अंधारबन

भरपूर गर्दीचा ताम्हिणी घाट, मुळशी धरणाचा परिसर टाळून जरा जंगलात भटकायचे असेल अंधारबन हा उत्तम पर्याय म्हणावा लागेल. ऐन उन्हाळ्यातदेखील गर्द शांत सावली असणारं हे ट्रेकर्स मंडळींचं आवडतं ठिकाण, पण ट्रेकर्सबरोबरच सर्वसामान्यांना भटकायलादेखील अगदी सहज सोपी अशी वाट हे अंधारबनचं महत्त्वाचं वैशिष्टय़. पुण्याहून माणगावला जाताना ताम्हिणी घाटाच्या अलीकडे लोणावळ्याला जाणारा फाटा फुटतो. इथून उजवीकडे दोन कि.मी. अंतरावर एक बांधलेला तलाव दिसतो. आपले वाहन इथे ठेवून पुढे जाता येते. तलावाच्या काठाने डोंगराकडे जाणारी वाटच अंधारबनाकडे घेऊन जाते. तलाव आणि पलीकडचा डोंगर यामध्ये कुंडलिका व्हॅलीचा नयनरम्य नजारा प्रत्येक मोसमात खुललेला असतो. गर्द झाडीतून तीनेक तासांच्या सोप्या भटकंतीनंतर आपण घाटमाथ्यावरील हिरडी गावात येऊन पोहोचतो. घाटमाथ्यावरून खाली भिऱ्याचा विद्युत प्रकल्प, कोकणातील गावांचा नजारा पाहायचा असेल तर खास पावसाळय़ातच यावं लागेल, पण फार भटकंती करून दमायचं नसेल तर तास-दीड तास जंगल फिरून पुन्हा तलावाकाठी यावं. खानपान उरकून मुळशी मार्गे परत जाता येतं.

lonavala bus fire marathi news, groom s bus catches fire pune marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वऱ्हाडाच्या बसला आग; ४२ प्रवासी सुखरुप
horse decorated with worth rs two lakh stolen from wedding destination
वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर

भोरगिरी

श्रावणात भीमाशंकरच्या जंगलात भटकण्याचा आनंद काही औरच असतो, पण सध्या भीमाशंकरला पार वपर्यंत रस्ता झाल्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे भीमाशंकरच्याच डोंगररांगेत असणारा भोरगिरी किल्ला आणि परिसर हा गाडीने जाण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पुणे-नाशिक मार्गावर राजगुरू नगरपासून डावीकडे जाणारा रस्ता भोरगिरीकडे घेऊन जातो. राजगुरू नगर सोडल्यावर एका बाजूला डोंगररांग आणि दुसरीकडे चासकमान धरणाचा प्रचंड जलाशय आणि फुगवटा आपली साथ अगदी भोरगिरीच्या पायथ्यापर्यंत करत राहतो. मस्त नागमोडी रस्त्याने पाऊस अंगावर झेलत होणारा हा प्रवास अत्यंत रमणीय असा आहे. मुख्य म्हणजे या वाटेवर फारशी गदी नसते. भोरगिरीच्या पायथ्यापर्यंतचा चाळीसेक किलोमीटरचा हा प्रवास हीच खरी पावसाळी भटकंती आहे. ज्यांना डोंगर चढायची हौस असेल त्यांनी भोरगिरी किल्ल्यावर जावं. तेथूनच जंगलवाटेने भीमाशंकरला जाता येतं. अर्थात त्यासाठी आणखीन एक दिवस हाती हवा. हे काहीच करायचं नसेल तर जलाशयाकाठी चांगली जागा पाहून पोटपूजा करून घ्यावी आणि शांतपणे परतीला लागावं. भीमाशंकरच्या मंदिर परिसरातील गर्दी टाळायची असेल तर डिंबे धरणापासून जो घाट सुरू होतो, त्याच्या माथ्यावर गेल्या काही वर्षांत चांगली हॉटेल्स झाली. विशेष म्हणजे मांसाहारी आणि दारूची दुकानं या घाटमाथ्यावर नाहीत. त्यामुळे तुलनेनं दंगाधोपा करणारी टोळकी कमी आढळतात.

भंडारदरा

भंडारदरा परिसर

मुंबई, नाशिक, पुणे अशा तीनही जिल्ह्य़ांना जोडणारा हा टापू पावसाळी भटकंतीसाठी सर्वोत्तम असा आहे. भंडारदरा धरण, रतनगडचे अमृतेश्वर मंदिर, सांधणची कातळदरी, भंडारदरा धरणाच्या फुगवटय़ाच्या टोकाला वसलेलं साम्रद गाव, रंध्रा धबधबा, कळसूबाई शिखर परिसर असं संपूर्ण पावसाळी पॅकेज असंच या परिसराचं वर्णन करावं लागेल. रानफुलांची गर्दी, डोंगरातून वाहणारे ओढे, ओहोळ, धबधबे, गावरान जेवणाची चव, पुरातन वास्तुकलेचा नमुना असणारं मंदिर- शिल्प असं सारं काही एक-दोन दिवसांच्या भेटीत पाहता येऊ शकते. भंडारदऱ्याला एमटीडीसीचं निवासस्थान अगदी मोक्याच्या जागेवर आहे किंवा मग इगतपुरीला मुक्काम करूनदेखील भटकंती करता येते. पूर्वी रतनगडाच्या पायथ्यापर्यंत गाडीवाट नव्हती, पण आता अमृतेश्वर मंदिरापर्यंत वाहनाने जाता येते. साम्रद गावात गेल्या दोन-तीन वर्षांत जेवणाची सुविधादेखील झाली आहे. जलाशयाच्या काठावर बसून मस्त आनंदात हे सारं अनुभवता येतं. अर्थात येथे भटकायचे असेल तर शनिवार- रविवार हे प्रचंड गर्दीचे दिवस टाळणंच योग्य ठरेल. संपूर्ण कुटुंबाला घेऊन वीकेन्ड टाळून दोन दिवस या परिसरातील मुक्काम तुम्हाला अगदी ताजंतवानं करू शकतो. सरत्या पावसात आलात तर इथल्या सारखी रानफुलांची पखरण तुम्हाला कोठेच आढळणार नाही.

रमणीय पाटेश्वर

महाराष्ट्रात जरा आडबाजूला गेलं की हवी तेवढी ठिकाणं आपल्या स्वागताला तयार असतात. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा शहराच्या जवळच असं एक ठिकाण आहे. हल्ली कास पठारावर प्रचंड गर्दी असते, त्यामुळे न जाणंच श्रेयस्कर ठरेल. त्यामुळे आपला मोर्चा सातारा-रहिमतपूर रस्त्यावर देगावदवळच्या पाटेश्वरकडे वळवावा. देगावला पाटेश्वर फाटय़ावरून गाडीरस्ता पुढे एका डोंगरावर चढतो आणि काही अंतर गेल्यावर हा रस्ता संपतो. तिथून पुढे सुरुवातीला काही पायऱ्या लागतात आणि नंतर आपण डोंगरसपाटीवर येतो. तिथून अंदाजे ४५ मिनिटे चालत जायचे. दोन्ही बाजूंनी येणारा पाऊस अंगावर घेत आणि अधूनमधून दरीतून येणारा भन्नाट वारा झेलत हे चालणे फारच आनंदाचे जाते. रानवाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या पाठीमागे झाडीमध्ये पाटेश्वराचे सुंदर मंदिर लपलं आहे. इथेच काही दगडांमध्ये लेणी कोरलेली आहेत आणि त्या लेणींच्या आजूबाजूला कोरलेली असंख्य शिवलिंगे अचंब्यात टाकतात. एका लेणीच्या तीनही भिंतींवर शिवलिंगाच्या माळा कोरलेल्या आहेत. शेजारच्याच लेणीमध्ये सहस्रलिंगी शिवपिंड, धारालिंग, चतुर्मुख लिंग, काही शिवलिंग नंदीच्या पाठीवर, काही पायाशी असा सगळा अप्रतिम परिसर. एका बाजूला एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते. विविध पक्ष्यांचे गुंजारव कानी पडत असतात. अगदी रम्य परिसर. इथून पाय काही निघत नाहीत. इथूनच जवळ जरंडेश्वर आणि नांदगिरी हा किल्लासुद्धा पाहता येईल. दोन्ही ठिकाणची चढाई सोपी आहे. दोन दिवस भटकण्यासाठी काढले तर सातारा इथे मुक्काम करून एक दिवस जरंडेश्वर आणि नांदगिरी किल्ला आणि दुसऱ्या दिवशी सहस्रलिंगी पाटेश्वर अशी पावसाळ्यातील निराळी भटकंती करता येईल.

मुंबई परिसर

मुंबईकरांचं भाग्य असं की मुंबईतून बाहेर पडल्यावर अगदी तासा दीड तासाच्या अंतरावर अगदी रमणीय अशी पर्यटनस्थळं आहेत. बहुतांश ठिकाणी पर्यटकांची अलोट गर्दी असते. पण ती टाळायची असेल तर वसईजवळचं पेल्हार धरण, मुरबाडनजीकचा गडदचा गणपती आणि माळशेजचा कळू धबधबा पाहायला हवा.

पेल्हार धरण

वसई रोड स्थानकापासून १० किमी अंतरावर स्थित पेल्हार धरण परिसर हे झकास ठिकाण आहे. डोंगर, हिरवळ, ओहोळ आणि जलाशय असं नयनरम्य समीकरण जुळवून आणणार हे एक शांत ठिकाण आहे. वसईला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या पाठीमागे उठवलेल्या तुंगारेश्वरच्या डोंगरातून खळाळत वाहणारे अनेक ओहोळ या धरणात येतात. कमाल पातळी गाठल्यावर सांडव्यावरून ओसंडून वाहणारे पाणी पाहायला येथे बरीच गर्दी जमते

गणपती गडद

मुरबाडजवळ धसई गावापासून साधारण पंधरा एक किलोमीटरवर डोंगराच्या पोटात ही लेणी दडलेली आहेत. मुरबाड परिसरात हल्ली बरीच गर्दी असते. ती टाळून उजवीकडे धसईला वळावं. तेथून उजवीकडे भीमाशंकरची डोंगररांग आपली सदैव साथ देत असते, तर रस्त्याच्या दोहोबाजूस भातशेती. सोनावळ्याची लेणी म्हणून प्रसिद्ध असणारी ही लेणी पळू गावाजवळ आहेत. गावातून सुरू होणाऱ्या ठळक पायवाटेने साधारण पाऊण एक तासात आपण लेणींपाशी पोहोचतो. अनेक कक्षांच्या शृंखला येथे आहेत. सर्वात मोठय़ा गुहेत गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आढळते. खांबांवरही नक्षीकाम आढळते. शेजारीच पाण्याची टाकी आहेत. पाऊस चांगला असेल तर लेणींच्या डोक्यावरील डोंगरातून मस्त धबधबा कोसळत असतो.

कळू धबधबा

माळशेज घाटातून दिसणारा, हरिश्चंद्र गडाच्या पोटातून कोकणात कोसळणारा प्रचंड प्रपात म्हणजेच कळू धबधबा होय. कोकणातील थिटबी गावातून साधारण तासाभराच्या चालीने धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते. माळशेज घाटाच्या पायथ्याच्या सावर्णे गावा शेजारून डावीकडे (मुंबईहून नगरकडे जाताना) वळणाऱ्या छोटय़ा सडकेने तीन किलोमीटरवरील थिटबी गाव गाठावे. धबधबा तीन टप्प्यात कोसळत असतो. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्याच्या थेट खालपर्यत जाता येत नसले तरी तीन टप्प्यांत कोसळणारा हा प्रचंड झोत, आजूबाजूचा नयनरम्य देखावा खिळवून ठेवणारा आहे.
प्रतिनिधी

response.lokprabha@expressindia.com