ग्रीस २
शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. आजपासून आपण ग्रीसच्या दौऱ्यावर आहोत. युरोपातल्या या प्राचीन पण प्रगत संस्कृतीचं साऱ्या जगाला अप्रूप. त्यांच्या खाद्यसंस्कृतीची सावलीही संपूर्ण युरोपावर पडलेली दिसते. ग्रीक सॅलड हा तिथल्या मेन्यूकार्डवरचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात लोकप्रिय पदार्थ.

ग्रीसमध्ये एक म्हण आहे- ‘लेट नो वन अनट्रेंड इन जॉमेट्री एंटर’. म्हणजे जॉमेट्रीबद्दल ज्याला व्यवस्थित माहिती नाही अशा व्यक्तीला घरात घेऊ नका. जॉमेट्री ग्रीकांनी शोधून काढली. पायथागोरस, युक्लीयस, अ‍ॅरिस्टॉटल असे दिग्गज या भूमितीच्या मागे झटले. आज ज्या जगात आपण जगतो त्याला आवश्यक असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये याचा उपयोग आहे. ‘डेमोक्रॅटिस’ या तत्त्ववेत्त्यानं जगाला डेमोक्रसी म्हणजे लोकशाहीची कल्पना दिली. अशा किती तरी दिग्गज विचारवंतांनी खऱ्या अर्थानं मानवी जीवन सुखकर, सुसंस्कृत घडवलंय. आज जरी संस्कृतीचं फुललेलं झाड दिसत असलं, तरी त्याची पाळंमुळं इथे खूप खोलवर रुजलेली आहेत आणि तीच झाडाला शक्ती देतात.

माझं पहिलं परदेशगमन ग्रीसमध्ये झालं आणि तेपण ग्रीक शिप ‘ऑलंपिक व्होयेजर’वर. ८०० पॅसेंजरचं हे जहाज होतं आणि आमचं पोर्ट होतं ‘पीरायास’ (अथेन्स शहराजवळचं हे बंदर). ग्रीक भाषा फारशी समजायची नाही; पण शेफ लोक मात्र खूप प्रेमळ आणि बिनधास्त होते.
ग्रीसमधल्या मेन्यूमध्ये ग्रीक सॅलड फारच लोकप्रिय होतं. शिवाय ऑक्टोपसचं सॅलड म्हणजे एखाद्या अस्सल ग्रीक माणसाचं जीव की प्राण. बकलावा (एक ड्रायफ्रुटचा प्रकार, पिस्त्यांपासून बनविलेला गोड पदार्थ), स्पानाकोफीता (पालक आणि गोट चीजचे पफ्स्), मुसाका हे पदार्थ इथल्या खूपच सगळ्यांनाच आवडायचे. ग्रीक जेवणात डाळी आणि कडधान्य यावरपण खूप भर असतो. ग्रीक माणसाला सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घ्यायला आवडतं. मिठाई मात्र कॉफीबरोबर किंवा पाहुण्यांसोबत खायला इथल्या मंडळींना आवडतं.

इथल्या पीरायास या पोर्टच्या परिसरात फेरफटका नेहमी मारायचो. आम्हाला बाहेर फिरायला जास्त वेळ मिळायचा नाही, म्हणून त्याला फिरणं म्हणता येणार नाही; पण जो काही अनुभव आला तो कायम लक्षात आहे. सुंदर रस्ते, युरोपीयन पद्धतीची घरं, शांत परिसर आणि रांगडी हसमुख माणसं. मला आठवतं.. न्यू इयरच्या पार्टीनंतर माझ्या ग्रीक एक्झीक्युटिव्ह शेफने आम्हाला एक भारीतली श्ॉम्पेन भेट दिली आणि सगळ्यांनी मिळून न्यू इयर साजरं केलं. शिपच्या डेकवर रात्री दोन-अडीचला रंगलेला तो नववर्षांचा जल्लोष माझ्या आजही लक्षात आहे आणि कायम राहील.

ग्रीक सॅलड
viv28साहित्य : ड्रेसिंगकरिता : ऑलिव्ह ऑइल – ३ टेबलस्पून, ड्राइड ओरेगॅनो लीव्हज् – १ टी स्पून, लसूण – १टी स्पून, रेड वाइन विनेगर – १ टी स्पून (असल्यास), लिंबाचा रस – १ टेबलस्पून, काळी मिरीपूड, मीठ
सॅलडकरिता : रोमन लेटय़ूस – १ (हे नसल्यास आइसबर्ग किंवा कुठलेही उपलब्ध असलेले लेटय़ूस सॅलडचे पान वापरा), काकडी – सोलून स्लाइस केलेली १, कांदा – १ ( पातळ स्लाइस), लाल सिमला मिरची – १ (पातळ स्लाइस), टोमॅटो – २, बारीक चिरलेली पुदिना पाने – १०, फेटा चीज – ५० ग्रॅम (हे बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज असते, हे नसेल तर पनीर वापरा), कालामाता ऑलिव्हज – १०-१२ (हे ग्रीक ऑलिव्हज जगामधले सर्वोत्कृष्ट ऑलिव्हच्या जातींपकी एक. मिळाले तर बघा. नाही तर रेग्युलर बॉटलमधले ऑलिव्हज वापरा), मीठ, काळी मिरी.
  कृती : एका छोटय़ा बाऊलमध्ये ऑइल, ओरेगॅनो, लसूण, वाइन व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र करा. चवीपुरतं मीठ आणि काळी मिरीपूड टाका. सॅलडचे  साहित्य बाऊलमध्ये टाका. एकत्र मिक्स करून सव्‍‌र्ह करा.

लेमन पेपर फिश
viv29साहित्य : ठेचलेल्या लसूण पाकळ्या – दोन, ऑलिव्ह ऑइल – पाव कप, लिंबाचा रस – एक टेबलस्पून, लेमन झेस्ट (किसलेले लिंबाचे साल) – अर्धा टी स्पून, काळी मिरीपूड – अर्धा टी स्पून, खडे मीठ (नसेल तर साधं मीठ घ्या) – अर्धा टी स्पून, ड्राइड ओरेगॅनो लीव्हज् – एक टी स्पून, मासे (तुकडे केलेले) – अर्धा किलो.
कृती : एका बाऊलमध्ये लसूण, ऑइल, लिंबाचा रस, लेमन झेस्ट, काळी मिरीपूड, सी सॉल्ट आणि ड्राइड ओरेगॅनो एकत्र करा. आता या मिश्रणात मासे टाकून व्यवस्थित मिक्स करा. झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. मग ओव्हनमध्ये बेक करा किंवा नॉन-स्टिक पॅनवर मासे परतवून घ्या. सॅलड किंवा भाज्यांबरोबर सव्‍‌र्ह करा.

आजची  सजावट
भोपळ्याचा कंदील
viv26हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
अखंड लाल भोपळ्यावर खडूने फुलाचे डिझाईन काढून घ्या. त्या आकारानुसार फुलाच्या पाकळ्या चाकूने कापा. या फुलाच्या नक्षीदार कोरलेल्या भोपळ्यातून आतला गर आणि बिया अलगद काढून टाका. आता या नक्षीदार भोपळ्यामध्ये दिवा लावून आकर्षक आणि वेगळा कंदील तयार करू शकता. दिवाळीत घरासमोर हा भोपळ्याचा कंदील वेगळा वाटेल; पण आतला दिवा फार तीव्रतेचा नको, नाही तर भोपळा खराब होईल. तसेच भोपळ्यावर मधूनमधून पाणी मारावे लागेल. म्हणजे तो फ्रेश दिसेल आणि चांगला राहील.