मानल्या जायच्या. ‘तुमचा टायगर तर आमचा पँथर’ अशा घोषणा पँथरचे कार्यकर्ते द्यायचे. पण दशकभरातच या संघटनेत फूट पडली. ढसाळ यांचं आणीबाणीला उघड उघड समर्थन होतं. त्यांनी ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र-प्रियदर्शिनी’ नावाची एक दीर्घ कविता इंदिरा गांधींवर लिहिली आहे. दरम्यान, काही काळ ढसाळ यांनी काँग्रेसमध्येही काम केलं. मग नंतरच्या काळात नामदेव ढसाळ राजकारणापासून काहीसे बाजूला का पडले. १९९० नंतर ढसाळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. १९९२ साली नामदेव ढसाळ खासदार होते. त्याआधीही एकदा खेडमधून, तर एकदा मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. अलीकडच्या काळात ढसाळांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. एवढंच नव्हे तर त्यांच्या राजकीय भूमिका अलीकडच्या काळात सातत्यानं वादग्रस्त ठरल्या.
साहित्य चळवळ
गेली काही र्वष ढसाळ मुंबईत ‘इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल’ भरवत होते. पण पैशाअभावी त्यात सातत्य राहिलं नाही. एका वर्षी गुंथर ग्राससारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला बोलावण्यात आलं होतं, परंतु काही कारणानं ते येऊ शकले नाहीत.
त्रिनिदादमध्ये वास्तव्यास असलेले नोबेल लॉरिट व्ही. एस. नायपॉल जेव्हा जेव्हा भारतात, विशेषत: मुंबईत येत, तेव्हा तेव्हा ढसाळांना सोबत घेऊन फिरत. ढसाळांकडून त्यांनी कामाठीपुऱ्यापासून अनेक गोष्टी समजावून घेतल्या, पण त्याविषयी दूषित नजरेनं लिहिलं. ढसाळांचा त्यांच्याबरोबरचा अनुभव काही चांगला नाही. ढसाळ त्यांना ‘त्रिनिदादचा ब्राह्मण’ म्हणत. दिलीप चित्रे यांनी गौरी देशपांडे यांच्या घरासमोर ‘साहित्य सहवासा’त धरणं आंदोलन केलं होतं. त्यात नामदेव ढसाळ सहभागी झाले होते. नंतर एकदा चित्रे यांनी ‘साहित्य सहवासा’तील दडपशाहीविरुद्ध आंदोलन केलं, तेव्हा नामदेव ढसाळ यांनी चार-पाच लॉऱ्या भरून पँथर कार्यकर्ते आणि भाई संगारेसह पाठिंबा दिला होता.
लेखन
डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले. जानेवारी १९८१ मध्ये त्यांना ‘मायस्थेनिया ग्रेविस’ हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर गेली ३०-३२ वर्षे ते या आजाराशी लढत होते. पण या काळातही त्यांनी तेवढय़ाच जोमानं कवितालेखनही केलं.
आतापर्यंत त्यांचे एकंदर बारा कवितासंग्रह आणि दोन कादंबऱ्या आणि चार लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘आज दिनांक’मध्ये ‘माहौल’ नावानं त्यांनी सदर लिहिलं होतं. त्यातल्या जहाल, रोखठोक आणि आगपाखड करणाऱ्या भाषेमुळे ते चांगलंच गाजलं. त्याचंच पुढे ‘आंधळे शतक’ हे पुस्तक आलं. ‘सामना’ या दैनिकात त्यांनी प्रदीर्घ काळ ‘सर्व काही समष्टीसाठी’ हे सदर लिहिलं तर ‘सत्यता’ या साप्ताहिकाचंही काही काळ संपादन केलं. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादाला २००७चा ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार मिळाला आहे.
ढसाळांचा ‘तृष्णा’ या नावानं गाण्याचा अल्बमही येणार होता. त्यातली गाणी शंकर महादेवनसारख्या नामवंतांनी गायलीत. या अल्बमचं रेकॉर्डिगही झालंय. पण अजून तो काही आलेला नाही. त्याच्या रेकॉर्डिगच्या सी. डी. ढसाळांच्या घरी धूळ खात पडल्यात.  ढसाळांचा स्वतंत्र म्हणावा असा शेवटचा संग्रह म्हणजे ‘निर्वाणा अगोदरची पीडा’. या संग्रहातील ढसाळांची कविता ही विद्रोहाची नसून ती समष्टीच्या सनातन दु:खाविषयी बोलणारी आहे. व्यक्तिगत व सामाजिक विद्रोहापासून समष्टीच्या दु:खापर्यंत झालेला ढसाळ यांच्या कवितेचा प्रवास आता थांबला आहे.
ब्रेख्त हा नाटककार म्हणत असे, ‘फॅसिस्ट कवी-लेखकांना पहिले ठार मारतात, पण आता काळ बदललाय, फॅसिस्टही बदललेत. आता ते कवी-लेखकांना जिवे मारत नाहीत. अनुल्लेखानं, बहिष्कृत करून मारतात.’ एका वेळी हा प्रयोग या मनोवृत्तीच्या लोकांनी भाऊ पाध्ये यांच्यावर केला होता. त्यानंतर तो नामदेव ढसाळ यांच्यावर केला गेला. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ढसाळांची कविता भारतभर आणि जगातही अनेक ठिकाणी पोचली, वाखाणली गेली.
अलीकडे नामदेव ढसाळ अंधेरी-मालाड लिंक रोडवर ‘मोगल दरबार’ नावाचं छोटंसं हॉटेल चालवत होते. आजच्या मराठी समाजात कवी-लेखकांना सुखा-समाधानानं जगणं महाकठीण. गेली अनेक र्वष नामदेव ढसाळ यांनी त्याचा अनुभव घेतला. पण या समाजावर बहिष्कार टाकण्याएवढय़ा टोकाला जाण्याइतपत ते कधी कडवट झाले नाहीत. ढसाळांनी लेखनाकडे कधीही व्यावसायिक वृत्तीनं पाहिलं नाही. स्वत:ला ते प्रज्ञावंत-निष्ठावंत लेखक-कवीच मानत. त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता वजा केला तर उरतो तो फक्त लेखक-कवीच.
साहित्य अकादमी या भारतीय साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय संस्थेनं आपल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतभरातल्या साहित्यिकांमधून नामदेव ढसाळ यांची निवड केली. नामदेव ढसाळांना मराठीतील नोबेल पुरस्काराच्या तोडीचा लेखक मानलं जातं. त्यांच्या मोजक्याच कवितांचा इंग्रजीत अनुवाद झाला असला तरी जगभरातल्या नामवंत साहित्यिकांना नामदेव ढसाळ त्यांच्या हलवून टाकणाऱ्या कवितांमुळे माहीत आहेत.

मलिका अमरशेख यांच्या ढसाळांविषयीच्या अगदी अलीकडच्या कविता.
गेला दीड महिना ढसाळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असताना मलिका अमरशेख यांनी या कविता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बसून लिहिल्या.

Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

नामदेवसाठी
आयुष्य ताटकळत उभय एका पायावर
या पायाचा भार त्या पायावर तोलत
जसं सावरतो तोल डोंबारी दोरावर
फक्त थोडंसंच वर नजर उचलून पाहा
दिसेलच दाराबाहेर उभय आयुष्य
आणखीन पण आहेत लोक बरेच
उन्हाळे पावसाळे बाजूचा समुद्र त्याची गाज
घों घों करत दशदिशाची खबर आणणारा वारा
दूर पळणारं तरीही तुझ्या आत्म्याजवळ उभं
राहून रडवेल्या चेहऱ्यानं कासावीस तुझं पोरगं
तुझी बायको, मित्र, आप्तेष्ट न् तुझी समष्टी
हजारो मरणांतून तू परत आलायस
खेचलंय तुला कितीएक हातांनी
आजही तेच हात तुला खेचू पाहतायत
दे हात तुझा हातात-
याही वेळी अज्जात अलगद या वेदनेतून तू बाहेर
येशीलच-

प्रार्थना
हे दशदिशांच्या दिक्पालांनो,
चराचराला ढवळून काढणाऱ्या मरुतपुत्रांनो,
वसुंधरेला न्हाऊ घालणाऱ्या प्रपातनिर्झरांनो,
आणि आकाशाचं चुंबन घेत उडणाऱ्या
समुद्रपक्ष्यांनो,
या आणि मरणशय्येवर शरपंजरी पडून
असह्य़ यातना झेलणाऱ्या कवीचं दु:ख
घ्या वाटून
आसमंतातून विखरून नष्ट होऊ दे
त्याच्या वेदना
ज्यानं ओंजळीत घेतले आजवर
समष्टीच्या दु:खाचे निखारे आनंदानं
त्याची मुक्तता करा यातनांच्या
छळछावणीतून
दु:ख कधीच नसतंय चिमूटभर
ते विश्वव्यापी त्रिकालाला व्यापून राहणारं
पण प्रत्येकानं उचलली चिमूट
तर होईल नक्कीच नाहीसं
जो आयुष्यभर गात राहिला दु:खाची
आणि प्रेमाची गाणी
मांडत राहिला प्रश्न चव्हाटय़ावर
आणि आज झगडतो आहे एकटाच
स्वत:च्या शरीरधर्माच्या
यमयातनांशी
त्याला द्या बळ पुरेसं
पुन्हा आणा संजीवनी प्रत्येकच पर्वतावरून
पुन्हा जन्म घेऊ द्या शब्दांना
कवी मरत नसतात
मृत्यूलाही ते देतात मान शब्दांनी
विचार शब्द आणि कवींना घाबरतात
फक्त सत्ताधीश आणि मृत्यू
जीवनेच्छेनं कळलेली त्याची थरथरणारी
मूठ त्यात ठेवा कोमल फुलांचा गंध
आणि अक्षय आशेनं फुलणारे श्वास
पुन:श्च झेप घेतील त्याचे शब्द
निरभ्र आसमंतात
आणि पुन:श्च हसेल हिरव्या रोपातून शब्द
ऋतू येतील त्याची गाणी गात
पुन:श्च एकदा त्याच्या थकलेल्या
देहावर चमकेल वसंत
न्हाऊ घालेल वर्षां
धुऊन टाकेल यमयातनांच्या काळ्याकभिन्न सावल्या
आणि मग हसतील शब्दांचे पांढरेशुभ्र देवदूत
जे कधीच सोडून गेले नाहीत त्याला
लोकांच्या दु:खाची तळी उचलली त्यानं
आयुष्यभर
आता उचला त्याच्या वेदनांचा भार
प्रत्येकानं थोडासा
हसू द्या त्याला मोकळं जीवनानंदानं
कवी नसतात मृत्यू पावत
आणि कविताही नाही नष्ट होत
हे त्याच्याच डोळ्यात वाचलं मी
आयुष्य उभय त्याच्या अगदी जवळ
वाट पाहत त्याच्या अमोघ शब्दांची!
(परिवर्तनाचा वाटसरू, १५-३१ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रथम प्रकाशित)

ग्रंथसूची
कवितासंग्रह
* गोलपिठा, १९७२
* मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, १९७५
* आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी, १९७६
* तुही इयत्ता कंची? तुही इयत्ता.., १९८१
* खेळ, १९८३
* गांडू बगिचा, १९८६
* या सत्तेत जीव रमत नाही, १९९५
* मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, २००५
* तुझे बोट धरून चाललो आहे मी, २००६
* मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (संपा. सतीश काळसेकर-प्रज्ञा दया पवार), २००७
* निर्वाणा अगोदरची पीडा – नामदेव ढसाळ, २०१०
* चिंध्यांची देवी आणि इतर कविता, २०१२
कादंबऱ्या
* हाडकी हाडवळा, १९८१
* निगेटिव्ह स्पेस, १९८७
लेखसंग्रह
* आंधळे शतक, १९९५
* आंबेडकरी चळवळ आणि सोशलिस्ट, कम्युनिस्ट, २००१
* सर्व काही समष्टीसाठी, २००६
* बुद्ध धर्म आणि शेष प्रश्न
कवितांचे अनुवाद
* नामदेव ढसाळ : पोएट ऑफ द अंडरवर्ल्ड, निवड व संपादन – दिलीप चित्रे, २००७
* हमारे इतिहास का एक अपरिहार्य चरित्र : प्रियदर्शिनी, अनुवाद – रतनलाल सोनग्रा, १९७७
* आक्रोश का कोरस, अनुवाद चंद्रकांत पाटील, २०१२

पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९७२
* सोव्हिएट लॅण्ड नेहरू पुरस्कार, १९७५-७६
* महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार, १९८३
* पद्मश्री पुरस्कार, १९९९
* बहिणाबाई चौधरी पुरस्कार
* पद्मश्री सहकार महर्षी विखे-पाटील साहित्य पुरस्कार
* साहित्य अकादमी सुवर्णजयंती : जीवनगौरव पुरस्कार, २००५
* गंगाधर गाडगीळ पुरस्कार, २००६
* मारवाडी फाउंडेशनचा डॉ. आंबेडकर पुरस्कार, २०१०
* पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार, २०१०