आजच्या तरुणांना मराठीविषयी अभिमान नाही, साहित्याची जाण नाही, साहित्याबद्दल कौतुक नाही, साहित्यनिर्मिती तर त्यांच्या गावीच नाही.. असं म्हणणाऱ्या सर्वानाच तरुणाईने कृतीतून दिलेलं उत्तर म्हणजे ‘नुक्कड कथा’! इथे लिहिणारे तरुणच आणि गोष्टी सांगणारेदेखील तरुणच! मराठी दिनाच्या औचित्याने नवीन मराठी लघुकथांना ब्लॉग आणि यूटय़ूब चॅनेलसारखं ऑनलाइन व्यासपीठ देणाऱ्यांची गोष्ट..

‘नुक्कड कथा’ या विक्रम भागवत, सुनील गोवर्धन आणि जयंत पोंक्षे यांनी तरुणांसाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व्यासपीठाबद्दल थोडंसं..

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

‘तुला माहितीये का परवा काय झालं..’

‘काय रे ?’

‘अरे.. भन्नाट किस्सा ऐक..’

संध्याकाळी चहा प्यायला नाक्यावर सगळे भेटले की, कोणी तरी अशी सुरुवात करून आपली गोष्ट सांगायला लागतं आणि ‘नुक्कड कथा’ जन्माला येते. प्रत्येकाकडे रोज एखादी तरी नवीन, सांगण्यासारखी वेगळी गोष्ट असते आणि गोष्ट सांगण्याची कला प्रत्येकाकडेच असते. मात्र प्रत्येकाची आपली एक स्टाइल असते. या गोष्टी बोली भाषेतच जन्माला येणाऱ्या. त्यांना व्याकरण नसतं, नियम नसतात, मात्र त्या इंटरेस्टिंग असतात. ऐकाव्याशा वाटतात. बहुतेक गोष्टींमध्ये काही ना काही शाश्वत मूल्य नक्कीच असतं. याच गोष्टींना लिखाणाचं कोंदण देण्याचं काम विक्रम भागवत, सुनील गोवर्धन आणि जयंत पोंक्षे यांनी केलं आणि नुक्कड कथा जन्माला आल्या. अशा सर्वसामान्यांमध्ये फुलणाऱ्या, घडणाऱ्या कथांचा प्रवाह सगळ्यांना परिचित व्हावा या हेतूने ‘नुक्कड’ या ब्लॉगला २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. जवळपास तीन महिन्यांत तीनशेहून अधिक नुक्कड गोष्टी जमा झाल्या. यापैकी निवडक कथांचं साहित्य संमेलनात वाचनही झालं आणि ह. मो. मराठे, माधवी वैद्यांसारख्या साहित्य क्षेत्रातील मंडळींनी या उपक्रमाचं भरभरून कौतुकदेखील केलं.

या नुक्कड कथा सांगायला सहजसोप्या असतात, ऐकायला उत्सुकता वाढवणाऱ्या आणि आकर्षक असतात. त्यामुळे या गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांचं अभिवाचन हा उत्तम पर्याय होता. ‘लेखक म्हटलं की अवजड संकल्पना डोळ्यांसमोर येते आणि ते काम कठीण वाटतं. साहित्यनिर्मिती वगैरे मोठय़ा शब्दांचा धसका घेतला जातो. पण गोष्टी सांगायला कोणी घाबरत नाही. गोष्टी सांगण्यासाठी तरुणाई मोठय़ा संख्येने उत्सुक असते..’ विक्रम भागवत म्हणतात. अशा गोष्टी सांगणाऱ्या उत्साही तरुणांसाठीच ‘नुक्कड टी.व्ही.’ या यूटय़ूब चॅनेलची सुरुवात यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर झाली. २६ जानेवारी २०१६पासून सुरू झालेल्या या यूटय़ूब चॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर गुरुवारी रात्री ब्लॉगवर दोन कथा पोस्ट होतात आणि दर शुक्रवारी सकाळी नऊ  वाजता या चॅनेलवर एक नुक्कड कथा अपलोड होते. कथा लिहिणारे तरुण केवळ भारतातलेच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी अशा इतर देशांमधूनही या उपक्रमात सहभागी होत असतात.

आजच्या फास्ट लाइफमध्ये मोठमोठय़ा कथा-कादंबऱ्या वाचण्याऐवजी तरुण वाचकांचा कल शॉर्ट स्टोरीकडे अधिक असतो आणि हेच हेरून नुक्कड कथा या चॅनेलवर मराठी लघुकथांना स्थान दिलं जातं. या माध्यमातून तरुणाई सहज व्यक्त होऊ  शकते. याच विचाराने केवळ चार ओळींपासून ते चारशे शब्दांपर्यंत विस्तार असणाऱ्या कथा या ऑनलाइन व्यासपीठावरून सादर होतात. तरुणांना मराठीची आवड आहे, तिचा अभिमान आहे, तिचं कौतुकही आहे, मात्र योग्य व्यासपीठ आणि साहित्याच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर जाण्याची थोडी मोकळीक मिळाली तर त्यांच्याकडूनही नवनिर्मिती होत असते. या लघुकथांना मिळणारा प्रतिसाद आणि चॅनेलचे वाढते व्हय़ूज आणि सबस्क्रायबर्स पाहता तरुणाई मराठी साहित्याच्या निर्मितीत कुठेही मागे पडताना दिसत नाही. तरुणांचा स्वत:वर आणि इतरांचा तरुणांवर असणारा विश्वास नवनिर्मितीची प्रेरणा ठरतो.

म्हणूनच मराठी दिनाच्या निमित्ताने ‘नुक्कड टी.व्ही.’सारख्या साहित्याला नवमाध्यमाच्या आवाक्यात नेणाऱ्या उपक्रमांची दखल घ्यायलाच हवी