एखाद्या वैज्ञानिकाला ऐकायला किती तुडुंब गर्दी होऊ शकते याचा प्रत्यय गेल्या गुरुवारी (दि. १५) मुंबईत झालेल्या व्हिवा लाउंजच्या निमित्ताने आला. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत (टीआयएफआर) कार्यरत असणाऱ्या आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक विदिता वैद्य यांनी मेंदूविज्ञानाचा वेध घेतला. अरुंधती जोशी आणि नीरज पंडित यांनी विदिता यांच्याशी संवाद साधला. स्त्री वैज्ञानिक, त्यातूनही मेंदूचा अभ्यास करणारी, त्यातल्या भावनांचा उगम शोधणारी विदुषी तुमच्याशी साध्या- सोप्या शब्दांत संवाद साधते आणि मेंदूतील या गुंत्याचा वेध घेते, तेव्हा या अभ्यासपूर्ण विवेचनातून किती नवीन तरीही रंजक माहिती बाहेर येऊ शकते याचाही प्रत्यय या वेळी आला.

मेंदू कसा आहे?
आकृतीत सुरकुत्या-सुरकुत्या दिसणारा मेंदू प्रत्यक्षातही अगदी विचित्र दिसतो. तुम्ही कधी घरी जेली बनवली असेल तर, लालऐवजी जेलीला गुलाबीसर रंग दिला तर कशी दिसेल? मेंदू तसाच दिसतो.. लिबलिबीत, गुलाबी असा. या एवढय़ाशा जेलीसारख्या विचित्र पदार्थातून कला, तत्त्वज्ञान, काव्य, विज्ञान अशा जगातल्या किती तरी सुंदर गोष्टी आणि त्याबरोबरच राग, द्वेष, मत्सर, घृणा अशा वाईट गोष्टीही उत्पन्न होत असतात. माणसाचा मेंदू आणि उंदराचा मेंदू बऱ्यापैकी सारखा असतो. पण सगळ्याच प्राण्यांचा मेंदू त्यांच्या शरीरातील विलक्षण तल्लख अवयव असतो. माशीचा आकार बघा.. तिचा मेंदू अगदी एवढासा.. डोळ्यांना दिसणारसुद्धा नाही एवढा. पण ती किती शिताफीने उडते. आपली विमानं पडतात, क्रॅश होतात, पण माशी viv02फळावर आदळत नाही कधी. कारण तिचा मेंदू. मेंदूतून उडय़ासंदर्भातले संदेश परफेक्ट पोचवले जातात. मेंदूच्या अभ्यासासाठी उंदीर हा सगळ्यात चांगला प्राणी आहे. गेल्या पाच-सात वर्षांपासून जेनेटिक इंजिनीअरिंग टूल्सचा विकास झाल्यानंतर आता हा मेंदूचा अभ्यास आणखी सोपा झाला आहे.


क्षमतेच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुषाचा मेंदू सारखाच असतो. मेंदूला जसं प्रशिक्षण देऊ तसा तो विकसित होतो. मेंदूला फसवणं तसं सोपं आहे. लहानपणापासूनच तुला अमूक एक गोष्ट येणार नाही, असं सांगत राहिलं, तर क्षमता असूनही ती गोष्ट पुढे जमत नाही. कारण मेंदू तसाच ट्रेन झालेला असतो.

जन्मत:च बुद्धिमान कोण?
बुद्धिमान असणं हे प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेच्या व्याख्येवर अवलंबून असतं. बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या क्षेत्रातील असते. क्रीडा, कला, गणिती, व्यवस्थापन.. अनेक क्षेत्रांत बुद्धिमत्ता मोजता येते. आपण आपल्या मेंदूला प्रशिक्षण देत असतो, त्यानुसार बुद्धिमत्तेचा विकास होतो. सराव आणि अनुभव याचा उपयोग होतो. त्याचा मेंदूच्या आकाराशी, वजनाशी काही संबंध नाही. केवळ काही चाचण्यांमध्ये चांगले गुण मिळवले म्हणजे कोणी बुद्धिमान ठरू शकत नाही. मात्र एखादं मूल बुद्धिमान आहे की नाही आणि त्याचं क्षेत्र कोणतं हे बहुतेक वेळा पालकांनी लहानपणापासून केलेल्या जडणघडणीवर आणि आसपासच्या वातावरणावर अवलंबून असतं. लहानपणापासून एखाद्याला ‘हे तुझं क्षेत्र नाही, तुला हे जमणार नाही’ या प्रकारे घडवलं गेलं असेल तर त्याची त्या क्षेत्रात बुद्धिमत्ता असेल तरीदेखील त्याला त्याची जाणीव होणार नाही आणि ती उपयोगात आणली जाऊ शकणार नाही.

वैज्ञानिक कसा घडला?
लहानपणापासून वैज्ञानिकांच्या सहवासात असल्याने मी वैज्ञानिक होणं यात काहीच नवल नाही. माझा जन्म मुंबईत झाला. मी गोरेगावला वाढले. माझी मातृभाषा गुजराती आहे. आई-वडील दोघेही डॉक्टर, संशोधक.. एमडी, पीएच.डी. मला मात्र डॉक्टर व्हायचं नव्हतं. डॉक्टर्स औषधं देतात आणि उपचार करतात. मला मात्र त्याचं मूळ शोधण्यात अधिक रस होता. माझ्या लहानपणी म्हणजे १९७०च्या दशकात गोरेगावला फार गजबजाट नव्हता. हिरवागार परिसर होता. कोल्हे, साप, बेडूक असे प्राणी सर्रास दिसायचे. त्यांच्याबद्दल मला कुतूहल होतं. त्यांचं शरीर कसं काम करतं, हे मला जाणून घ्यायची उत्सुकता असायची. लहानपणापासून माणूस आणि प्राणी यांच्या वागण्यातला संबंध शोधण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी नक्की काय करावं लागणार आहे, दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा लागतो तेदेखील निश्चित नव्हतं. पण अकरावी-बारावी रुईया कॉलेजला प्रवेश घेताना ते निश्चित होत गेलं. बारावीनंतर सेंट झेविअर्स कॉलेजमधून लाइफ सायन्समधली पदवी घेतली आणि पुढच्या शिक्षण आणि संशोधनासाठी अमेरिका गाठली.

शास्त्रज्ञाचं चित्र
लहान मुलांना वैज्ञानिकाचं चित्र काढायला सांगितलं तर ते नेहमीप्रमाणे पिंजारलेले केस, हातात काहीतरी रसायनांची बाटली, अंगात लॅब-कोट आणि जवळच काही तरी रंगीत बुडबुडणारं द्रव्य असंच चित्र काढतील. शास्त्रज्ञाची अशीच इमेज आपल्या मनात असते. त्यामुळे अनेक लहान मुलांना, तरुणांनादेखील हा माणूस काही आपल्यासारखा नाही, असं वाटत राहतं आणि मग मी शास्त्रज्ञ कसा होऊ असं मनात येत राहतं. पण आम्ही शास्त्रज्ञसुद्धा साधी माणसंच असतो, बऱ्याचदा नॉर्मल असतो. नॉर्मल बोलतो, जेवतो. फक्त आमचं काम हे ठरावीक वेळेत संपणारं, टाइम लाइनमध्ये बसणारं नसतं. मध्यरात्री बारा वाजता काही सुचलं, तर बारा वाजता लॅबमध्ये काम करायचं. पण त्यामुळेच कामात फ्लेक्सिबिलिटीही असते. मी माझ्या टीमबरोबर काम करते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी, संशोधक, पीएच.डी. करणारे आहेत. आम्हाला एकटय़ानं प्रयोग करणं शक्यच नाही. त्यासाठी ग्रुप लागतोच. पण ही माझ्या प्रयोगांची गरज आहे. काही शास्त्रज्ञ, काही विषय अगदी एकटय़ानं प्रयोग करण्यासारखेही असतात. शास्त्रज्ञ सगळ्या प्रकारचे दिसतील. मात्र एक कॉमन गोष्ट दिसेल. हाती घेतलेल्या संशोधनाला, कार्याला पूर्णत: वाहून घेऊन काम करण्याची, समर्पणाने काम करायची वृत्ती त्यांच्यात दिसेल.

viv07
केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज या कार्यक्रमात अरुंधती जोशी आणि नीरज पंडित यांनी विदिता वैद्य यांना बोलतं केलं.

लहान वयात मोठे परिणाम
आपल्या मेंदूवर आसपासच्या वातावरणाचा कसा परिणाम होतो, तो का होतो? हे शोधण्यात मला रस आहे. तुम्हाला मिळणारं प्रेम, राग, लोभ, तिरस्कार, माया याचा मेंदूवर परिणाम होत असतो. आम्ही ज्याला ‘क्रिटिकल पीरिअड’ म्हणतो, म्हणजे माणसाचा विचार करता वयाची पहिली दहा र्वष.. उंदरांमध्ये हा क्रिटिकल पीरिअड तीन आठवडय़ांचा असतो.. या काळात तो परिणाम सगळ्यात जास्त होतो. क्रिटिकल पीरिअडमध्ये मेंदूवर झालेला परिणाम पुढे आयुष्यभर पुसून टाकता येत नाही. घटना विसरणं शक्य असतं, पण त्याचा मेंदूवर झालेला परिणाम.. विचारांवर, व्यक्तित्वावर झालेला परिणाम कायम राहतो. क्रिटिकल पीरिअडमधील परिणामांचा प्रभाव मेंदूवर नेमका कशा प्रकारे टिकून राहतो, कुठल्या सर्किटमध्ये तो साठून राहतो हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

मन श्रेष्ठ की मेंदू?
गेली कित्येक र्वष जगभरातले तत्त्ववेत्ते, कवी, साहित्यिक या संघर्षांचा विचार करीत आहेत. मन म्हणजे काय याचा विचार प्रत्येक माणूस करत असतो. कारण आपण स्वत: कोणी तरी आहोत, याचा विचार सतत आपल्यात असतो. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या कल्पना, तुमची स्वप्नं, तुमचं व्यक्तित्व सगळं या मेंदूतूनच येतं. भावभावना तिथेच निर्माण होतात. मेंदू असंख्य चेतापेशींचा (न्यूरॉन्स) बनलेला आहे. त्या पेशी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या न्यूरॉन्स सर्किट्सचा मी अभ्यास करते. माझा संशोधनाचा विषय माणसाची वर्तणूक, त्यामागे मेंदूत उत्पन्न होणाऱ्या भावना हा आहे.

वेदना ही सार्वत्रिक भावना
माझ्या प्रयोगांसाठी ‘सब्जेक्ट’ उंदरासारखा प्राणीच असतो. म्हणजे आमचे प्रयोग उंदरांवर करतो. कारण त्यावर संशोधन करणं सोयीचं असतं. जगभरात हीच पद्धत आहे. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना प्राण्यांना भावभावना असतात हे तर नक्कीच समजू शकेल. आपण माणूस म्हणून काही तरी वेगळे आहोत, आपल्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत, असं नसतं. हे खरं की, उत्क्रांतीबरोबर भावनांची गुंतागुंत वाढत जाते. तीव्रता वाढत जाते. पण वेदना ही भावना सार्वत्रिक आहे, वैश्विक आहे. प्राण्यांनाही वेदना, प्रेम, राग, आपुलकी या सगळ्या भावना असतात. काइंडनेस.. माया ही केवळ माणसाची भावना आहे, असं बरेच दिवस मानलं जायचं. पण युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनात उंदरांमध्ये माया, आपुलकी या भावना असतात, हे प्रयोगांती सिद्ध झालं आहे.

पिढय़ांनुसार बदलणारा मेंदू
प्रत्येक पिढीला वाटत असतं की, नवी पिढी प्रगत, हुशार आहे. मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला, तर आपला मेंदू आणि आपल्या पूर्वजांचा मेंदू यात बराच फरक पडलाय. आपली इतर जनुके थोडय़ा-फार फरक सोडला तर पूर्वजांसारखी असतील. पण मेंदू मात्र वेगळा आहे. कारण सभोवतालचं वातावरण बदललं आहे. त्याचा परिणाम मेंदूवर होत असतोच. प्रत्येक पिढीसोबत मेंदूची क्षमता बदलत नसली तरी त्याची कार्यक्षेत्रं बदलतात. आधीच्या पिढीचं हस्ताक्षर चांगलं असेल तर पुढच्या पिढीची इलेक्ट्रॉनिक्सवर पकड असेल. मात्र दोघांच्याही क्षमतेत काहीही फरक नाही. नव्या पिढीचा मेंदू बदललेला असेल, पण याचा अर्थ ते जास्त हुशार असतील असं नाही. मेंदूतील या बदलांमुळे जग बदलतं आणि जग बदलल्यामुळे मेंदूत बदल होत जातात. असं हे चक्र आहे.

माणूस हा शेवटी प्राणीच
आपल्या उत्क्रांतीतल्या इतर भावंडांसारखे म्हणजे माकडांच्या प्रगत प्रजातींसारखेच आपण कधी कधी वागत असतो. आपण कुणी तरी स्पेशल आहोत, असा माणूस विचार करतो आणि त्यामुळे गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. त्यामुळे मी कुठल्या मीटिंगमध्ये किंवा घरीसुद्धा कधी कधी हे कुठल्या प्राण्यांचे मेंदू समोर आहेत असं समजून बोलते. पण यातला विनोदाचा भाग सोडला तरी, खरोखर मनुष्य हा प्राणीच आहे आणि तो त्याच्या उत्क्रांतीमधील भावंडांपेक्षा फार वेगळा नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस प्रत्येक गोष्टीला कारण शोधत असतो. शोधायला सुरुवात झाली की ‘संशोधन’ घडतं. माणसातला विवेक त्याला ‘माणूस’ बनवतो.

मेंदू आयुष्यभराचा साथीदार!
आपल्या शरीरातील बाकी सगळे अवयव, त्यातल्या पेशी हळूहळू बदलत जातात. तुमची त्वचा, हृदय, यकृत आज आहे तसं उद्या राहणार नाही. जुन्या पेशी मृत होतात, त्यांची जागा नवीन पेशी घेतात. मात्र मेंदू हा एकमेव अवयव असा अवयव आहे, ज्याच्या पेशी बदलत नाहीत. मेंदू जे न्यूरॉन्स.. चेतापेशी घेऊन जन्माला येतो त्याच पेशी घेऊन मरतो. हे न्यूरॉन्स एकमेकांशी सतत कम्युनिकेट करत असतात. म्हणजे काही केमिकल मॉलिक्यूल त्यातून बाहेर पडत असतात. मला हात हलवायचा असतो, तेव्हा एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला काही संदेश देतो. त्यातून तिसरं सर्किट हलतं, त्याचा संदेश पुढे नेतं आणि मग तो हात हलतो. प्रत्येक पाऊल उचलताना, झोपताना, खाताना हे एवढं संदेशवहन सुरूच असतं. तुम्ही काहीच विचार करत नाही, गाढ झोपेत असता तेव्हाही हृदय चालू असतं, फुप्फुसाचं काम सुरू असतं, म्हणजेच मेंदूचं संदेश देणं सुरू असतं. त्याचं नियंत्रण असतं.

संशोधनाचा विषय
नैराश्याने ग्रस्त व्यक्ती मानसोपचारतज्ज्ञाकडे जाते. त्या वेळी त्या व्यक्तीला अँटिडिप्रेसंट दिलं जातं. या आजारातून बाहेर यायला त्या व्यक्तीला बराच वेळ लागतो, कारण सर्वसाधारणपणे अँटिडिप्रेसंटचा परिणाम जाणवायलाच किमान तीन ते सहा आठवडे जावे लागतात. आता विचार करा.. डोकं दुखतंय म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाताय. डॉक्टर एक गोळी देतात आणि सांगतात.. चार आठवडय़ांनी बरं वाटायला लागेल. तुम्ही घ्याल का अशी गोळी? पण दुर्दैवानं मानसिक आजारांवरील उपचारांमध्ये अशाच ५० ते ६० च्या दशकात सापडलेल्या औषधांवर अवलंबून राहावं लागतंय. नैराश्य आलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी इतका काळ उपचारासाठी लागणं धोकादायक ठरू शकतं. मी आणि माझ्या टीमनं या औषधांचा परिणाम साधायला मेंदूतील नेमकी कोणती सर्किट्स कारणीभूत ठरतात, कुठले स्पेसिफिक परिणाम ब्लॉक केले तर औषधांचा परिणाम लवकर होईल याचा शोध घेतला आहे. आम्ही अर्थातच अ‍ॅनिमल मॉडेलवर काम केलंय. अ‍ॅनिमल मॉडेलवर केलेल्या प्रयोगांमध्ये या औषधांच्या परिणामांचा कालावधी तीन आठवडय़ांवरून एका आठवडय़ावर आलाय. असाच परिणाम माणसावरही दिसेल अशी आमची आशा आहे. या शोधासाठीच मला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झालाय.

भारतातील संशोधन संधी
मी शिक्षणासाठी परदेशात गेले होते, तरीही संशोधनासाठी भारतात परत का आले, असा प्रश्न अनेकांनी विचारला. मात्र मला या प्रश्नाचंच आश्चर्य वाटतं. आपल्या घरी परत का आलीस हा प्रश्न कसा असू शकतो? मी मुंबईत जन्मले, वाढले, शिकले आणि काही शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले होते. शिक्षणासाठी बाहेर गेलेल्याने घरीच परतायचं असतं ना? भारतात संधी नाहीत असं म्हणून आपण बाहेर जायला लागलो तर इथं संधी निर्माण कोण करणार? उलट परत न आलेल्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की ते परत का आले नाहीत? माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. ते गांधीजींबरोबर तुरुंगातही गेले होते. आई-वडीलही परदेशात काही काळासाठी गेले होते. १९७० मध्ये ते परत आले, तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आजच्या इतक्या संधी नव्हत्या. पण गेल्या काही वर्षांत चित्र बदललं आहे. केंद्रात कुठलंही सरकार आलं तरी त्यांनी विज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे. आज भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे भारताबाहेर राहून विज्ञानात काही तरी केलं असतं, तर मी आजच्याइतकी समाधानी नक्कीच नसते.
स्त्री-पुरुषांच्या मेंदूची क्षमता सारखीच
भारतात आणि अमेरिका, इंग्लंड अशा विकसित देशांत संशोधनाची संधी, वातावरण यात खूप फरक आहे. कारण तिथे तुमची गुणवत्ता महत्त्वाची असते. पाश्र्वभूमी काय, तुम्ही कुठून सुरुवात केली हे पाहिलं जात नाही. त्यामुळे प्रत्येकाला तिथे समान संधी मिळते. पण भारतात तुम्हाला ‘प्रीव्हिलेज्ड’ असावं लागतं. स्त्रियांना जन्माला येण्यापासून जिथे थांबविलं जातं, योग्य आहार, शिक्षण यापासून वंचित ठेवलं जातं तिथे समान संधी कशी मिळणार? आधी तिला पालकांच्या आणि मग नवरा, सासरच्यांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं. आपण संधीचा विचार करतो, तेव्हा मुळात मध्यवर्गीय- उच्चवर्गीय वर्गापुरताच विचार करतो. हे भयंकर आहे. विज्ञानात एवढय़ा कमी स्त्रिया का येतात? तर मुळात समान संधीच मिळत नाही. क्षमतेचा, कुवतीचा मुद्दा मुळीच नाही. खरं तर स्त्री आणि पुरुष दोघांच्या मेंदूच्या रचनेत थोडा फरक आहे, पण क्षमता सारखी आहे. दुर्दैवाने आपली सामाजिक जडण-घडणच अशी केली आहे की, लहानपणापासूनच स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव केला जातो. त्यांच्या मेंदूवर हीच गोष्ट बिंबवली जाते.

मेंदुशास्त्रज्ञाचं काम
मेंदू कशा प्रकारे कार्यरत असतो याचा अभ्यास करणं हे मेंदुशास्त्रज्ञाचं काम असतं. आम्ही केलेल्या अभ्यासाचा उपयोग काही वर्षांनी न्यूरॉलॉजिस्टना, डॉक्टरांना होतो. आम्ही आता जे संशोधन केलंय ते उंदरावर केलंय. ते माणसाच्या बाबतीत लागू होण्याआधी त्यावर अनेक लोकांना काम करावं लागेल आणि त्याला बराच काळ लागतो. पण पुढचं काम सुरू करण्याआधी हे मूलभूत संशोधन गरजेचं असतं. म्हणूनच मूलभूत विज्ञान संशोधन आवश्यक आहे. आजच्या पिढीला देवीच्या आजाराने दगावलेली माणसं माहिती नसतील. कारण काही वर्षांपूर्वी त्याचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधले गेले. आमच्या संशोधनाचा कधी कधी कोणताही थेट परिणाम सध्याच्या समाजावर किंवा आमच्या आयुष्यात दिसत नाही, पण भविष्यात त्याचा फायदा होईल.

शास्त्रज्ञांचे गुण
शास्त्रज्ञ होण्यासाठी संयम आणि कामावर निरतिशय प्रेम असावं लागतं. तुम्हाला अपयश येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी खचून न जाता स्वत:वर, परिस्थितीवर प्रसंगी हसता यायला हवं. कारण बऱ्याचदा अध्र्यावर गेल्यानंतर आपण चुकीच्या दिशेने संशोधन करतोय, असं लक्षात येतं. दशकात एखादा शोध लागतो, जो खूप मोठा असतो. बाकी अभ्यास होत असतोच. तो महत्त्वाचा असतोही, पण त्याचं महत्त्व किती हे भविष्यातच लक्षात येतं. संशोधनाला वेळ तर द्यावा लागतो, पण तुम्ही केलेलं सगळंच संशोधन लोकांच्या लक्षात राहीलच असं नाही. पण आम्ही काम करतो, ते त्या एका ध्येयासाठी.. शोध. जेव्हा शोध लागतो, एखादी गोष्ट प्रयोगांती पहिल्यांदा आपल्यासमोर येते, त्या वेळी, काही क्षणांसाठी का होईना पण ती गोष्ट जाणणारे अख्ख्या पृथ्वीवर आपण एकमेव आहोत. आपल्याला ही गोष्ट सर्वप्रथम कळली, ही भावना विलक्षण प्रेरणादायी असते. असे क्षण फार क्वचित येतात, पण तो अनुभव पुन:पुन्हा अनुभवता यावा असंच वाटत असतं. तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर शोधणाऱ्या अशा कम्युनिटीचा भाग असता. त्यामुळे तुम्ही भूतकाळातल्या आणि भविष्यकाळातल्या लोकांशी कायम जोडलेले राहता. ही किती अद्भुत गोष्ट आहे!

मनाची व्याख्या
मन म्हणजे काय, हा अवघड प्रश्न आहे. न्यूरो सायंटिस्टनाही याचं खरं उत्तर सापडलेलं नाही. देहभान, जाणीव.. कॉन्शसनेस मेंदूत कुठे निर्माण होतो ते आम्हाला अद्याप माहिती नाही. ‘कोहम्’.. मी कोण आहे, माझं व्यक्तित्व काय, याचा शोध कुठे घेतला जातो, कुठून येतो हे कळलेलं नाही. हे कोहम्चं भान जेव्हा जातं, तेव्हा मेंदूत काही तरी बिघाड झालाय हे आम्हाला कळतं. पण ते कुठे जातं, कुठून येतं हे आम्हा शास्त्रज्ञांना अजून कळलेलं नाही. मनाची व्याख्या त्यामुळे अर्धवट आहे. हे भान मेंदूमधल्या सर्किट्स  मध्ये येतं, हे माहिती आहे. पण त्याची पुरती ओळख अजून झालेली नाही. मांजर किंवा कुत्र्यापुढे आरसा ठेवला, तर त्यांना वाटतं, कुणी तरी दुसरंच उभं आहे. पण डॉल्फिन किंवा माकडाला स्वत:ची प्रतिमा ओळखता येते. माणसाच्या अगदी तान्ह्य़ा बाळालादेखील या प्रतिमेची ओळख नसते, ती नंतर होते. ते आत्मभान, व्यक्तित्वाची जाणीव उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर आलीय. मेंदूमधील कुठल्या चेतापेशींचा समूह किंवा सर्किट याला कारणीभूत आहे, हे आत्ता सांगता येणार नाही.

मेंदू कार्यरत ठेवा!
तुमचं वय कमी असतं तेव्हा मेंदू उत्तमरीत्या कार्य करत असतो. नवीन गोष्टी पटकन आत्मसात करण्याची क्षमता लहान वयाच्या मेंदूत असते. पण वयाबरोबर मेंदू परिपक्व होत जातो.. म्हणजे अक्कल वाढली, असं आपण म्हणतो. मेंदूच्या कार्यात अनुभवसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो. वय वाढत जाईल तसं मेंदूला काम करण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतात, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूला तसं ट्रेन करावं लागतं. अल्झायमर (स्मृतिभ्रंश) सारखे आजार हे त्यामुळे वार्धक्याकडे झुकू लागल्यावर होतात. वय वाढत जातं तसं आपल्या मेंदूला कार्यरत ठेवणं हे एक आव्हान असतं.

viv08
दादरचे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच हाऊसफुल झाले होते. बाहेरही अनेक प्रेक्षक उभे होते. या तुडुंब गर्दीला सामावून घेण्यासाठी शेवटी सभागृहाबाहेर स्क्रीन लावण्यात आले.

मेंदूचा व्यायाम
मेंदूलाही व्यायामाची गरज असते. काहीतरी वेगळं जे तुम्ही करू शकत नाही किंवा आधी केलेलं नाही अशी गोष्ट आपण करतो, त्या वेळी मेंदूला व्यायाम मिळतो. कारण ज्या गोष्टींची सवय नसते, त्यासाठी मेंदूत काहीतरी वेगळ्या हालचाली होतात आणि हाच मेंदूचा व्यायाम. काम केलं नाही तर मेंदूला गंज चढतो हा वाक्यप्रचार खरा आहे. मेंदूला सतत नवं काम द्या, नवं खाद्य द्या. अशाने वय वाढलं, तरी मेंदू चांगला कार्यरत राहील.

मेंदूचा नियम
viv09लहानपणापासून एखादी गोष्ट एखाद्याला सतत सांगितली तर त्या व्यक्तीचा मेंदू त्या दृष्टीनेच विचार करू लागतो. मेंदूला फसवणं सहज शक्य आहे. त्यामुळेच जादू किंवा हिप्नॉटिझमसारख्या गोष्टी घडतात. वयाच्या पहिल्या दहा वर्षांत जो अनुभव घेतला जातो तो चिरकाल स्मरणात राहतो आणि त्यानुसार त्याआधारावर मेंदूचा विकास होतो. त्यामुळे या वयात मुलांची होणारी जडणघडण महत्त्वाची असते.

राग, भीती, आक्रमकता, दुख या भावना मेंदूत कुठल्या न्यूरॉन सर्किटमुळे निर्माण होतात, याचा शोध लागलाय. पण प्रेम, हास्य, आनंद या भावना निर्माण करणाऱ्या सर्किट्सचा शोध लागलेला नाही. प्रेम कुठे उत्पन्न होतं, हे शोधणं खरंच अवघड आहे.

स्वप्नात दिसणाऱ्या अनोळखी गोष्टी
विचार आणि स्वप्न यांचा अर्थातच संबंध असतो. आईच्या गर्भातच अर्भक स्वप्नं पाहत असतं. तान्हं बाळ आवाजाला प्रतिसाद देतं, ओळखीच्या गोष्टी त्याच्या लक्षात येत असतात. लहान मुलांमध्ये स्पर्श, वास, आवाज यांची ओळख अगदी लहान असल्यापासूनच होते. त्यामुळे त्या गोष्टींशी ते जोडले जातात. झोपेत असताना एक स्वप्नावस्था अशी असते जेव्हा आपण दिवसभर घडलेल्या घटना पुन्हा आठवत असतो, पण त्यांचा घटनाक्रम वेगळा असू शकतो. ती मेंदूची प्रॅक्टिस असते. त्या दिवशी जागेपणी जी न्यूरॉन सर्किट्स कार्यरत असतात, तीच सर्किट्स झोपल्यावरही कार्यरत होतात, हे उंदरावर प्रयोग करून सिद्ध झालंय. आपला मेंदू एकीकडे लक्ष केंद्रित करत असताना नकळत अनेक इतर गोष्टींची नोंद ठेवत असतो. त्या जागृतावस्थेत आपल्या लक्षातही आलेल्या नसतात. गरज नसलेल्या गोष्टी दुर्लक्षित होतात. पण त्या गोष्टी स्वप्नात दिसू शकतात. आपल्याला अनोळखी, विचित्र वाटत असल्या, तरी त्याची नोंद मेंदूने कधीतरी घेतलेलीच असते.

मानसिक अस्वास्थ्य लपवू नका
शरीराच्या इतर अवयवांपेक्षा आपल्याला मेंदू खूप कमी कळलाय. अगदी पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा नैराश्य किंवा ताणतणावामुळे एखादा माणूस मानसिकदृष्टय़ा आजारी असायचा, त्याला सरळ वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं जायचं. पण काळानुसार आता समाजाचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतोय. दीपिका पदुकोणसारखी अभिनेत्री स्वत:च्या मानसिक अस्वास्थ्याबद्दल, नैराश्याबद्दल टीव्हीवर मोकळेपणाने बोलते हे कौतुकास्पद वाटतं. आपण शारीरिक आजारांविषयी बोलतो, मग मानसिक आजारावर बोलायला काय हरकत आहे? कारण तेसुद्धा शारीरिक बदलांवर अवलंबून असत. मानसिक आजार लपवण्यापेक्षा योग्य वेळी त्यावर उपचार करणं गरजेचं असतं.

देशाला गरज शास्त्रज्ञांची
भारतात मेंदुशास्त्रज्ञांची संख्या तुरळक आहे, इतकी कमी की, आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो. मुळात आपल्याकडे शास्त्रज्ञच कमी आहेत, मेंदुविज्ञान ही तुलनेने नवी शाखा असल्याने हे आणखी जाणवतंय. भारतात दर दहा हजारांत केवळ चार जण तर चीनमध्ये १८ आणि पाश्चिमात्य देशांत ८० शास्त्रज्ञ असतात. भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या देशात तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात असूनही हे प्रमाण आहे. खरं तर भारतात नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, गुरगांव, सेंटर ऑफ न्यूरो सायन्स, आयआयसी, बंगलोर अशा खूप चांगल्या संस्था आहेत. पण खूप काम आणि मोबदला कमी, असा शास्त्रज्ञांविषयीचा काही समज असावा. शास्त्रज्ञ झालात तर कदाचित उद्योजकांइतका पैसा मिळणार नाही, पण योग्य मोबदला इथे नक्की मिळतो. सरकारने तशी तरतूद केलेली आहे.

सुपर ह्य़ुमन बीइंग हवाय कशाला?
जेनेटिक मॉडिफिकेशन्स करून सुपर ह्य़ुमन बीइंग निर्माण होईल का? या प्रश्नाच्या आधी सुपर ह्य़ुमन बीइंगची व्याख्या काय, हा खरा प्रश्न आहे. सुपर ह्य़ुमन बीइंग म्हणजे असा माणूस जो खूप प्रेमळ आहे, चांगला आहे, दुसऱ्याबद्दल ज्याच्या मनात माया आहे, अनुकंपा आहे. अशी जर व्याख्या असेल तर त्यासाठी कुठलाही जनुकीय उपाय नाही. भविष्यात कदाचित जेनेटिकल मॉडिफिकेशन्स करून एखाद्याला उंच, सुदृढ बनवता येईल, पण सुदृढ समाजाचं काय? आपण सामाजिकदृष्टय़ा कोणत्या मूल्यांना महत्त्व देतो, हे बघणं आवश्यक आहे. ‘सुपर अचिव्हर’ हवाय की आपली सामाजिक मूल्यं जपणारा, सलोख्याने राहणारा माणूस निर्माण व्हायला हवाय, हे आधी ठरवायला हवं. भरमसाट लोकसंख्या असणाऱ्या आणि सतत वाढणाऱ्या जगात, देशात आणि मुंबईसारख्या शहरात एकमेकांना त्रास न देता, सामाजिक सलोख्याने एकत्र राहणाऱ्या माणसाची गरज भविष्यात जास्त असणार आहे आणि त्याचं जनुकीय समाधान नाही. त्यामुळे काही तरी ‘सुपर’ शोधण्याच्या नादात आपण आपल्यात आहे ती क्षमता गमावून बसू.