गेल्या चार वर्षांमध्ये धरणे आणि उपोषणकर्त्यां संघटना व कार्यकर्त्यांच्या ओसरलेल्या उत्साहाला यावर्षी उधाण आल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ७१ धरणे व उपोषणाचे मंडप होती.
संत्रानगरीतील हिवाळी अधिवेशन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक पर्वणी समजले जाते. भाषणे, घोषणा, शक्तिप्रदर्शन करून नंतर सभा भरवून वाहतूक ठप्प करणे अशी दृश्ये गेल्या वर्षीपर्यंत असायची. मुंबईच्या अधिवेशनात काहीही मिळत नसल्याने परभणी, बीड यासारख्या जिल्ह्य़ांतून पायपीट करून अन्यायग्रस्त लोक हिवाळी अधिवेशनासाठी येणे ही नागपूर अधिवेशनाची वैशिष्टय़े होय. खेडय़ापाडय़ातून, दुर्गम आदिवासी भागातून अपुऱ्या सोयीसुविधा असतानाही लोक फार अपेक्षेने अधिवेशन काळात नागपुरात यायचे. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये धरणे व उपोषण मंडपांना उतरती कळा लागली होती. त्या त्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री, आयुक्त किंवा त्यांचे साधे स्वीय सहाय्यकदेखील या मंडपांकडे फिरकून अन्यायग्रस्तांचे म्हणणे ऐकत नव्हते. आस्थेने विचारपूस करीत नव्हते की समस्या समजून घेत नव्हते. यातून एकप्रकारचे निराशावादी वातावरण बनले होते.
नवीन सरकारमुळे कार्यकर्त्यांचा आशा पल्लवीत होऊन प्रत्येक मंडपाला मंत्री, राज्यमंत्री किंवा आमदारांनी भेटी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचा आनंद मंडपकर्त्यांमध्ये दिसून आला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात आमदार निवासच्या फुटपाथवर होणारी धरणे, उपोषणे पुढे सरकत सरकत कामगार न्यायालय व हिस्लॉप महाविद्यालयाच्या बाजूच्या फुटपाथवरून नाईक झोपडपट्टीपर्यंत येऊन बसले. गेल्यावर्षीपासून ती सर्व मंडपे पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर हलवण्यात आली.
यावेळी वेगवेगळ्या ७१ संघटनांचा पटवर्धन मैदानात धरणे आणि उपोषणांच्या माध्यमातून माणसांचा राबता कायम राहिला. त्यातील काहींच्या मागण्या पूर्ण झाल्या, काहींना आश्वासने मिळाली. काहींना तर मंत्र्यांनी भेट घेऊन निवेदन स्वीकारल्याचा परमानंद झाला. मोजक्याच संघटना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठाण मांडून होत्या. आठ डिसेंबरपासून धरणे व उपोषणांच्या मंडपांमध्ये गजबज दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार संघटनांनी धरणे दिली. नऊ डिसेंबरला सात, १० डिसेंबरला आठ तर ११ डिसेंबरला ११ तर १२ डिसेंबरला ६ संघटना मैदानात होत्या. दुसऱ्या आठवडय़ात पहिल्याच दिवशी १५ डिसेंबरला सर्वात जास्त म्हणजे १५ धरणे व उपोषणाची मंडपे होती. १६ डिसेंबरला ९, १७ डिसेंबरला तीन, १८ डिसेंबरला चार, १९ डिसेंबरला एक, २२ डिसेंबरला दोन आणि २३ डिसेंबरला फक्त एकाच संघटनेने मंडपाकडे धाव घेतली.