भावनेच्या आहारी न जाता, कुठल्याही घटनेचा-परिस्थितीचा सारासार विचार करून मगच निष्कर्षांप्रत येणे आणि ते निष्कर्षही काळाच्या कसोटीवर तपासत राहण्याचे भान गोविंदराव तळवलकरांनी दिले.

गोविंदराव तळवलकर या नावाचा दराराच काही अजब होता. आणीबाणीनंतर राजकीय जाणिवा जागृत होऊन वाचायला लागलेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्राने आणि तळवलकरांच्या व्यासंगी लिखाणाने या पिढीवर उदारमतवादाचे संस्कार केले.  आणीबाणी उठली आणि ‘चुकलो, क्षमा’ असा अग्रलेख तळवलकरांनी लिहिला. त्यानंतर तळवलकरांचा अग्रलेख वाचायचा राहिला असं कधीच घडलं नाही. डावे आणि अति उजवे यांच्या उन्मादाला तळवलकरांनी सतत ठोकून काढलं आणि मध्यममार्गी उदारमतवादाची कास धरली. त्यांचा आर्थर कोस्लरवरचा अग्रलेख, कार्ल मार्क्‍सच्या जन्मशताब्दीच्या वेळी १९८३ मध्ये लिहिलेला अग्रलेख आणि असे इतर अनेक अग्रलेख वाचकांच्या मनावर अक्षरश: कोरले गेले. कधी उपहासगर्भ होऊन तळवलकर कोणाला अग्रलेखांत धारेवर धरतील याचा नेम नसे. त्यातून शरद पवार, अंतुले यांसारखे राजकारणीही सुटले नाहीत. तसेच गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे साहित्यिकही. त्याच्या प्रचंड व्यासंगातले नमुने अग्रलेखांत चपखलपणे येत आणि त्या त्या विषयाचं परिमाणच बदलून जात असे. अशीच एकदा लक्ष्मण माने, अरुण कांबळे यांनी लंडनमध्ये दलित साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना काढली होती. त्यावर ‘आता लंडनमध्ये दलित’ अशा शीर्षकाखाली तळवलकरांनी अग्रलेख लिहिला. त्यात ‘लंडन हे काही काळ परागंदा क्रांतिकारकांचे माहेरघर होते. मार्क्‍स तिथे होता. लेनिनही होता’ असा संदर्भ देत तळवलकरांनी लिहिलेला अग्रलेख खुमासदार झालेला होता आणि त्याच्यात द्वेषाचा लवलेशही नव्हता. पत्रकारितेत प्रवेश करू पाहणारे आम्ही सारे जण ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जाण्यासाठी केवळ उत्सुकच नव्हे तर उतावीळ होतो. तळवलकरांसारखे व्यासंगी संपादक हे त्याचे प्रमुख कारण होते. प्रवेशही सोपा नसे. मी जेव्हा ‘सकाळ’मध्ये होतो तेव्हाची गोष्ट. १९८६-८७ साल असावं. सीमाप्रश्नावर नेहमीप्रमाणे एक आंदोलन झाले आणि विरलेदेखील. त्यावर संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे एक अध्वर्यू कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची मी मुलाखत घेतली. डांगे यांनी ‘आता हा वाद मिटवून टाका’ असे सांगून या आंदोलनाच्या विरोधात या मुलाखतीत भूमिका मांडली होती. ‘सकाळ’मधल्या त्या मुलाखतीवर दुसऱ्याच दिवशी तळवलकरांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये अग्रलेख लिहिला आणि माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. काही दिवसांतच ‘मटा’मधील एक ज्येष्ठ पत्रकार स्व. अशोक आचार्य यांनी मला निरोप दिला: ‘तळवलकरांनी तुला भेटायला बोलावलं आहे’.!  त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, पण त्यांना प्रत्यक्ष भेटायचं आहे याचं प्रचंड दडपण आलं. भेट झाली आणि मी ‘मटा’मध्ये दाखल झालो.

तळवलकर कोणाशी फारसे बोलत नाहीत. ते, त्यांचे लिखाण आणि त्यांचे वाचन. बस्स! अशीच त्यांची प्रतिमा होती, पण ‘मटा’त गेल्यावर लक्षात आले की, प्रत्यक्षातले तळवलकर वेगळे आहेत. अग्रलेख लिहून झाले की दुपारच्या जेवणानंतर तळवलकर अनेकदा आमच्यात येऊन बसत. बाहेरच्या जगात काय काय चाललं आहे, याचा अनेकदा वार्ताहरांकडून कानोसा घेत. लेखनातल्या वस्तुनिष्ठतेला त्यांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व असे. त्यांचं व्यासंगी व्यक्तिमत्त्व, मितभाषीपणा आणि शिस्त यामुळे संपादकपदाला एक वेगळं वलय प्राप्त झालं होतं. ‘‘नुसतं पद मिळालं की कोणी मोठं होत नाही; त्या पदाला मोठं करण्याआधी तुमच्या स्वतकडे नैतिक अधिष्ठान असावे लागते,’’ असं एकदा तळवलकर माझ्याशी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य होतं. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असतानाच १९९१ साली तळवलकरांनी मला ‘विशेष प्रतिनिधी’ म्हणून दिल्लीला पाठवलं. त्यांच्या या निर्णयाने माझं विश्वच पालटून गेलं. तोपर्यंत विद्यापीठ, न्यायालय आणि पुढे राजकीय घडामोडींचं वार्ताकन मी करत असे. ‘‘दिल्ली वेगळी आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं ते महत्त्वाचं केंद्र आहे. खूप शिकायला मिळेल,’’ असं ते म्हणाले होते आणि ते खरंच होतं. भारताच्या एकूण धोरणविषयक बाबींचं दिल्ली हे फक्त केंद्रस्थानच नव्हे तर एक इंटलेक्च्युअल कॅपिटल देखील होतं. दर सहाएक महिन्यांतून एकदा तळवलकर दिल्लीत येत. त्याच्या महिनाभर आधी कोणाकोणाला भेटायचं आहे, याची यादी माझ्याकडे पाठवत. त्यात मधु लिमये, अटलबिहारी वाजपेयी, विठ्ठलराव गाडगीळ, शंकरराव चव्हाण, पी.व्ही. नरसिंह राव, प्रणब मुखर्जी, अर्जुनसिंग, डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबरच ब्रिटन, अमेरिका आदी देशांच्या भारतातील राजदूतांचाही समावेश असे. हे देश भारतातील घडामोडींकडे कसे बघतात, हे समजून घेणं हा या भेटीमागचा हेतू असे. मधु लिमये, गाडगीळ, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांच्याबरोबर त्यांच्या भेटीगाठी होत. ती एक बौद्धिक मेजवानीच असे. हे चारही नेते व्यासंगी होते. त्यांच्याशी राजकारणाव्यतिरिक्त वाचलेल्या पुस्तकांविषयी तळवलकरांची चर्चा होई. तळवलकर महाराष्ट्रातील वर्तमानपत्राचे संपादक. दिल्लीतील सत्तेच्या वर्तुळात तिथल्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या संपादकांचा दबदबा, पण तळवलकरांच्या बाबतीत सर्वत्र एक अपार आदर होता आणि त्यांचं व्यासंगी व्यक्तिमत्त्व त्याला कारणीभूत होतं. यापकी कोणत्याही नेत्याची त्यांच्यासाठी वेळ मिळवायला कधीच फारसे प्रयत्न करावे लागत नसत. तळवलकरांचा व्यासंगी वावर दिल्लीत असा लीलया चालत असे. दिवसभर भेटीगाठी झाल्या की, ते जिथे उतरत त्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये त्यांचे कोण ना कोणाबरोबर डिनर ठरलेले असे. त्यांच्याबरोबर ते आम्हा सहकाऱ्यांना आवर्जून नेत. त्यांच्याबरोबरच्या या गप्पा ही एक वेगळीच मेजवानी असे. शामलाल, प्रभाष जोशी, दिलीप पाडगांवकर, ‘हिंदुस्तान टाइम्स’चे संपादक एच. के. दुआ, अरुण शौरी, ‘मेनस्ट्रीम’चे संपादक निखिल चक्रवर्ती अशा जाणत्या व्यासंगी पत्रकारांसोबत तळवलकरांच्या गप्पांच्या मफली रंगत. असेच एकदा खुशवंत सिंग यांच्याकडेही तळवलकर मला घेऊन गेले. ती संध्याकाळ तर केवळ अविस्मरणीय. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे संपादक दिल्लीत जरूर येत; मराठी वर्तुळापलीकडे जात नसत, पण अशी विविधांगी भेट देणारे तळवलकर एकमेव होते. या भेटीत अनेक धोरणविषयक तसेच राजकीय बाबींविषयीच्या माहितीने समृद्ध होऊन ते मुंबईत परतत आणि नंतरच्या त्यांच्या लिखाणात या साऱ्या चर्चाचे प्रतििबब पडलेले जाणवत असे. त्यामुळे ‘तळवलकर कोणात मिसळत नाहीत, माणूसघाणे आहेत’ असं मी तरी कधी पाहिलं नाही; पण एक गोष्ट मात्र नक्की. त्यांच्यातला संपादक हा त्यांच्या लिखाणातून प्रकट होई, भाषणबाजी किंवा भपक्यातून नव्हे! आणि ते त्यांनी अतिशय जपलं होतं. त्यांचं व्यक्तिमत्त्वच तसं होतं आणि याची दखल दिल्लीतल्या वर्तुळात योग्य ठिकाणी घेतलीच जायची

डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाची गोष्ट, १९९१ सालची. अर्थविषयक पत्रकारांची एक परिषद दर वर्षी दिल्लीत घेतली जाते. देशभरातील वर्तमानपत्रांचे अर्थविषयक पत्रकार त्याला हजेरी लावतात. आíथक घडामोडींशी संबंधित सर्वच मंत्रालयांचे मंत्री, ज्येष्ठ अधिकारी त्याला हजेरी लावतात. या परिषदेत एके दिवशी डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वाशी वार्तालाप केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसाठी भोजनही आयोजित केलं होतं. ‘मटा’मधील एक सहकारी व मी असे दोघे तेव्हा डॉ. सिंग यांना भेटलो. ‘मटा’चे प्रतिनिधी अशी ओळख करून देताच, ‘‘हाऊ इज मिस्टर तळवलकर?’’ असा प्रश्न डॉ. सिंग यांनी विचारला. एकूण, गोिवदराव तळवलकर हे राष्ट्रीय स्तरावर आदरयुक्त मान्यता असलेले एकमेव मराठी संपादक होते. त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणंही सोपं नसे आणि चुका केल्यावर संतापणारे तळवलकरही पाहायला मिळत. त्यामुळे तळवलकर नाराज होणार नाहीत, याची काळजी ‘मटा’मधील प्रत्येक जण घेत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दराराच असा होता. निवृत्त झाल्यावर ते अमेरिकेत ह्य़ुस्टनला स्थायिक झाले. अधूनमधून मुंबईत आले की आम्ही ‘मटा’मधले काही सहकारी त्यांना भेटत असू. पुढे मी दूरचित्रवाणी माध्यमात गेलो आणि त्या माध्यमात स्थिरावलो. तो निर्णय त्यांना फारसा आवडला नव्हता. मी ‘झी मराठी’चा प्रमुख असताना ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम आम्ही केला होता आणि तो खूपच गाजला. एकदा तळवलकर मुंबईत आले असताना नेमका िवदा करंदीकर यांच्यावरील ‘नक्षत्रांचे देणे’चा भाग सादर होणार होता. मी गोिवदराव तळवलकर व माधव गडकरी या दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांना या कार्यक्रमाला बोलावलं. ‘नक्षत्रांचे देणे’ या मालिकेतला सर्वात सुंदर भाग होता तो. िवदांनी आपल्या बहारदार कवितावाचनाने त्या दिवशी ‘नक्षत्रांचे देणे’मध्ये धमाल उडवून दिली होती. कार्यक्रम संपल्यावर तळवलकर म्हणाले, ‘‘तुम्ही फार चांगलं काम करत आहात.’’ तळवलकरांचे हे शब्द माझ्या मनात सतत गुंजत राहतात. त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची केवळ संधीच दिली नाही, तर माझ्यासारख्या अनेकांचं भवितव्य तळवलकरांमुळे घडलं. उदारमतवादी विचारांच्या विश्वाची सफरच तळवलकरांनी आम्हा सर्वाना घडवून आणली. उन्माद, मग तो डाव्यांचा असो अथवा उजव्या धर्मवाद्यांचा, तळवलकर त्यावर परखडपणे लिहीत. हा देश मध्यममार्गावरच राहिला पाहिजे, त्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे, यावर तळवलकरांचा दृढ विश्वास होता. विचार-व्यक्तिस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि सामाजिक न्याय, हे तळवलकरांच्या लेखनाचं कायम सूत्र होतं. वाचक तसंच सहकारी म्हणून उदारमतवादाचा हा संस्कार तळवलकरांनी आमच्यावर सतत घडवला. त्याबद्दल मी तळवलकर यांचा सदैव ऋणी राहीन.

गोिवदराव तळवलकर यांच्याबरोबर काम करणे तसे आव्हानात्मकच असायचे. त्यांचे गंभीर व्यक्तिमत्त्व, त्यांचा व्यासंग आणि त्यांचे आसपास असणे हेच दडपण आणायचे. तळवलकर सकाळी दहाच्या ठोक्याला ‘मटा’च्या कार्यालयात प्रवेश करीत, तेही हातात एखादा ग्रंथराज घेऊन. अग्रलेख लिहून झाल्यानंतर बहुतांश वेळा ते वाचनात किंवा लिखाणात गढून गेलेले असत. पण व्यासंगाबरोबरच राजकीय वर्तुळात काय चालू आहे, यावर त्यांची बारीक नजर असे. एखाद्या राजकारण्यावर, त्याच्या काही कार्यावर लिहिताना त्यांची लेखणी कधी चाबकासारखी चाले तर कधी तिला उपहासगर्भतेची जोड लाभत असे. रामराव आदिक यांनी एका परदेशी विमानातून प्रवासात हवाईसुंदरीशी केलेल्या कथित गरवर्तनाचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर आदिक यांच्या हकालपट्टीची मागणी करणारा अग्रलेखच तळवलकरांनी लिहिला. तळवलकरांनी सुरुवातच ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पजारा’ अशा कठोर शब्दांनी केली होती. १९९१चा निवडणुकीचा काळ होता. त्या वेळी भारतीय जनता पक्षावर एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. त्यात लोकमान्य टिळकांच्या एका भूमिकेचा दाखला देण्यात आला होता. ‘भाजप’च्या या भूमिकेचा प्रसार करण्यासाठी एका प्रकारे टिळकांचा तो वापरच होता व ऐतिहासिक संदर्भाची मोडतोड ‘भाजप’ने आपल्या राजकारणासाठी केली होती. ही पुस्तिका प्रकाशित होण्याआधी माझ्या हाती लागली आणि त्याची बातमी ‘मटा’मध्ये पहिल्या पानावर आली. प्रमोद महाजन त्या वेळी माझ्यावर भलतेच संतापले. पण याच बातमीवर तळवलकरांचा दुसऱ्याच दिवशी अग्रलेख आला. त्याचे शीर्षक होते, ‘टिळकांच्या धोतराला हात!’ लोकमान्य टिळक हा तळवलकरांच्या अभ्यासाचा विषय. टिळकांच्या पारतंत्र्यकालीन भूमिकेचा स्वत:च्या राजकारणासाठी केल्या गेलेल्या वापराने तळवलकर संतापले होते. अग्रलेखात त्यांनी भाजपच्या या प्रयत्नाचे पार वाभाडे काढले. त्याचा परिणाम भाजपकडून ती पुस्तिकाच मागे घेण्यात झाला.

अनेक पाश्चिमात्य लेखक, मुत्सद्दी, विचारवंत, इतिहासकार यांची ओळख तळवलकरांनी महाराष्ट्राला आपले अग्रलेख तसेच त्यांच्या ‘वाचता वाचता’या सदरातून करून दिली. टॉयनबीसारखे इतिहासकार, पूर्वीचे मार्क्‍सवादी परंतु कम्युनिस्ट जगतात झालेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीमुळे तसेच सोविएत युनियनमधील स्टालिनच्या क्रूर कर्मामुळे भ्रमनिरास झालेले आर्थर कोस्लर, आंद्रे मालेराँ यांच्यासारखे विचारवंत, सोल्झेनित्सिनसारखा लेखक, दोस्तोवोस्की यांच्यापासून ते चार्ल्स डिकन्स, अगाथा ख्रिस्ती अशी अगणित उदाहरणे देता येतील. या व्यासंगातून जशी ‘वाचता वाचता’सारखी सदरे साकारली गेली, तसेच ‘ग्रंथांच्या सहवासात’सारखी सुरेख लेखमालाही आकाराला आली. विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या वाचन-प्रवासावर प्रकाश टाकणारी ही लेखमाला होती. तीही त्या मान्यवरांच्याच शब्दात! मी दिल्लीत होतो. माझ्यावर जबाबदारी आली मधु लिमये, विठ्ठलराव गाडगीळ, ‘टाइम्स’चे माजी संपादक श्यामलाल आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष देवकांत बारुआ यांचे अनुभव शब्दांकित करण्याची. या साऱ्या माणसांची बुद्धीची आणि व्यासंगाची झेप स्तिमित करून टाकणारी होती. ही चार माणसं तळवलकर यांच्यामुळे मला जवळून पाहता आली आणि त्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे. मधु लिमये आणि विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे माझे नेहमीच जाणे-येणे होते. कुठलाही घटनात्मक पेचप्रसंग आला, संसदीय प्रणाली आणि न्यायसंस्था यांच्यात काही पेच उभा राहिला, की अनेक जण मधू लिमयेंच्या निवासस्थानी थडकत. अनेक घटनात्मक मुद्दय़ांचे लिमये हे चालतेबोलते संदर्भ होते. विठ्ठलराव गाडगीळ तर बॅरिस्टर. काँग्रेस पक्षाचे व्यासंगी असे एकमेव प्रवक्ते. यांच्या वाचनाच्या प्रवासाची कहाणीही रोमांचक होती, पण देवकांत बारुआ यांच्या नावाबद्दल मी जरा खट्ट होतो. आणीबाणीनंतर वाचायला लागलेल्या माझ्या पिढीचे बारुआ हे एक प्रकारे खलनायक होते. ‘इंडिया इज इंदिरा अ‍ॅण्ड इंदिरा इज इंडिया’ हे  आणीबाणीत काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या देवकांत बारुआंचे विधान त्याला कारणीभूत होते. लिमये, गाडगीळ यांच्या वाचनप्रवासाचे शब्दांकन झाल्यानंतर मी काही कामात अडकलो आणि बारुआंची भेट माझ्याकडून थोडीशी लांबलीच. लागलीच तळवलकरांचा फोन आला. देवकांत बारुआंना भेटलात का, त्यांच्या ‘ग्रंथांच्या सहवासात’चे काम झाले का, असा प्रश्नच तळवलकरांनी विचारला. बारुआंच्या बाबतीत मी फारसा उत्सुक नाही, हे लक्षात येताच, तुम्ही त्या एका विधानावर जाऊ नका, ते विधान अयोग्यच होते. पण बारुआंचा व्यासंग तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे, असा खास तळवलकर शैलीतला फटका मला बसला आणि दुसऱ्याच दिवशी मी देवकांत बारुआ यांच्या निवासस्थानी हजर झालो. मधू लिमये ज्या पंडारा रोडवर राहत, त्याच्यापासून जवळच बारुआंचे घर होते. एक आणीबाणीविरुद्ध संघर्ष करत तुरुंगवास भोगलेला नेता तर दुसरा आणीबाणीच्या काळात ‘इंडिया इज इंदिरा’ अशी घोषणा देऊन बदनामी ओढवून घेणारा नेता.

बेल वाजवताच कमरेतून वाकलेल्या एका कृश वृद्धाने दरवाजा उघडला. देवकांत बारुआ. ज्या दिल्लीने बारुआंना जोशात ही घोषणा देताना पाहिले होते, त्याच दिल्लीत संपूर्णपणे दुर्लक्षित आयुष्य बारुआ जगत होते. त्यांच्या साथीला होती प्रचंड ग्रंथसंपदा. बारुआंचा ग्रंथांचा सहवास थक्क करणारा होता. राजकारण, तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्मशास्त्र यापासून नाना विषयांवरचे किमान वीसेक हजार ग्रंथ बारुआंकडे होते. ‘मी आसाममध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता होतो, तेव्हा पंडित नेहरू दौऱ्यावर येत. तेव्हा दोन ट्रंक भरून पुस्तके बरोबर आणत. त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही पहाटेपासून जमत असू. पण पहाटे पाच ते आठ असे तीन तास पंडितजींनी वाचनासाठी राखून ठेवलेले असत. त्यांना पाहतच माझी पिढी राजकारणात आली. वाचन हे राजकीय जीवनात किती महत्त्वाचे आहे, हे नेहरूंसारख्या व्यक्तीने आपल्या वर्तणुकीतून आमच्या मनावर िबबवले होते,’ असे बारुआंनी सांगितले. त्याक्षणी बारुआंबद्दलचा माझ्या मनातला द्वेष संपला. बऱ्याचदा नेमकी भूमिका काही व्यक्ती घेऊ शकत नाहीत. परिस्थिती, व्यक्तिमत्त्व व अन्य इच्छा-आकांक्षा याही कारणीभूत ठरू शकतात, याची जाणीव झाली. बारुआ पेट्रोलियममंत्री झाले आणि आखाती देशांत त्यांचे येणे-जाणे सुरू झाले. त्या देशांतील नेत्यांशी संवाद करायचा तर त्यांची संस्कृती, परंपरा यांचे आकलन आपल्याला असायला हवे. या जाणिवेतून इस्लामचा व अरब इतिहासाचा अभ्यास केला, असे बारूआ म्हणाले. इस्लामवरच माझ्या संग्रही काहीशे पुस्तके असतील, असे सांगत त्यांनी त्या पुस्तकांच्या रॅकपाशी मला नेले होते. तळवलकरांनी दटावले नसते तर मी बारुआंना भेटलो असतो का, असा प्रश्न मला पडतो. आणि तळवलकरांनी आपल्याला काय काय दिले, याची जाणीव होत राहते. एकदा तळवलकर दिल्लीला आले असताना ते व मी बारुआंना जाऊन भेटलो. दोघांमधल्या त्या संवादाचा साक्षीदार बनलो. ‘मी आता मृत्यूची वाट पाहतोय’ असे बारुआ तळवलकरांना सांगत होते.  ‘माझ्याकडे चाळीस हजारांहून जास्त पुस्तके होती, पण आता हे घर लहान आहे. त्यामुळे निम्म्याहून कमी इथे आहेत. बाकीची माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या घरी ठेवली आहेत,’ अशी खंत बारुआंनी तळवलकरांकडे बोलून दाखवली. वाचत वाचतच देवकांत बारुआ काळाच्या पडद्याआड गेले. मधु लिमये गेले, गाडगीळही गेले. राजकारणातली वाचणारी पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. आजच्या राजकीय पिढीत वाचणारे नावालाही दिसत नाहीत. तळवलकरांना कायमच ही खंत वाटत असे. भावनेच्या आहारी न जाता, कुठल्याही घटनेचा-परिस्थितीचा सारासार विचार करून मगच निष्कर्षांप्रत येणे आणि ते निष्कर्षही काळाच्या कसोटीवर तपासत राहण्याचे भान तळवलकरांनी दिले. त्यामुळेच, सध्याच्या कटुतेने भारलेल्या वातावरणातही पाय जमिनीवर राहतात.
नितीन वैद्य – response.lokprabha@expressindia.com