मौर्य, शुंग, शक आणि गुप्त यांच्यानंतर युएची म्हणून चिनी लोकांना ज्ञात असलेल्या कुशाणांच्या टोळ्या मध्य अशियातून अफगाणिस्तानमाग्रे मथुरेपर्यंत येऊन पोहोचल्या. इसवी सन १०० ते ३०० पर्यंत त्यांनी इथे मोठे साम्राज्य प्रस्थापित केले.

इसवी सनापूर्वी तीन हजार वर्षांपर्यंत ज्याची प्राचीनता जाऊ शकते अशा वैदिक वाङ्मयातून िहदू धर्माच्या उगमाचा शोध घेतला जातो. या वैदिक वाङ्मयाची विभागणी सामान्यत: चार भागांत केली जाते. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. हे वेद म्हणजे मंत्र असलेल्या संहिताच. मंत्र हे देवतांना आवाहन करण्यासाठी व त्यांना प्रसन्न करण्यासाठी स्तुती म्हणून यज्ञात वापरले जात असत. यज्ञामधील निरनिराळ्या क्रियांचा वापर योग्य रीतीने व्हावा म्हणून यज्ञयागांच्या विवरणस्वरूप असलेल्या ब्राह्मण ग्रंथांत त्या मंत्रांचा अर्थ समजावून सांगितला आहे व ते मंत्र यज्ञातील क्रियेशी अनुरूप कसे आहेत हे समजावून सांगितले जाते. यानंतरचे आरण्यक आणि उपनिषद म्हणून प्रत्येक वेद शाखेतील ग्रंथ हे यज्ञाचा खराखुरा अर्थ काय आहे, यज्ञ करण्यामागचे आध्यात्मिक प्रयोजन काय आहे, कारण काय आहे याची चर्चा करतात. गृहस्थाश्रमातील आपली कर्तव्ये पूर्ण केल्यानंतर मोठय़ा मुलावर परंपरागत यज्ञानुष्ठानाचे काम सोपवून ॠषी आणि तापस यांच्या संगतीत उरलेले आयुष्य घालवायचे व आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचा खोल विचार करायचा अशी पाश्र्वभूमी असल्यामुळे वेदांच्या या तिसऱ्या भागास अरण्यात लिहलेले ग्रंथ म्हणून आरण्यक असे नाव पडले.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

चौथा भाग उप + नि + सद् या धातूपासून उपनिषद हा शब्द तयार झाला. उपनिषदे ही जीवनाचे रहस्य गुरूने शिष्याशी झालेल्या संवादातून सांगण्याच्या स्वरूपात लिहिली गेली आहेत. त्यामुळे उपनिषद या शब्दाला फक्त अधिकारी किंवा योग्य शिष्याला सांगितलेली गूढ विद्या असा अर्थ आहे. संहिता आणि ब्राह्मण या वेद-ग्रंथांतून यज्ञाच्या साहाय्याने या जगात आणि मृत्यूनंतर स्वर्गात आनंदाने राहण्याचा मार्ग वर्णिलेला आहे. तर आरण्यक आणि उपनिषदे या ग्रंथांत अशा प्रकारचे ऐहिक आणि पारलौकिक सुख हे क्षणभंगुर असते, स्वर्गातलेही सुख हे कायमचे नसते, कारण यज्ञातून मिळालेले पुण्य हे मोजकेच असते. ते संपल्यानंतर पितृ लोकांतून परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. वेगळ्या शब्दांत यज्ञासंबंधीच्या वैदिक तत्त्वज्ञानातून हळूहळू कर्मसिद्धांत उदयास आलेला दिसतो. त्यातूनच पुनर्जन्माची कल्पना व पुनर्जन्म म्हणजेच जन्म-मृत्यू व स्वर्गातून उतरल्यानंतर पृथ्वीवर परत जन्म घेणे म्हणजे संसारचक्रात अडकणे या कल्पनेचा उदय झालेला दिसतो. आरण्यके आणि उपनिषदे या संसारचक्राचा भेद करून अक्षय पारमाíथक सुख संसारापासून निवृत्त होऊनच मिळू शकते या कल्पनेवर भर देणारीही आहेत.

निवृत्तिपर धर्म आणि प्रवृत्तिपर धर्म यांच्या पाश्र्वभूमीवर वाकाटक वंशाचे कार्य समजून घेताना समाजातील या बदलांची नांदी, त्याहीपूर्वीची सामाजिक स्थिती आणि काळानुसार तत्त्वज्ञानात होत गेलेले बदल निवृत्तीपर ते प्रवृत्तीपर हा सारा प्रवास समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. सुरुवातीस हा सारा इतिहास फारसा रंजक वाटणारही नाही. किंवा या साऱ्याचा वाकाटकांशी काय संबंध असा प्रश्नही वाचकांच्या मनात येईल. पण थोडय़ा संयमाने हे सारे समजून घेतलेत तर वाकाटकांचा कालखंड समजून घेताना फारसे प्रश्न पडणार नाहीत किंवा समजून घेणे सोपे जाईल. म्हणून हा सारा प्रपंच.

उपनिषदांचा काळ हा इसवी सनपूर्व आठव्या शतकापासून ते इसवी सनपूर्व पाचव्या शतकाचा मानला जातो. जागतिक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय तज्ज्ञांनी इ.स.पू. ८०० ते इ.स.पू. ३०० हा काळ धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या दृष्टीने ग्रीस, इराण, भारत आणि चीन येथील संस्कृतींच्या संदर्भात फार महत्त्वाचा मानला आहे. त्यांच्या मते या महत्त्वाच्या काळात तत्कालीन नागरी संस्कृतीमध्ये धर्म व तत्त्वज्ञानदृष्टय़ा मोठे पुनरुत्थान जगात घडून आले. ग्रीसमध्ये सॉक्रेटीस व त्याआधी इराणमध्ये झरतुष्ट्र, चीनमध्ये कन्फ्युशिअस आणि भारतात भगवान महावीर, भगवान बुद्ध व उपनिषदांचे तत्त्वज्ञान ही मोठी स्थित्यंतरे घडून आली. दोन रथचक्रांना जोडणारा आस (अक्ष) असतो त्याप्रमाणे समाज आणि धर्मतत्त्वज्ञान यांना जोडणारा हा काळ असल्यामुळे त्याचा उल्लेख ‘अ‍ॅक्सिअल एज’ असा केला जातो. उपनिषदाप्रमाणेच भगवान बुद्ध व महावीर आणि इतर पाच (मंखली गोसाल, पकुध-कच्चायन, अजित केसकंबली, संजय बेलठ्ठि पुत्त आदी) अशा संन्याशी आचार्यानी आपले तत्त्वज्ञान मांडले. त्यातील भगवान बुद्ध, भगवान महावीर व मख्खली गोसालपुत्त याचा आजीवक धर्म पूर्व भारतात अत्यंत लोकप्रिय झाले. बौद्ध आणि जैन धर्म हे त्यांच्या मगध (बिहार आणि उत्तर प्रदेश) या जन्मभूमीपुरतेच थांबून न राहता त्यांचा प्रसार भारतभर झाला. बौद्ध धर्म हा अशोकाच्या पुढाकारामुळे वायव्य सरहद्द प्रांत ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा ते गुजरात, राजस्थान या त्याच्या अवाढव्य साम्राज्यापुरताच मर्यादित न राहता त्याच्याच काळात श्रीलंकेपर्यंत जाऊन पोहोचला. इ. स.पू.च्या तिसऱ्या शतकापासून इसवी सनाच्या विसाव्या शतकापर्यंत श्रीलंकेच्या इतिहासात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. वसाहतवादाच्या काळात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला तरीसुद्धा आजही बौद्ध धर्म बळकट रीतीने तिथे ठाम उभा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार उत्तरेत, मध्य अशिया, चीन, कोरिया, जपान, आग्नेय अशिया ते ब्रह्मदेशापर्यंत झाला. हे सर्व विवेचन करण्यामागचे कारण असे की, हे निवृत्तिपर धर्म, पूर्ण अशियामध्ये पसरले. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव इतका बळकट होता की, िवध्यपर्वतरांगेच्या पलीकडे (दक्षिण भारत) जे नागरीकरण झाले ते जवळपास या धर्माच्या माध्यमातूनच झाले.

kushana-empire-01

भारतीय नेहमीच इतिहासाकडे पाठ वळवून असतात. त्यांना ऐतिहासिक घटनांचे गांभीर्य कधीच समजले नाही. त्यामुळे त्याची साधी नोंदही त्यांनी घेतली नाही किंवा खऱ्या खुऱ्या अर्थाने भारताचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला नाही असाच समज होतो. याउलट युरोपमध्ये इतिहास लेखनाची परंपरा इसवी सनापूर्वीच्या युरोडोटस या ग्रीक इतिहासकारापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळेच इतिहासलेखनाचे तंत्र व शास्त्र (हिस्ट्रीओग्राफी) हे त्यांच्या तत्त्वज्ञानातसुद्धा अभिप्रेत आहे. भारतीय आणि युरोपीय दृष्टिकोनातील चटकन लक्षात दिसणारा फरक हा इंग्रजी शिक्षणाची १९ व्या शतकात सुरुवात झाल्यानंतर सुशिक्षितांच्या लक्षात आला. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. भाऊ दाजी लाड यांना हे जाणवल्यामुळे त्यांच्या संशोधनात प्राचीन भारतीय इतिहासातील राजवटींचे कार्यकाळ व कालक्रम, नाणे, अभिलेख व हस्तलिखिते यांच्या साह्यने कसे पक्के करता येतील यावर त्यांनी सर्वप्रथम भर दिला. त्यांच्यामते इतिहासाकडे तोंड फिरवून वागण्याच्या भारतीयांच्या मानसिकतेचे मूळ हे िहदू, जैन, बौद्ध धर्मात पक्क्या झालेल्या चतुर्युग अथवा तत्सम युगकल्पनेत आहे. जैन व बौद्ध धर्म ग्रंथाप्रमाणेच, महाभारत आणि रामायणलेखनाच्या काळात (इसवी सनपूर्व ६वे ते ३ रे शतक) त्या कल्पना पक्क्या झाल्या. अगोदर कृत, मग त्रेता, द्वापार आणि शेवटी कलियुग ही चार युगे मिळून एक महायुग होते. त्यानंतर सृष्टीचा लय होऊन परत सृष्टी नव्या कृतयुगात जन्माला येते. जन्म-मृत्यू, स्वर्ग अथवा नरक आणि त्यानंतर पुन्हा जन्म या पुनर्जन्माच्या कल्पनेला समांतर अशी ही कल्पना आहे. महाभारत हे द्वापार युगात झाले. या युगाच्या शेवटी कौरवांचा नि:पात करून युधिष्ठिर धर्मराज सिंहासनावर बसला आणि नंतर पुढे  कलियुग येणार; कृत युगापासून धर्माचा ऱ्हास होत होत कलियुगात फक्त एकचर्तुथांश धर्मच शिल्लक राहिल्याने सर्व सामान्य समाजामध्ये आणि कुटुंबातसुद्धा अनाचारच बोकाळणार त्यामुळे विपत्तीच्या काळात धर्माचे कसेबसे पालन करून गुजराण करायची, कुठल्याही प्रकारच्या समृद्धीची किंवा सुखासमाधानाची अपेक्षाच करावयाची नाही, अशी जणू भविष्यवाणीच े केली गेली. चार वर्णावर आधारलेला धर्म नष्ट होणार, वर्णसंकर होणार, आदर्श क्षत्रिय राजे राहणार नाहीत, वैश्य आणि शूद्रसुद्धा राजे होतील; त्यामुळे राज्यसंस्थासुद्धा विकल आणि क्षीण होतील अशी ती भविष्यवाणीच त्याने केली. यापुढे महाभारतात असे म्हटले आहे की, जनमेजयाने (पांडवांचा पणतू) केलेल्या अश्वमेधानंतर कलियुगात आता कोणीही अश्वमेध करू नये.

इ.स.पू सहाव्या शतकात किंवा त्याही अगोदर आठव्या शतकात श्रमण (बौद्ध आणि जैन) धर्माचा उदय होऊन प्रसार झाला. महाभारतातील जरासंधाचा मुलगा बृहद्रथ हा शेवटचा राजा. कौरव-पांडवांचे युग संपल्यानंतर यादवांनासुद्धा यादवी झाल्याने व द्वारका बुडाल्याने परत कुरुपांचाल देशात यावे लागले. येताना भिल्लांनी यादव स्त्रियांचे अपहरण करून हाहाकार उडवला. त्यामुळे इक्ष्वाकु व सूर्यकुळातील आणि सोमवंशातील मोठ मोठे राजवंश लयाला पावले. बौद्ध आणि जैन वाङ्मयात जी सोळा महाजनपदे, उत्तर भारतात विकसित झालेली आढळतात त्यातील काहीच राजवंश वैदिक धर्म पाळत असल्याचे दिसतात. त्यांच्यावर जैन आणि बौद्ध धर्माचाच मोठा पगडा झाल्याचे दिसते. महाभारतात व पुढे त्यानंतर लिहिलेल्या पुराणात कलियुगाच्या माध्यमातून प्रकट केलेली वर्णसंकर व अनाचाराची भीती ही कदाचित जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दलची प्रतिक्रिया असावी. बौद्धांच्या महावस्तु-अवदान (इ.स.पू दुसऱ्या ते इसवी सन चौथ्या) व दिव्यावदान (इसवी सन तिसरे) या ग्रंथांतूनसुद्धा हल्लीच्या काळात क्षत्रियांप्रमाणेच ब्राह्मण, वैश्य, शूद्र हेसुद्धा राजे होतात अशी वस्तुस्थिती मांडलेली आढळते. या संदर्भात इसवी सनाच्या सुरुवातीला काही ज्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडल्या त्याविषयी विवेचन करणे आवश्यक ठरेल.

सुप्रसिद्ध नंद घराण्याचा लय झाल्यानंतर वायव्य सरहद्द प्रांत व पंजाबात अलेक्झांडरच्या स्वारीनंतर भारतीय ग्रीक राजांनी (इंडोग्रीक) अफगाणिस्तानात सिंधमध्ये आणि पंजाबात आपापली राज्ये निर्माण केली. तर चंद्रगुप्ताच्या सहाय्याने चाणक्याने मगधात नवीन राज्य स्थापना करवून मौर्य वंशाची मुहूर्त मेढ रोवली. मौर्य या शब्दाची व्युत्पत्ती मुरा या चंद्रगुप्ताच्या आईच्या नावापासून केली जाते. मुरा या नंद राजाच्या दासीपासून झालेला मुलगा म्हणून तो मौरेय किंवा मौर्य अशी केली जाते. एका अर्थाने मौर्यसुद्धा दासीपुत्र म्हणून शूद्रच गणले गेले. त्यांतर मौर्य आणि शुंग या भरभराटीच्या काळानंतर मध्य अशियातील शक राजांनी इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकापासून सरहद्द प्रांतावर हल्ले चढवून आपली सत्ता प्रस्थापित केली. विक्रमादित्य चंद्रगुप्त या गुप्त वंशातील राजाने चौथ्या शतकाच्या शेवटी शकांचा पाडाव करेपर्यंत हे शक राजे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ व दूरवर आंध्र प्रदेशात शिरून राजे झाले. इसवी सनाच्या सुरुवातीला मध्य अशियात युएची म्हणून चिनी लोकांना ज्ञात असलेल्या कुशाणांच्या टोळ्या मध्य अशियातून अफगाणिस्तानमाग्रे मध्य भारतातून मथुरेपर्यंत येऊन पोहोचल्या. मध्य आशिया, अफगाणिस्तान व उत्तर भारत यावर इसवी सन १०० ते ३०० पर्यंत मोठे साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केले. त्यांची उत्तरेतील राजधानी पुरुषपुर म्हणजे आजचे पेशावर व दक्षिणेतली राजधानी मथुरा येथे होती. भारतीय इतिहासात मौर्यानंतर अत्यंत समृद्ध असे साम्राज्य कुशाणांचे समजले जाते. यांनी पाडलेली सोन्याची नाणी जगप्रसिद्धच आहेत. सोन्याबरोबरच त्यांनी तांब्याची नाणीसुद्धा प्रचारात आणली. या नाण्यांचे वजन, आकार त्यावरील लेख, त्यावरील प्रयोजने, नाण्याच्या पुढल्या बाजूस राजाचे चित्र आणि मागील बाजूस राजाची इष्टदेवता अथवा लोकप्रिय देवता यांच्या प्रतिमा असे त्यांचे स्वरूप होते. त्यावर बुद्धाबरोबरच शिव, स्कंद, विष्णू या लोकप्रिय देवतांच्या मूर्तीसुद्धा आढळतात. त्यांच्या पूर्वी मध्य अशियात म्हणजे अफगाणिस्तान, पश्चिमेकडे सीमेवरील पाíथया हा प्रांत व वायव्य सरहद्द प्रांत या भागात त्यांच्यापूर्वी राज्य करणाऱ्या भारतीय-ग्रीक राजांच्या नाण्यांना समोर ठेवून ही नाणी घडवली होती. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झालेला कुशाणांचा सुप्रसिद्ध राजा कनिष्क याला धार्मिक बौद्ध वाङ्मयात सम्राट अशोकाइतकेच महत्त्व दिले जाते. त्याचे कारण असे की, याच्याच काळात बौद्ध धर्माची महासभा आचार्य अश्वघोष याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेचे महत्त्व असे की, इथूनच बौद्ध धर्माच्या नव्या आविष्काराची म्हणजे महायान पंथाची सुरुवात झाली असे इतिहासकार मानतात. या पंथातील धर्मग्रंथ हे एरवी शिष्टमान्य असलेल्या पाली भाषेत लिहिले न जाता गांधारी या संस्कृतला जवळ असलेल्या भाषेत लिहिले गेले. पाणिनीने ज्या संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिले व त्यातून जी राजमान्य संस्कृत भाषा म्हणजे अभिजात संस्कृत निर्माण झाली, त्या भाषेपेक्षा ही भाषा वेगळी असल्यामुळे, तिच्यावर स्थानिक प्राकृत भाषांचा प्रभाव असल्याने, युरोपियन संशोधकांनी तिचे वर्णन हायब्रीड संस्कृत म्हणजे प्राकृतमिश्र संस्कृत असे केले. आता असे लक्षात आले आहे की, वायव्य सरहद्द प्रांत व अफगाणिस्तान यांमधील लोकांची बोली इसवी सनपूर्व दुसरे ते इसवी सन चौथे शतक  अशीच असल्याने व ती लोकांची बोली असल्याने तिला गांधारी भाषा असे नाव योग्य होईल. या भाषेतून व अभिजात संस्कृत भाषेत लिहिलेले धर्म व तत्त्वज्ञानावरील ग्रंथ, बौद्ध ग्रंथ हे पुढे मध्य अशिया, चीन व कोरिया आणि त्यानंतर इसवी सनाच्या सहाव्या शतकात जपानमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते तिसऱ्या शतकापर्यंत कुशाणांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माला मोठी प्रतिष्ठा मिळून तो उत्तर भारतात आणि पूर्वेकडील देशात पसरला. याचे महत्त्वाचे कारण असे की, चीन व इराण या देशांना जोडणारा, या दोन देशांतील समृद्ध व्यापारामुळे ओळखला जाणारा रेशीम मार्ग. खरे तर हा त्या वेळचा महामार्गच होता. त्यावरील प्रदेशावर कुशाणांची पूर्ण सत्ता होती. कुशाण साम्राज्याच्या समृद्धीचे ते एक महत्त्वाचे कारण होते. त्यावरून लक्षात येईल की, इसवी सनपूर्वीच्या सहाव्या शतकापासून ते तिसऱ्या शतकापर्यंत दक्षिणेत व उत्तरेतील बौद्ध धर्माच्या प्रसारात मौर्य आणि कुशाण राजवंशातील सम्राटांचा मोठा हातभार लागलेला होता.

या पाश्र्वभूमीवर भारतात प्रसिद्ध असलेल्या शक संवतांच्या उगमांचा अभ्यास करणे मनोरंजक ठरेल. भारतामध्ये अनेक संवत् पद्धती राजांनी प्रचलित केल्या; परंतु ज्यांना आज आपण शक आणि विक्रमसंवत् म्हणतो ते नेमके कोणी केले याविषयी विद्वानात मतभेद आहेत. उदाहरणार्थ विक्रम संवत् हा विक्रम नावाच्या राजाने प्रचलित केला असे समजले जाते; परंतु आख्यायिका सांगतात त्याप्रमाणे तो उज्जैनीत राज्य करत होता याव्यतिरिक्त तो नेमका कुठला होता, त्याचे काही शिलालेख किंवा नाणी मिळतात का, याचा शोध घेतल्यास ‘नाही’ असेच उत्तर द्यावे लागते. कारण इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या अगोदर त्या शकाचे नाव कृत/मालव-संवत् असे येते आणि तो माळव्यात प्रचलित होता असे दिसते. पण कृत हे कुठल्या राजाचे नाव नव्हे. आणि अशा रीतीने हा विक्रम राजा कोण होता हे इतिहासकारांना एक गूढच राहिले आहे.

kushana-empire-02

मात्र धार्मिक जैन परंपरेप्रमाणे कालदृष्टय़ा त्याचे स्थान निश्चित असून त्याअगोदर गर्दभिल्ल नावाच्या राजाला बाजूला करून तो उज्जैनी येथे राज्यावर आला अशी माहिती मिळते. हा गर्दभिल्ल राजा राज्य करत असताना राजधानीत कालकाचार्य नावाचे जैन मुनी चातुर्मासासाठी म्हणून उज्जैनीत राहत होते. त्यांच्याबरोबर भिक्षुणी असलेली त्यांची सरस्वती नावाची बहीणदेखील तेथेच होती. ती राजाच्या दृष्टीस पडल्यानतंर तिच्या सौंदर्याने मोहित होऊन त्याने आपल्या अंत:पुरात तिची रवानगी केली. यतींनी राजकारणात लक्ष घालू नये अशी प्रथा असल्यामुळे युद्धात भाग घेणे अथवा त्यास प्रवृत्त करणे या गोष्टीची संन्याशांच्या बाबतीत कल्पना करणेही कठीण होते. पण सत्तेने मदांध झालेले राजे जर तुमच्या धार्मिक आचरणामध्ये आडकाठी घालत असतील तर राजकारणाचा आश्रय घेऊन, युद्धाच्या माध्यमातूनसुद्धा अशा दुष्ट राजांना शासन घडवावे याचा धडा कालकाचार्यानी घालून दिला. शकद्वीपातील (म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेवरील असलेल्या, तत्कालीन इराणमधल्या) शहानुशाही राजांच्या साहाय्याने गर्दभिल्लाचा पराभव करून त्यांनी विक्रमादित्याला राज्यावर आणले. अशी आख्यायिका आहे. (आचार्य कालकाचार्याची कथा इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील असल्यामुळे तेव्हा पासून विक्रमसंवत् सुरू झाला अशी धारणा झाली.) अशा रितीने धर्मावर घाला घालणाऱ्या परकीय राजांना परास्त करून धर्माची घडी बसवणारा राजा अशी विक्रमादित्याची ओळख झाली. आणि त्यामुळेच अधर्माचे आचरण करणाऱ्या शकांचे पारिपत्य करणाऱ्या गुप्त वंशातील चंद्रगुप्त द्वितीय (इसवी सन ३८० ते ४१५) याने विक्रमादित्य ही पदवी घेतली असावी.

उज्जैनीतील शकांचा पराभव केल्यानंतर चंद्रगुप्ताच्या सन्याचा तळ काही वष्रे विदिशेतच होता. त्याच्या सन्यातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी विदिशेजवळील उदयगिरी या पहाडावर वैष्णव व शैवधर्मीय गुंफा कोरल्या. या गुंफांतील मूर्ती, शेषशयन विष्णू, वराह अवतार, शिविलगे व गरुडध्वज आणि चक्रध्वज असे स्तंभ यावरून शैव व वैष्णव आगम धर्माची उपासना चंद्रगुप्ताच्या सन्यातील मोठे अधिकारी करत असत हे स्पष्ट होते. या गुंफातील वराह अवताराचे शिल्प हे अनेक परीने अर्थपूर्ण आहे. वैष्णव आगमात नरसिंह, वामन/ त्रिवक्रम या अवतारांना विशेष महत्त्व आहे. शिल्प म्हणूनसुद्धा हे इतके प्रभावी आहे की विदर्भातील सुप्रसिद्ध कवी अनिल (आ. रा. देशपांडे) यांनी या शिल्पावर एक सुंदर काव्य रचले आहे. कलेतिहासाचे मर्म जाणणारे या शिल्पाकडे आणखी एका दृष्टीने बघतात. सुप्रसिद्ध संशोधक प्रो. डॉ. जोहाना विल्यम्स (बर्कले विद्यापीठ) यांच्या दृष्टीने हे शिल्प शक-गुप्त यांच्या संघर्षांत देव प्रवृत्तींनी असुर प्रवृत्तीवर मिळवलेला विजय असा अर्थ होतो. असुरांच्या भारामुळे पृथ्वी जेव्हा समुद्रात बुडायला लागली होती त्या वेळी विष्णूने वराह अवतार घेऊन, चिखलामध्ये आपले नाक खुपसून, सुळ्यावर पृथ्वी उचलून तिचा उद्धार केला. त्याला विशेष संदर्भ असा. शक राजाने गुप्तांचा सम्राट रामगुप्त याला कचाटय़ात पकडल्यानतंर तुझी महाराणी ध्रुवस्वामिनी हिला आमच्याकडे नजर म्हणून पाठव म्हणजे तुझी सुटका होईल अशी अट शकराजाने घातली. चंद्रगुप्ताचा वडीलभाऊ रामगुप्त या अटीस तयार झाला. पण हा अपमान सहन न होऊन चंद्रगुप्ताने ध्रुवस्वामिनीचा वेश घेऊन शक राजाच्या छावणीत शिरून त्या राजाचा वध केला व शेवटी रामगुप्ताला बाजूला सारून तो गुप्तांचा सम्राट म्हणून राज्यावर आला. ही कथा फार महत्त्वाची आहे. उदयगिरी येथील हे अर्थगर्भ वराहशिल्प इतके लोकप्रिय झाले की दहाव्या शतकापर्यंतच्या राजांनी वराहाप्रमाणेच आपण असुर वृत्तींचा नायनाट करण्यासाठी राज्यावर बसलो आहोत हे दाखवण्यासाठी पृथ्वी-वराहाचे शिल्प आपल्या अगदी सोन्याच्या नाण्यांच्यावरसुद्धा अंकित केले आहे. विक्रमादित्य या पदवीशी धर्मोद्धाराची कल्पना अगदी जवळून निगडित झाल्यामुळे इतिहासात अनेक राजांनी विक्रमादित्य ही पदवी धारण केलेली दिसते. याचे अगदी उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर चालुक्य कुळातील आत्ताच्या विजापूर जवळील कल्याणहून राज्य करणारा सहावा विक्रमादित्य होय. (इसवी सन १०७५ ते ११२५). या कुळात त्यापूर्वीच्या पाच राजांनी विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती यावरूनही वरील विवेचन सुस्पष्ट होईल.

दुसरे उदाहरण शक संवताचे. पश्चिम आणि उत्तर भारतामध्ये आणि जैन परंपरेत विक्रम संवत हा जास्त लोकप्रिय आहे, तर दक्षिण भारतात, श्रीलंकेत व आग्नेय अशियात बौद्ध धर्माचा पदर धरून शक संवत लोकप्रिय झालेला दिसतो. या संवताचे मूळही इतिहास संशोधकांच्या दृष्टीने अजून एक गूढच आहे. महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे हा शालिवाहन शक आहे. इतिहास संशोधकांच्या मते बराच काळपर्यंत शक संवत हा कुषाणांनी सुरू केला आणि कनिष्क हा इसवी सनाच्या ७८ व्या वर्षी राज्यावर आल्यापासून त्याची सुरुवात झाली असे समजले जात होते. नवीन प्राप्त झालेल्या संशोधनातील उपलब्धीनुसार ऐतिहासिकदृष्टय़ा हा कनिष्काने सुरू करणे अशक्य आहे. कारण अय्-खनूम (अफगाणिस्तान) येथील उत्खनित कुषाण राजाच्या प्रतिमांशी निगडित असलेल्या लेखावरून कनिष्क हा इसवी सनाच्या १२८ या वर्षी राज्यावर आला. त्याचबरोबर हा शकसंवत असल्यामुळे तो कुषाणांऐवजी शकांनी सुरू केला असे म्हणणे तर्कदृष्टय़ा जास्त सुसंगत ठरते. हाती आलेल्या नवीन संशोधनानुसार हा संवत चष्टन नावाच्या शक राजाने इसवी सन ७८ मध्ये सुरू केला असावा असे दिसते. परंतु त्याचा प्राचीनतम वापराचा पुरावा इसवी सनाच्या चौथ्या शतकात आढळतो. पण महाराष्ट्रामध्ये त्याला शालिवाहन शक म्हणण्याचे कारण असे की, परंपरेनुसार गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात नहपान या शक राजाचा नायनाट करून उत्तर महाराष्ट्र व कोकणामध्ये आपली सत्ता बळकट केली. आणि म्हणून तोही एका अर्थाने शकारीच म्हणजे शकांचा शत्रू आहे. त्या विजयाच्या निमित्ताने हा संवत स्थापित झाला असावा अशी ठाम श्रद्धा त्या लोकपरंपरेत दिसते. वेगळ्या अर्थाने परधर्मीयांचे आक्रमण दूर करून सातवाहनांनी स्वत:ची सत्ता व धर्म प्रस्थापित केला असे सुचवीत असल्यामुळे त्याला शालिवाहन शक असे नाव रूढ झाले असावे.

विक्रम आणि शक संवत हे दोन संवत एका अर्थाने परकीय आक्रमणापासून स्वधर्माचे संरक्षण करण्याच्या घटनांवर आधारित आहेत. आणि त्यामुळेच जैन व बौद्ध परंपरेमध्ये ते लोकप्रिय झाले असावेत अशी धारणा आहे. या लोकप्रिय संवतांविषयी असलेल्या धारणांच्या बरोबरच यापूर्वी विवेचन केलेली कलियुगातील धर्मऱ्हासाची संकल्पनाही तितकीच महत्त्वाची असल्यामुळे आद्य इतिहासकाळातील राजवंशांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, पारंपरिक क्षत्रिय कुलांच्या व्यतिरिक्त परकीय राजे, एतद्देशीय निरनिराळ्या वर्णातील राजे व त्यांचे राजवंश प्रतिष्ठित झाल्यामुळे धर्मावर आपत्ती आल्यानंतर ब्राह्मणांनीसुद्धा धर्मसंरक्षणासाठी राजत्व पत्करल्यास ते चुकीचे नाही असा विचार रुजलेला दिसतो. मौर्य हे स्थानिक समजुतीनुसार शूद्र असले तरी त्यांच्यापाठोपाठ शेवटच्या मौर्य राजाचा वध करून ब्राह्मण पुष्यमित्र शुंग हा राजा झाला. त्याने शुंग वंशाची प्रतिष्ठापना केली. त्यापाठोपाठ आलेले कण्वही त्यांच्या नावावरून ब्राह्मण होते असे दिसते. दक्षिणेत कण्वांच्या पाठोपाठ आंध्र म्हणजेच सातवाहन राजवंश आला. ते सनातन वैदिक धर्माचे उपासक असून राणी नागनिका हिच्या शिलालेखातून वाजपेय इत्यादी अनेक श्रौत याग त्यांनी केल्याचे स्पष्ट दिसते. ते वैदिक धर्मानुयायी असले तरी समकालात लोकप्रिय असलेल्या बौद्ध धर्माला त्यांनी मोठय़ा प्रमाणात आश्रय दिला.

महामहोपाध्याय मिराशी यांच्या मते त्यांच्यापाठोपाठ विदर्भात राज्यावर आलेला मुंड वंशातील आदित्यराज हा ब्राह्मण कुळातील होता. एवढेच नव्हे तर तो अप्रत्यक्षपणे असे सुचवतो की, समकालात झालेल्या धर्मऱ्हासाप्रमाणे त्याच्या वंशातील आदिपुरुष मुंड याने यज्ञातील पळी बाजूला टाकून हाती खड्ग धारण केले. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात व पूर्व-मध्य काळात गोव्यावर राज्य करणाऱ्या कदंब राजवंशाची कथा हाच अभिप्राय अधोरेखित करते. कदंबांचा आदिपुरुष मयुर शर्मन् हा श्रोत्रिय (वेदशास्त्रसंपन्न) ब्राह्मण होता; परंतु सीमेवरील पल्लव राजाच्या सेनाधिकाऱ्यांनी त्याचा अपमान केल्यामुळे पल्लवांच्या विरुद्ध बंडाळी करून आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या वंशजांनी धारवाड येथील पलाशिकाग्राम म्हणजे हळशी येथे आपली राजधानी इसवी सनाच्या चौथ्या शतकात वसवली. त्याच्या वंशजांनी उत्तर कर्नाटकात धारवाड, बेळगाव इथपर्यंत कुंतलदेशात आपले राज्य प्रस्थापित केले आणि त्यांचीच एक शाखा १२-१३ व्या शतकापर्यंत गोव्यात राज्य करीत होती असे दिसते. िहदू धर्मावर किंवा वैदिक धर्मावर परकीयांचा घाला पडल्यानंतर आपण क्षात्र धर्म स्वीकारून स्वधर्माचे रक्षण केले पाहिजे ही भावना काही ब्राह्मण कुटुंबांमध्ये आद्य इतिहासकाळात प्रबळ झालेली दिसते. आणि त्यामुळेच कदाचित परंपरागत अध्ययन-अध्यापन, यजन-याजन आणि दान-प्रतिग्रह अशा प्रकारचा सहा कर्तव्यांचा धर्म सोडून ब्राह्मण हे क्षात्रवृत्तीचा आश्रय करून राजे झाले असे दिसते.

या पाश्र्वभूमीवर वाकाटकांचा आदिपुरुष िवध्यशक्ती (इसवी सन सुमारे २५० ते २७०) याने अशाच प्रकारच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात सातवाहनांच्या नंतर विदर्भामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली असावी. त्याचा उत्तराधिकारी प्रवरसेन प्रथम (इसवी सन सुमारे २७० ते ३००) याने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. पुराणातील उल्लेखानुसार या राजवंशाची पहिली राजधानी सातपुडय़ातील पुरिका या नगरात असून, त्याच्या चार पुत्रांनी आपापली स्वतंत्र राज्ये त्याच्या साम्राज्यातून निर्माण केली. इतिहासाला वाकाटक वंशाच्या दोनच शाखा माहीत आहेत. वाकाटकांच्या शिलालेखावरून आणि ताम्रपटांवरून असे दिसते की, प्रवरसेनाचा नातू प्रथम रुद्रसेन याने नंदिवर्धन, (हल्लीचे नागपूर जिल्ह्य़ातील रामटेकजवळचे नगरधन) येथे आपली शाखा प्रस्थापित केली; तर त्याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने वत्सगुल्म (म्हणजे वऱ्हाडातील आजचे जिल्ह्य़ाचे ठिकाण असलेले वाशिम) येथे दुसरी शाखा प्रस्थापित केली. ज्ञात असलेल्या शिलालेखांवरून असे म्हणता येईल की इ.स. सुमारे २५० ते ५०० या अडीचशे वर्षांच्या काळात वाकाटकांच्या दोन शाखांतील नऊ पिढय़ांनी वऱ्हाड (पश्चिम विदर्भ) व पूर्व विदर्भात राज्य केले. यापूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे इसवी सन ३५० ते पाचशेपर्यंतचा काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ समजला जातो. असा समज होता की, गुप्त वंशाची कारकीर्द म्हणजे भारताचा सुवर्णकाळ. परंतु वाकाटक वंशातील राजांनी राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा म्हणजे स्थापत्य, शिल्प, चित्रकला व धर्म व त्यातील विविध परंपरा यांच केलेल्या योगदानामुळे आज हा सुवर्णकाळ गुप्त- वाकाटक काळ म्हणून ओळखला जातो. यापुढील लेखामध्ये या घराण्यांतील दोन शाखांच्या राजांचा इतर समकालीन राजवंशांशी कसा संबंध आला, तो कशा प्रकारचा होता आणि त्यातून वाकाटक वंशाने केलेले सांस्कृतिक योगदान हे किती महत्त्वाचे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. अरविंद जामखेडकर – response.lokprabha@expressindia.com