१२ महिन्यांत १२ देश पालथे घालायचे आणि १२ नवीन गोष्टी शिकायच्या, असं ठरवून सचिन भंडारी हा कलंदर प्रवासी भ्रमंतीला निघाला आहे. पाठीवरती बॅग अडकवून जग बघायला निघालेल्या हल्लीच्या बॅकपॅकर्सच्या ‘जमाती’तला सचिन. आपले हे १२ गावचे अनुभव वर्षअखेर न्यूयॉर्कमध्ये स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून लोकांपुढे मांडण्याची त्याची इच्छा आहे. बॅकपॅकिंगचे त्याचे अनुभव..

vn29  पाठीवर बॅग घेऊन एकटीच जग हिंडायला निघालेली मंडळी आता आपल्याकडेही दिसायला लागली आहेत. तरीही ‘बॅकपॅकिंग’ची कन्सेप्ट आपल्याकडे तशी नवीच. जग बघण्याची, माणसांना भेटण्याची आवड असणारी तरुण मंडळी अगदी कमी खर्चात आणि कमी सामानानिशी प्रवास करतात त्यांना बॅकपॅकर्स म्हटलं जातं. यूथ हॉस्टेल्स किंवा आपल्या मित्रमंडळींच्या ओळखीनं तत्सम लो कॉस्ट सिस्टीममध्ये बॅकपॅकर्स राहतात आणि सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात, वेगळ्या-हटके लोकेशन्सना भेट देतात. मी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी असं बॅकपॅकिंग करत प्रवास केला आहे. लॅटिन अमेरिका, युरोपातले काही छोटे देश मी अशाच पद्धतीने फिरलोय.
फिरणे हा माझा लहानपणापासूनचा छंद. लहान असल्यापासूनच संपूर्ण जग फिरण्याचं स्वप्न माझ्या मनात होतं. गेलं दशकभर पब्लिक  रिलेशन्सच्या क्षेत्रात काम करत होतो. कामात समाधानी नव्हतो, असं नाही. पण तरीही मनात काहीतरी राहिल्यासारखं, काहीतरी सुटल्यासारखं वाटत होतं. म्हणजे, आपण म्हणतो ना, देअर इज समथिंग मिसिंग.. अगदी तसंच काहीसं वाटत होतं. म्हणून ‘पीआर’मधला वेलसेट जॉब सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि हे वर्ष पूर्णपणे भटकंतीला द्यायचं ठरवलं.
vn32१२ देश १२ महिने आणि १२ उपक्रम हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वीच डोक्यात आलेला. पण असं फिरण्यासाठी योग्य आणि शिस्तबद्ध योजना करणं, सर्व घरातल्यांना, मित्र-मैत्रिणींना याकरिता समजावणं आणि मूळात शारीरिकदृष्टय़ा तयार होणं महत्त्वाचं होतं. यासाठी संपूर्ण एक वर्ष तयारी केली मग यात पूर्णपणे उतरलो. अशी एकदम नोकरी सोडणं सोपं निश्चितच नव्हतं. पण मी हे धाडस केलं ते फक्त भटकंतीच्या पॅशनसाठी. पॅशन माणसाला ती गोष्ट करण्यासाठी झपाटून टाकते, त्या कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही.
‘प्रोजेक्ट १२’  हा स्वप्नातला उपक्रम पूर्ण करण्यासाठी माझा आत्तापर्यंतचा बॅकपॅकिंगचा अनुभव कामाला येणार आहे. या प्रकारच्या प्रवासातून खूप माणसं जोडली जातात. मी काऊचसर्फिग.कॉमच्या माध्यमातूनही अनेक मित्र जोडले आणि परदेशात त्यांच्याकडे जाऊन राहिलो. अनेकांना मा-झ्या घरी उतरण्याचं आमंत्रण दिलं. त्यामुळे आता ही सगळी मंडळी माझ्या मदतीला आहेत. माझ्या ‘प्रोजेक्ट १२’ ची सुरुवात ६ फेब्रुवारीला मी करतोय. सुरुवातीला आपल्या रेल्वेचा अनुभव घेत दक्षिण भारतापर्यंत जाणार आहे. पुढे श्रीलंकेत जाऊन तमिळ आणि सिंहली लोकांच्या मैत्रीच्या कहाण्या शोधणार आहे. मार्चमध्ये थायलंडकडे कूच करून तिथे रॉक क्लाइंबिंग शिकणार आहे. पुढे ब्राझीलमध्ये जाणार. तिथे बातुकाडा ड्रम वाजवायला शिकणार आहे. vn31चिलीमध्ये जाऊन सी सर्फिग शिकणार. लाटांवर आरूढ होत पाण्याच्या भीतीवर मात करण्याचा माझा प्रयत्न असेल. जूनचा पूर्ण महिना ट्रेकिंग करून कोलंबियामध्ये जाणार. ड्रग्जपलीकडचा कोलंबिया मला शोधायचा आहे. पुढे ऑगस्ट महिन्यात कोस्टारिकामध्ये स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवणार आहे. सप्टेंबरमध्ये मेक्सिकोच्या अंतर्गत भागात जाऊन तिथलं ऑथेंटिक मेक्सिकन जेवण बनवायला मला शिकायचंय. ऑक्टोबर महिन्यात पपुआमध्ये साल्सा शिकणार. नोव्हेंबर महिन्यात सायकलिंग करत शक्य तेवढं अंतर पार करणार. न्यूऑर्लिअन्स ते न्यूयॉर्क प्रवास सायकलवरून करायचा मानस आहे. मग प्रवासाचा शेवट न्यूयॉर्कमध्ये करणार आहे. ११ महिने अनुभवलेल्या थराराचं कथन न्यूयॉर्कमध्ये स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे.  
हे नुसतं फिरणं नाही तर मला त्यातून एक विलक्षण आनंद मिळतो, जो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. फिरताना त्या-त्या भागातील राहणीमान, परंपरा यांचा अनुभव घेणं, तिथे जाऊन तेथील लोकांसारखं राहणं, तिथल्या निसर्गाचं, वन्य जीव यांचं निरीक्षण करणं, तेथील लोकांच्या सहवासात त्यांची सामाजिक परिस्थिती जाणून घेणं, या सर्वाचं मानसिक स्तरावर विचारमंथन करणं हे मूळ उद्दिष्ट आहे. फिरण्यातून नव्या गोष्टींचा अनुभव घेता येतो, ते सर्व अनुभव आपल्याला आपल्यात सामावून घेता येतात, त्यातून आपण घडत असतो. एकटं फिरताना आपण आपल्याच अधिक जवळ येतो, आपल्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेस दिसून येतो.
सचिन भंडारी
(शब्दांकन – दिशा खातू)

क्राउड फंडिंगचा मार्ग
तरुण उद्योजक किंवा अभिनव उपक्रम करू इच्छिणाऱ्या तरुणांना आर्थिक मदत मिळण्यासाठी क्राउड फंडिंगचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. http://www.indegogo.com, http://www.kickstarter.com सारख्या काही वेबसाईट्सवर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट चांगल्या शब्दात चांगल्या पद्धतीने मांडला आणि तो लोकांना पटला तर मदतीचा ओघ सुरू होऊ शकतो. सचिननेदेखील ‘१२ प्रोजेक्ट’ची माहिती अशा एका साईटवर टाकली होती. यातून त्याला थोडीफार मदत मिळाली. अर्थात यातून सर्व प्रोजेक्टचा खर्च भागू शकणार नाही. पण या निमित्ताने या माध्यमातून एक नवा मार्ग, अभिनव उपक्रमांची खाण त्याला सापडली. क्राऊड फंडिंगचा पर्याय आपल्याकडे अजून रुजलेला नाही. पण याला भविष्यात नक्कीच महत्त्व येणार हे उघड आहे. ‘ऑड ट्रॅव्हलर’ या यू टय़ूब चॅनेलवरदेखील सचिनने आपल्या प्रोजेक्टची माहिती अपलोड केलेली आहे.

तुमची ‘लव्ह स्टोरी’ शेअर करा
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना. या महिन्यात प्रेमाचा दिवस साजरा करण्याबद्दल कुणाचं काहीही मत असलं, तरी त्यानिमित्ताने आपल्या प्रेमाची गोष्ट शेअर करायला काय हरकत आहे? आपली लव्ह स्टोरी ‘जगात भारी’, ‘आमचं सगळं वेगळं असतं’ असं काही वाटत असेल किंवा आपल्या गर्लफ्रेंडला/ बॉयफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी काही भन्नाट मार्ग चोखाळला असेल किंवा आपल्या पहिल्या प्रेमाची हळवी हुरहुर सांगावीशी वाटत असेल, रिलेशनशिपमधली अवघड वळणं सांगावीशी वाटत असतील तर ते सगळं आमच्याशी शेअर करा. आपला लेख ३०० शब्दांपेक्षा जास्त नसावा. निवडक लेखांना प्रसिद्धी देण्यात येईल. आपले लेख – viva@expressindia.com या आयडीवर पाठवा. सब्जेक्ट लाइनमध्ये लव्ह स्टोरी असं लिहा.