जन्म, शिक्षण, करिअर, जॉब, लग्न.. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी.. त्या कारणांपरत्वे असंख्य भारतीयांनी चोखाळली वेगळी वाट.. परदेशाची.. कुणी सहकुटुंब कुणी एकेकटं, कुणी घरी तर कुणी विद्यापीठांत राहून आपापली आयुष्यं घडवताहेत. या जडणघडणीत मोठा वाटा आहे तो भारतीय संस्कार नि उत्सवी परंपरांचा.. म्हणूनच त्या जपल्या जातात परदेशातही. अर्थात तिथले नियम पाळून नि तिथल्या आपल्या माणसांना त्यात सामील करून घेऊन.. त्यांना आपल्या संस्कृतीचं महत्त्व समजावताना, तिथल्या उपलब्धतेनुसार सेलिब्रेशनच्या पद्धतींत बदल करताना कळतनकळत परदेशस्थ तरुणाई नव्यानं आपल्या परंपरांचा विचार करते. चांगलं ते घ्यावं, असा सकारात्मक विचार करत भारतातली दिवाळीही प्रदूषणमुक्त साजरी व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करते. सातासमुद्रापार ‘जगाच्या पाठीवर’ चालणारं हे प्रातिनिधिक दिवाळी सेलिब्रेशन काही यंगस्टर्सनी ‘व्हिवा’शी शेअर केलं.

अथर्व आठवले, ऑस्ट्रेलिया
vv14लहानपणापासून मी ऑस्ट्रेलियात येतो आहे. आता २-३ र्वष बाबांचं प्रोजेक्ट असल्यामुळं आम्ही इथेच आहोत. भारतातली दिवाळीही मी अनुभवली आहे. त्यामुळं मला दोन्ही देशांची खूप छान नि जवळून ओळख आहे. भारतातली दिवाळी म्हणजे नुसती धमाल. फटाके.. फराळ.. शाळेलाही सुट्टय़ा असल्यानं आजूबाजूचा माहोलच दिवाळीमय असतो. परंतु इथं असं काहीही नसतं. इथली दिवाळी म्हणजे सगळं शांत, डल, बोअिरग. मुकाटय़ानं शाळा-कॉलेज अटेंड करायचं. आम्ही मित्रच आमच्या गोऱ्या मित्रांसहित आपल्या मराठी फॅमिलीजमध्ये एकत्र येतो. कुणाकडं फराळ केला जातो, कुणाला इंडियातून फराळाची पार्सल्स येतात, त्यावर ताव मारतो. ऑसी लोकांना दिवाळीची मजा, दिव्यांची रोषणाई इत्यादींचं महत्त्व सांगतो. वुई कम टुगेदर, वेअर ट्रॅडिशनल ड्रेसेस टू सेलिब्रेट बीइंग इंडियन. भारताबाहेर राहूनही भारतीय संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असतो. इथं मेलबर्नमध्ये फेडरेशन स्क्वेअरला दिवाळी स्पेशल प्रोग्रॅम्स असतात. फायरकॅ्रकर्स लावतात. काही उत्साही तरुण मंडळी वेगवेगळे खाण्याचे स्टॉलही लावतात. अनेक भारतीय पारंपरिक वेशात तिथे जमतात. सो, इथल्या कम्युनिटीला डिस्टर्ब न करता, रादर त्यांना शक्य तेवढं सामील करून घेऊन आम्ही दिवाळीचा आनंद लुटतो.

अमीरचंद राणे, मॉरिशस
vv15दीपावली हा मॉरिशसमधला खूप मोठा सण असून तो भारताएवढय़ाच उत्साहानं साजरा केला जातो. मी राहतो त्या जागेचं नाव क्वात्र बॉर्नस असं आहे, जे मॉरिशसमधील एक मोठं शहर आहे. इकडे खूप भारतीय लोक राहतात. जे मूळ मॉरिशन्स लोक आहेत, त्यापकी जास्तीत जास्त िहदू आहेत. यामुळं इकडं दीपावली तेवढीच साजरी होते नि मजा असते, जेवढी आपल्या भारतात असते. भारतात आपण लक्ष्मीपूजन करतो, तसंच आम्हीही पूजन करतो आणि फटाके फोडतो. इकडं फटाकेसुद्धा भारतातूनच येतात. पण इकडच्या नियमानुसार कमी आवाजवाले फटाकेच आम्ही वाजवू शकतो. आम्ही इकडं खूप मजा करतो, कारण वेगवेगळ्या देशांतील लोक उदाहरणार्थ पाकिस्तान, फ्रान्स आणि इतर काही देशांतील लोकही आमच्याबरोबर उत्सुकतेनं दीपावली साजरी करतात. मग आम्ही त्यांना आपल्या जेवणासाठी बोलावतो किंवा गोड पदार्थ खायला देतो. आम्ही इकडं दीपावली साजरी करून आपली संस्कृती बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवतो.

अमित जोशी, सिंगापूर
भारतात दिवाळी जवळ आली आहे, हे समजायला हवामानातले बदल आणि एकूणच जल्लोषाचं वातावरण पुरतं. पण देश सोडून बाहेर गेल्यावर त्या जल्लोषाला आपण मुकतो आणि हळूहळू त्याचा विसरही पडतो. सिंगापूर मात्र याला अपवाद आहे. अगदी हवामान गार नाही झालं, तरी जल्लोषाची कुठंच उणीव भासत नाही. इथल्या ‘लिटिल इंडिया’ परिसरात भारतातल्या कुठल्याही रोषणाईला लाजवेल अशी रोषणाई असते. तऱ्हेतऱ्हेच्या पणत्या, आधुनिक लाइटिंगसाठी आकर्षक दिव्यांच्या माळा, रंगीबेरंगी रांगोळ्या, कलाकुसरयुक्त सजावटीचं साहित्य आणि इतकंच नव्हे तर लक्ष्मीपूजनाला लागणाऱ्या साळीच्या लाह्य़ा आणि बत्तासेही मिळतात. रुचकर आणि चविष्ट फराळ बनवायचं सगळं साहित्य इथं उपलब्ध आहे. रेडिमेड फराळही ठिकठिकाणी मिळतो. दिवाळी म्हटल्यावर आतषबाजी आलीच. पण इथं फक्त फुलबाज्या आणि शोभेचे फटके लावायचे. आवाजाच्या फटाक्यांना इथं परवानगी नाही. त्याचबरोबर पाहायला मिळते काटेकोरपणं पाळली जाणारी शिस्त आणि स्वच्छता. भारतात आपण कितीही इच्छा व्यक्त केली तरी बिना आवाजाची आणि स्वच्छ दिवाळीचा आनंद घ्यायला बरीच वाट पाहावी लागेल. गेली ७ र्वष मी दिवाळीचा आनंद इथं लुटतोय आणि आता माझ्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना इथलीच दिवाळी आवडते.

अजिंक्य गोखले, जपान
vv16अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत जपानमध्ये भारतीयांची संख्या कमी आहे. बहुधा भूकंप आणि त्सुनामीला घाबरून भारतीय लोकांनी जपानकडं पाठ फिरवली असेल. जी काही भारतीय लोकांची संख्या जपानमध्ये आहे, ती प्रामुख्यानं टोकियो, कावासाकी, योकोहामा आणि कोबे या परिसरात आहे. दरवर्षी या प्रांतांत दिवाळी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. योकोहामाच्याजवळ यामाशिता कोएन या समुद्रानजीकच्या सुंदरशा बागेत भारतीय लोक हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. ही दिवाळी भारतीय दिवाळीच्या दिवशीच साजरी होईल, अशी शाश्वती नाही. साधारणत: दिवाळीच्या आधी किंवा नंतरचा जोडून सुट्टय़ांचा दिवस बघून दिवाळी साजरी केली जाते. नृत्य-गायन, संगीत-नाटय़ादी कलांचा मेळ इथं दिसतो. जपानमध्ये एरवी सहज उपलब्ध असलेले भारतीय पदार्थ या वेळी एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. पोळपाट-लाटण्यांपासून ते शाल-चादरी, पितळ्याच्या भांडय़ांपर्यंत सर्व प्रकारच्या भारतीय घडणीतील वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. या वर्षी टोकियोत पार पडलेल्या ‘नमस्ते इंडिया’ या दिवाळी विशेष सोहळ्यात तर चक्क जपानी मुली ‘शीला की जवानी’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यांवर नाचल्या. जपानी दिवाळी साजरी करताना फटाके आणि ढोलताशांच्या आवाजाला सक्त मनाई असल्यामुळं ध्वनी-वायू प्रदूषणमुक्त साधी सुंदर दिवाळी, रोषणाई आणि पणत्या लावून भेटवस्तू आणि मिठाई देऊन साजरी केली जाते. भारतातही आता अशाच प्रकारे दिवाळी साजरी करण्याची गरज आहे.  

जान्हवी देवळेकर, इंग्लंड
vv17इंग्लंड आणि भारतात दिवाळी साजरी करणं या दोन्ही सेलिब्रेशन्समध्ये आताशा फारसा फरक उरलेला नाहीये. माझा जन्म मुंबईतला. मी पाच वर्षांची असताना आम्ही ‘यूके’ला शिफ्ट झालो. आपल्या भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या उत्सवांपकी दिव्यांचा उत्सव अर्थात दिवाळी हा माझा सगळ्यात लाडका उत्सव आहे. दिवाळीच्या निमित्तानं फ्रेण्डसचं मिनी गेटटूगेदरच होतं. स्वादिष्ट स्वयंपाक नि चविष्ट मिठाईवर ताव मारला जातो. दिवाळी सेलिब्रेशनच्या तयारीसाठी आमच्या घरी माझ्या आईची अगदी धावपळ चाललेली असते. मिठाई नि गोडाधोडाचे पदार्थ ती घरीच करते. लक्ष्मीपूजनाला घरभर लक्ष्मीची पावलं काढते. तऱ्हेतऱ्हेच्या पद्धतीची सुबकशी रांगोळीही ती रेखाटते. भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानलं जाणारी छानशी साडी नेसून आणि मोजकेच दागिने घालून माझ्या मित्रमंडळींसोबत गप्पाटप्पा करायला मला फार आवडतं. यूकेमध्ये भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळं आम्ही सगळे भारतापासून लांब आलोय, असं कधीच वाटत नाही. विशेषत: दिवाळीसारख्या सणाच्या निमित्तानं इथल्या भारतीयांच्या एकत्र येण्यानं ते पुन:पुन्हा अधोरेखित होतं.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.