माझा एक मित्र ग्रॅज्युएट झाल्यावर अमेरिकेला गेला. नंतर आम्हाला कळलं की तिकडे तो एका मुलाबरोबर राहतो आणि तो ‘गे’ आहे. आम्हाला सगळ्यांना शॉकच बसला. कारण इथे आम्ही तीन-चार र्वष कॉलेजमध्ये होतो, मजा केली. पण आम्हाला कधी जाणवलंही नाही. इन फॅक्ट त्याची एक-दोन अफेअर्सही होती. तो कधीच मुलींसारखा वगैरे वागायचा नाही. त्याच्याशी बोलताना मला कधी ऑड किंवा ऑकवर्ड वाटलं नाही. त्याच्या आईवडिलांना काही समजतच नाहीये हा काय प्रकार आहे ते. तो इथे आला की त्याला सायकिअ‍ॅट्रिस्टकडे घेऊन जाणार आहेत ते. तिकडे गेल्यावर, मुलांबरोबर रूम शेअर केल्यामुळे तो असा झाला असेल का? यावर उपचार असतात का? इतरांना कसं समजेल की अमुक एक व्यक्ती गे आहे म्हणून? तो सुट्टीला आला की त्याला भेटायचं मला टेन्शनच आलंय. आमची मैत्री आता पूर्वीसारखी असेल का?
शौनक

हॅलो शौनक, ज्याच्याबरोबर आपण इतका काळ घालवला त्या मित्राविषयी असं काही कळल्यावर पहिल्यांदा तुमचा विश्वासच बसला नसेल. जरी आजकाल गे, होमोसेक्शुअ‍ॅलिटी हे शब्द आपण पेपरमध्ये वाचतो तरी हा सगळा प्रकार सेक्स या विषयाशी संबंधित असल्यामुळे आपण काहीसे अवघडलेलो असतो. जवळचं कुणी असं असेल हे आपण इमॅजिनही करू शकत नाही.
खरं बघायला गेलं तर हा विषय सेक्सपेक्षाही सेक्शुअ‍ॅलिटीशी जास्त निगडित आहे. तुला वाटेल काय फारसा फरक पडतो? फरक हा की सेक्स म्हटलं की यातले फक्त शारीरिक पैलू पाहिले जातात, पण सेक्शुअ‍ॅलिटी म्हटलं की दोन व्यक्तींमधले संबंध सर्वार्थानं पाहिले जातात, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या अर्थानं. यात इमोशन्स, कमिटमेंट हे सगळं आलं.
हे का होतं याबद्दल खूप उलटसुलट मत-मतांतरं आहेत. दर काही दिवसांनी नवी माहिती बाहेर येते. खूप सखोल अभ्यासानंतरही याचं नक्की कारण उमजलेलं नाही. जीन्स, संप्रेरकं, वाढता मेंदू आणि वातावरण या सगळ्यांचं एकमेकांवर गुंतागुंतीचा परिणाम होऊन लैंगिक प्राधान्य ठरतं. त्याचे आईवडील नॅचरली कन्फ्यूज झाले असणार. मुलाला वाढवण्यात आपली काहीतरी चूक झाली की काय असं पालकांना अनेकदा गिल्टी फीलिंग येतं. याविषयीचे कायदेही बदलत असतात, त्यात देशोदेशींमधे फरक असतो. गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटन, फ्रान्ससारख्या काही देशांनी याला कायद्यानं मान्यता दिली आहे तर अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये यासाठी मृत्युदंडाची शिक्षा आहे. आपल्या देशात होमोसेक्शुअ‍ॅलिटी किंवा समलिंगी संबंध हा कायद्यानं गुन्हा मानला आहे (कलम ३७७). तो बदलावा यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना चळवळ करत आहेत. पुरातन काळात लैंगिकतेविषयी मुक्त असलेली आपली संस्कृती आताच्या काळात मात्र याचा खूप बाऊ करते. बघ ना, तुझ्या मित्राला परदेशी जाऊन आपली लैंगिकता उघड करावी लागली. याची काही कारणं म्हणजे आपली समाजव्यवस्था, कुटुंबाला असलेलं महत्त्वाचं स्थान आणि प्रचलित कायदेपद्धती.
तू विचारलं आहेस की अमुक एक माणूस समलैंगिक आहे हे कसं ओळखायचं. हा कन्सेप्ट समजायला आणि पचायला अवघड आहे. मुळात आपल्याला हे माहिती असायला हवं असं का वाटतं तुला? त्यांच्यापासून बचाव करायला हवा म्हणून? की त्यांच्यापासून दूर राहावं म्हणून? एक लैंगिक प्राधान्य सोडलं तर या व्यक्ती सर्वसाधारण माणसासारख्याच असतात. त्यांचं कर्तृत्व, कार्यक्षमता यात यामुळे काही कमतरता राहात नाही. किती तरी शास्त्रज्ञ, विचारवंत, कलावंत गे आहेत, त्यांनी ते उघडपणे जाहीरही केलं आहे. आपल्या समाजाच्या बंदिस्त  मानसिकतेमुळे भारतात कित्येक समलैंगिक मुलांना आणि मुलींना हे लपवून ठेवून केवळ दाखवण्यासाठी लग्न करावं लागतं. जबरदस्तीनं बदलण्यासारखी ही गोष्ट नसल्यानं अशा लग्नांमुळे त्यात समाविष्ट असलेल्या दोन्ही व्यक्तींचं आयुष्य बरबाद होण्यापलीकडे यातून काही साध्य होत नाही. या लपवाछपवीमुळे त्यांच्यात एड्ससारख्या लैंगिक आजारांची समस्याही खूप मोठी आहे. हा काही आजार नव्हे त्यावर उपचार करायला. हा फक्त लैंगिक प्राधान्यक्रम आहे. सध्याच्या विचारधारेनुसार, तज्ज्ञांच्या मतानुसार हा तात्पुरता कल नसतो आणि कुठल्याही उपचारपद्धतीनं हा कल बदलता येत नाही आणि तसा तो बदलायचा प्रयत्नही करू नये.
ही खरं तर प्रत्येकाची अतिशय खासगी गोष्ट आहे. भिन्नलिंगी पुरुष जसे सगळ्याच स्त्रियांकडे लैंगिक दृष्टीनं पाहात नाहीत, तसंच होमोसेक्शुअल मुलं इतर सगळ्याच मुलांकडे ‘त्या’ दृष्टीनं पाहात नाहीत. त्यामुळे या कारणानं तुमची मैत्री तुटायचं काही कारण नाही. मला माहिती आहे तो परत आल्यावर पहिल्यांदा तुम्ही भेटाल तेव्हा पूर्वीसारखं वागणं सुरुवातीला थोडं जड जाईल. हे अवघड आहे पण अशक्य नक्की नाही.
it is an old stereotype that homosexuality is do only with sex while heterosexuality is multifaceted and embraces love and romance.- Vito Russo

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.